किरण अग्रवाल
राजकीय वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतरे किंवा या पक्षातून त्या पक्षात स्थलांतरे होत असलीत तरी, त्यामागे कसलीही वैचारिकता नाही; की संबंधित पक्षाच्या ध्येय-धोरणांप्रतीची स्वीकारार्हता. निव्वळ सत्तेशी जुळवून घेऊ पाहण्याचा प्रयत्न यामागे असून, काहींनी केवळ त्यांच्यामागे लागलेल्या किंवा लागू पाहणाऱ्या चौकशांच्या ससेमिऱ्यातून बचावण्यासाठी ‘टोपी’ फिरविण्याची अपरिहार्यता स्वीकारली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये फुगवटा निर्माण होऊन अपचनाची स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटून घेता येऊ नये.
निवडणुकांच्यावेळी उमेदवारीच्या अपेक्षेने पक्षांतरे घडून येतातच, त्यात नवीन काही नाही; मात्र यंदा ती जरा अधिकच घाऊक पद्धतीने सुरू आहेत म्हणून लक्षवेधी ठरून गेली आहेत. शिवाय केवळ उमेदवारीसाठी पक्ष बदलले जात आहेत अशातलाही भाग नाही. स्वपक्षात उमेदवारीची निश्चिती असली तरी, निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे सत्ताधारींच्या वळचणीला जाण्याकरिता काहींचे पक्षांतर घडून येत आहे पण त्यातही महत्त्वाचे म्हणजे, सत्तेचा वापर करीत विरोधकांच्या मागे विविध चौकशांचे शुक्लकाष्ठ लावले गेल्याचा आरोप पाहता, या चौकशांच्या जंजाळातून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी काहींचे पक्षांतर घडून येत आहे. भीतीचा धागा यामध्ये आहे, त्यामुळे असे नेते शिवसेना-भाजपात आले म्हणजे ते त्या पक्षाचे काम करून पक्ष वाढवतील अशी अपेक्षाच करता येऊ नये. असे नेते केवळ स्वत:ची व्यवस्था व सुरक्षा म्हणून सत्ताधाऱ्यांच्या आसऱ्याने राहतील, नंतर वेळ आली की पुन्हा स्वगृही परततील. अर्थात, हा उभयपक्षी गरजेचा मामला आहे. पक्षांतर करणाऱ्यांप्रमाणेच ते करवून घेणाऱ्यांचीही आपली गरज आहे. निवडणुका लढायच्या तर त्यासाठी सक्षम उमेदवार हवे असतात. तेव्हा त्यादृष्टीने व पक्षाचा पाया अधिक विस्तारण्यासाठी आलेल्यांना सामावून घेण्यात शिवसेना व भाजपा या दोन्ही परस्पर सहयोगी पक्षांत अहमहमिका लागलेली दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच भाजपाची वाट धरली. त्या पाठोपाठ विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबईतील सचिन अहिर, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, निर्मला गावित आदी अनेकांनी पक्ष बदल केलेत. छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आदी मातब्बर नेत्यांची नावेही घेतली जात आहेत, त्यातील कोण जाणार व कोण आहे तिथेच राहणार हे लवकरच कळेलही; परंतु एकूणच या घाऊकपणे होत असलेल्या पक्षांतरामुळे शिवसेना, भाजपातील निष्ठावंतामध्ये नाराजी अंकुरणे स्वाभाविक ठरले आहे. आजवर ज्या विरोधकांच्या नावे शंख करून प्रतिकूलतेत पक्षकार्य केले, त्यांनाच पक्षाने पावन करून घेत त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आणून ठेवल्याने पक्षांतर्गत घुसमट वाढली आहे.; पण सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशा अवस्थेतून या निष्ठावंतांची वाटचाल सुरू आहे. परिणामी ‘इन्कमिंग’मुळे आलेली सूज व निष्ठावंतांची नाराजी यातून अपचनासारखी गत झाल्यास आश्चर्य वाटू नये.
महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी असे पक्षप्रवेश सोहळे होताना साधारणपणे स्थानिकांच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत जाण्याची किंवा स्थानिकांना विचारपूस करून निर्णय घेतला जाण्याची दिखाऊ का होईना, पद्धत होती. आता थेट वरिष्ठांचेच बोट धरून भरती होऊ लागल्याने स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. एक काळ असा होता, जेव्हा काँग्रेस दगडाला शेंदूर फासून त्याला निवडून आणू शकत होती. तसाच आत्मविश्वास आता शिवसेना-भाजपात बळावला आहे, त्यामुळे पर पक्षातील नेत्याला आपल्याकडे घेताना पक्ष-संघटनेतील स्थानिक लोकांचे मत विचारात घेण्याची कुणालाही गरज वाटत नाही. अशावेळी खरे तर मतदारांची जबाबदारी वाढून जाते. कारण त्यांना गृहीत धरून हे सर्व चाललेले असते. यात ना निष्ठेचा कुठे संबंध असतो, ना पक्ष कार्याचा वा विचारधारेचा. जो असतो तो परस्पर सोयीचा मामला. त्यासाठीच राजकीय स्थलांतरे घडून येत असतात. तेव्हा, संधीच्या शोधार्थ व पक्षांच्याही विस्तारार्थ घडून येणारे राजकीय निष्ठांचे अध:पतन म्हणून याकडे पाहिले जाणे गैर ठरू नये.