- डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योग सचिव, महाराष्ट्र राज्यआजच्या या आधुनिक जगामध्ये माणसाने खूप प्रगती केली असली, तरी त्याच्या मनाची शांतता ढासळलेली दिसते. सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्या तरीसुद्धा प्रत्येकाला काहीतरी तणाव आहेच. लोक कितीही श्रीमंत असले, तरी औषधीशिवाय त्यांना झोप येत नाही. अशा अशांततेच्या आधुनिक जीवनामध्ये आपल्याला बुद्धाच्या विचारांची खूप गरज आहे. आपण स्वत: अशांत असलो, आपल्या आजूबाजूचा समुदाय अशांत असला, वेगवेगळे विध्वंसक विचार आपल्या मनात यायला लागले की, तणावाची स्थिती निर्माण होते. अनेक देश आता युद्धाच्या तयारीला लागले आहेत. हे सर्व बघता जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज आहे, हे लक्षात यावे.या परिषदेमध्ये दहाहून अधिक देशांचे वरिष्ठ भिक्खू येणार आहेत. ज्यांनी स्वत: बुद्धविचारावर अभ्यास केला व त्यांचे आचरणही खूप चांगले आहे. हे विचारवंत भिक्खू वेगवेगळ्या विषयांवर येथे विचारमंथन करणार आहेत. पंचशील, आष्टांगिक मार्ग, दहा पारमिता आपल्याला खूप अवघड वाटत असले, तरी हे सर्व भिक्खू या सर्वांचे सहज पालन करतात. ते हे सर्व कसे करतात, हे आपणास यानिमित्त पाहावयास मिळणार आहे. आपण समजतो, तेवढा हा मार्ग निश्चितच कठीण नाही. या विचारांचे पालन आपण केले, तर एक चांगला, सुविचारी माणूस घडवायला मदत होऊ शकते. आपणच आपल्यातील हा चांगुलपणा पुढे आणणे खूप गरजेचे आहे. आपल्याला पाहून दुसरेही या मार्गावर चालतील व चांगले समाजमन त्यातून घडून येईल. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मुलाबाळांवर व आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांवरच पडेल. यातून चांगले प्रबुद्ध चित्त विकसित होईल, असा मला विश्वास आहे. ज्याचे चित्त प्रबुद्ध झाले आहे, तो त्याचा परिवार प्रबुद्ध करील व खूप सारे प्रबुद्ध परिवार तयार झाले, तर प्रबुद्ध भारत, स्वयंप्रकाशित भारत देश त्यातून तयार होईल. जगात भारताची ओळख ही बुद्धाचा देश म्हणून आहे. आज बुद्धाचा धम्म, त्याचा मार्ग ज्या जोमाने जगात पसरत आहे, लोक त्याचा स्वीकार करीत आहेत, त्याच्यावरून या विचाराची प्रासंगिकता व आवश्यकता लक्षात यावी.या तीनदिवसीय परिषदेचे नियोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो, महाराष्ट्राचे संघनायक भदन्त बोधिपालो महाथेरो यांनी औरंगाबादेतील उपासक व उपासिका या सर्वांनी मिळून केले आहे. ही परिषद मोठी आहे. त्यात सर्वांनी मोठा वाटा उचलला आहे. एवढे सर्व उपासक मिळून एकत्र येऊन काम करीत आहेत, हीच परिषदेच्या निमित्ताने घडून आलेली मोठी सुरुवात, फलश्रुती होय. या परिषदेसाठी येणाऱ्या भिक्खूंची व्यवस्था उपासकांनी बुद्धविहारात, तर राज्यभरातून बहुसंख्येने येणाऱ्या धम्मसेवकांची निवास व भोजनाची व्यवस्था उपासकांनी त्यांच्या स्वत:च्या घरी केली आहे. ते उपासक स्वत:ही धम्मसेवा देत आहेत, हे खूप सुंदर उदाहरण औरंगाबादकरांनी देशाला दिले आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला ही सर्व प्रेरणा मिळाली आहे. हा धम्म बाबासाहेबांमुळे आम्हाला मिळाला आहे. डॉ.बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची स्थापना येथे केली. या भूमीतूनच वेगवेगळ्या जातीधर्मांच्या लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले व आज ते कर्तृत्व गाजवत आहेत. सर्वांचा विचार करून डॉ. बाबासाहेबांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. हे एवढे भव्य काम त्यांच्या हातून झाले. हे शक्य का झाले, तर त्यांचा बुद्ध तत्त्वज्ञानावर असलेला प्रगाढ विश्वास होय. त्यांच्या लेखणी, वाणी व वाचेतून जे काही निघाले, ते चांगलेच असायचे. कारण त्यांचा गाभा बुद्ध विचारात आहे. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याच्याच उद्देशानेच ही परिषद नागसेनवनात ठेवली आहे. यासह चौका येथे तयार झालेल्या भिक्खू प्रशिक्षण केंद्रात खास भिक्खूंना देशविदेशातील भन्ते येऊन प्रशिक्षण देत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील हे प्रशिक्षण केंद्र येथे साकारले आहे. ही आगळीवेगळी सुरुवातही औरंगाबादेतूनच झाली आहे. औरंगाबाद हे ऐतिहासिकदृष्ट्या फार मोठे बुद्धिस्ट सेंटर होते. या बुद्धिस्ट सेंटरमध्ये लोकुत्तरा भिक्खू प्रशिक्षण केंद्र आहे. बुद्धविचारावर चालल्यामुळेच हे केंद्र उभारण्याचे कुशल कर्म मला साधता आले. यात माझ्या पत्नीचा मोठा सहभाग आहे. त्या खूप आचरणशील बुद्धिस्ट आहेत.स्वत:ला प्रबुद्ध बनवून घेण्यासाठी परिषदेच्या रूपाने आपण पहिले पाऊल टाकत आहोत. तरुण मुलांनाही आमचे हेच सांगणे आहे, या विचारावर तुम्ही चाललात तर तुमचे आयुष्य सफल होईलच, यासोबतच तुमचे करिअरही यशस्वी होईल. पंचशीलाच्या विचारामुळे मनातील भीती नाहीशी होते. लपविण्यासाठी तुमच्याकडे काहीच नसते, तुम्ही दुप्पट जोमाने काम करू शकता. चांगल्या विचारांवर चालण्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते, याचा मला अनुभव आला आहे. प्रशासनात काम करतानाही मला या विचारांचा फायदा होतो. कितीही कठीण निर्णय असले, तरी ते मी सहजपणे घेऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक, प्रशासकीय कामांमध्ये, एकूणच सर्व कामांमध्ये बुद्धविचारांचा फायदा होतो. या विचारांचे आचरण कसे करावे, हे सहज समजून घेण्यासाठी या परिषदेत सहभागी व्हा.
प्रबुद्ध कुटुंबांतून प्रगल्भ भारताची निर्मिती होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 3:57 AM