पर्यावरण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवाच्या जीवनाची सुरक्षा व समृद्धी दोन्हीसाठी पर्यावरणाची आवश्यकता आहे. पर्यावरण वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार पर्यावरण संकटात असल्याने पूर्ण मानव जगताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ग्लोबल वार्मिंग किंवा विश्वात वाढलेली उष्णता यासाठी जबाबदार आहे. भारतीय शास्त्रात पर्यावरणाचे महत्त्व विस्तृतपणे सांगितलेले आहे. जंगल, वृक्ष तसेच प्राणी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भारतीय तत्त्वज्ञानात पंचमहाभूतांची चर्चा आलेली आहे. ही पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नि, वायू व आकाश. ही पंचमहाभूते या विश्वाचा आधार आहे. पृथ्वीने विश्वाला सांभाळलेले आहे. त्याची शुद्धता मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी अनिवार्य आहे. याच मातीतून अन्न तयार होते, ज्यामुळे मानव जिवंत राहतो. याच मातीपासून रोपटे व झाडे तयार झालेली आहेत. त्यामुळेच पृथ्वीला माता संबोधलेले आहे. याचप्रमाणे पाणी जीवनाचा आधार आहे. त्याची शुद्धता आरोग्य व समृद्धीसाठी आवश्यक आहे. अग्नि असे महाभूत आहे, जे अन्नाला पचवून खाण्यालायक बनवते व हीच अग्नि सूक्ष्म रूपात ऊर्जेच्या सर्व स्रोतामध्ये असते. वायू सर्व प्राणिमात्रास जिवंत ठेवतो. आकाश सूक्ष्मतम महाभूत आहे, ज्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. या पंचमहाभूतांची प्रार्थना यासाठी केली जाते की, प्रत्येक मानवाला त्याचे महत्त्व कळायला हवे व तो त्यांच्या महत्त्वाप्रति जागरूक असला पाहिजे. वैदिक साहित्यामध्ये शांतिमंत्रात आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, जल, औषधी, वनस्पती इ. सर्वांच्या शांतीची प्रार्थना केलेली आहे.‘सर्व: शान्ति: शान्तिरेव शान्ति:सा मा शान्तिरेघि।’या व्यतिरिक्त भारतीय संस्कृतीने पर्यावरणाला जे महत्त्व दिले आहे, ते अनेक ठिकाणी उघड होत असते. भारतीय लोक वृक्षांना पूज्य मानतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते व त्याला पवित्र मानले जाते. गंगा, सिंधू, गोदावरी इ. नद्यांना माता म्हटले गेले आहे. पूर्ण संस्कृत तसेच प्राचीन भारतीय साहित्य निसर्ग प्रेमाने भरलेला आहे. आद्यकवी वाल्मीकीचे रामायण तर वनातच लिहिले गेले. कवी कालिदास यांनी रचलेले जगप्रसिद्ध नाटक अभिज्ञानशाकुन्तलम्ची नायिका तर निसर्ग-कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’’अर्थात, पृथ्वीच्या संरक्षणासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने अनेक कायदे बनविलेले आहेत. परंतु प्रत्येक व्यक्ती या बाबतीत जागरूक झाली तरच पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.-डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पर्यावरण
By admin | Published: February 28, 2017 12:00 AM