श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजीराजांनी सर्व जातीधर्मातील मावळ्यांना संघटित करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांनी प्रजेला न्याय दिला. शेतकऱ्यांचे हित जोपासले. सर्व जातीधर्मातील स्त्रियांचा आदर, सन्मान करून त्यांना संरक्षण दिले. त्यांचा लढा राजकीय होता, धार्मिक नव्हता. ते विज्ञानवादी होते. आपल्या विरोधकांच्या महिलांचादेखील आदर, सन्मान केला पाहिजे, या त्यांच्या सक्त सूचना होत्या. शिवरायांचे स्वराज्य लोककल्याणकारी होते. त्यांनी जसे प्रजेचे हित जोपासले तसेच त्यांनी पिके, वृक्षांचेदेखील हित जोपासले. शेतकऱ्यांच्या पिकांची तसनस (नासधूस) करू नये, असा त्यांचा दंडक होता. शिवाजीराजांनी चिपळूणच्या जुमलेदाराला लिहिलेल्या पत्रातून त्यांचा गवत, लाकूड याबाबत संवेदनशील दृष्टिकोन दिसून येतो. गवत, लाकूड याला आग लागली तर ते जळून खाक होईल व अपरिमित हानी होईल. अगदी गर्दन कापल्यासारखे होईल, असा उल्लेख शिवाजीराजे करतात. पीकपाणी, गवत, लाकूड यांची हत्या म्हणजे मनुष्यवध आहे, अशी शिवाजीराजांची भूमिका होती, हे त्यांच्या १९ मे १६७३च्या पत्रावरून स्पष्ट होते.
शिवाजीराजे आज्ञापत्रात झाडांचे महत्त्व सांगतात. शिवाजीराजांच्या आज्ञा सांगणारे राजपत्र रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहून ठेवले आहे. शिवाजीराजे सांगतात, ‘‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडो न द्यावी.’’ गडाची राखण करण्यासाठी सैन्य जेवढे महत्त्वाचे असते, त्याप्रमाणेच पर्वतरांगांमध्ये असणारी दाट झाडी गडांचे रक्षण करते. ही झाडे प्रयत्नपूर्वक वाढवावीत अशी आज्ञा शिवाजी महाराज देतात. त्या झाडाची एकही फांदी तोडू नये, अगदी काठी करण्यासाठी जेवढी फांदी लागते तेवढी फांदीदेखील तोडू नये, अशा सक्त सूचना शिवाजीराजे देतात. शिवाजीराजे पुढे सांगतात, ‘‘गडावर झाडे जी असतील ती राखावी. याविरहित जी जी झाडे आहेत फणस, चिंचा, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष निंब, नारिंगे, आदिकरून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्षवल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे, समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजनास येतील.’’ गडावर जी अगोदरची झाडे असतील त्याचे रक्षण करावे, त्याला इजा करू नये, ती तोडू नयेत, अगदी ती आपल्या उपयोगाची नसतील तरी ती तोडू नयेत़ फुलांच्या झाडांचीदेखील लागवड करावी. वेगवेगळ्या वेलींची लागवड करावी, उपयोगी, निरुपयोगी असा विचार न करता सर्व प्रकारच्या झाडांची, फुलांची, वेलींची लागवड करून थांबू नका, त्या झाडांचे रक्षण करा, ही झाडे भविष्यकाळात नक्की उपयोगात येतात, असे शिवाजीराजे आज्ञा करतात. झाडांचा उपयोग गडांच्या रक्षणासाठी होतो, औषधांसाठी होतो, आपल्याला फळे मिळतात, फुले, भाजीपाला मिळतो व पर्यावरणरक्षण होते, असे शिवरायांचे मत होते़
एका आज्ञापत्रात शिवाजीराजे म्हणतात, ‘‘आरमारासाठी जर लाकडे आवश्यक असतील तर हुजुराची परवानगी घेऊन सागवान घ्यावे किंवा परमुलुखातून खरेदी करून आणावीत.’’ स्वराज्यातील किंवा परराज्यातील लाकूड रीतसर मार्गाने आणावीत, अवैध मार्गाने आणू नयेत, अशा सक्त सूचना शिवाजीराजांनी आपल्या अधिकाºयांना दिल्या. पुढे ते सांगतात, ‘‘स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त असतात, परंतु त्यास हात लावू नये. कारण ती एक-दोन वर्षात येत नाहीत, रयतेने त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वर्षानुवर्षे अगदी अनादि काळापासून जपलेली असतात, वाढवलेली असतात. झाडे तोडली तर धन्याच्या (राज्याच्या राज्यकर्त्याच्या) पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो, असे शिवाजीराजे म्हणतात. झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पीडा देणे होय, असे शिवाजीराजांचे मत आहे. लाकूड हवे असेल तर एखादे झाड खूप जीर्ण (जुने) झालेले असेल व ते कामातून गेले असेल तर ते त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याला योग्य आर्थिक मोबदला देऊन, त्याला आनंदी करून तोडून द्यावे. बळजबरीने ते घेऊ नका.’’ अशा स्पष्ट सूचना शिवाजीराजांनी दिलेल्या आहेत.
आपल्या लेकराप्रमाणे झाडांना सांभाळा, त्यांना पीडा देऊ नका, त्यांची लागवड करा, असे विचार शिवाजीराजांचे होते. पर्यावरणाचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. ही शिवाजीराजांची भूमिका होती. लढाई करणारे, रणांगण गाजविणारे शिवाजी महाराज सर्वांनाच ज्ञात (माहीत) आहेत, परंतु स्वराज्यातील आणि परराज्यातील झाडांचे संरक्षण झाले पाहिजे, ही स्पष्ट भूमिका घेणारे शिवाजी महाराज किती लोकांना माहिती आहेत? आज जगभरात औद्योगिकीकरणासाठी जंगल भस्मसात होत आहेत. झाडांची कत्तल होत आहे, भांडवलदारांचा डोळा जंगलांवर आहे. अॅमेझॉन आणि आॅस्ट्रेलियातील जंगले अनेक महिने जळत होती. विकासाच्या नावाखाली जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. झाडांची कत्तल करून पर्यावरण संपले तर मानवजातही संपेल. कारण मानव हा पर्यावरणाचाच एक घटक आहे. त्यामुळे वृक्ष, पुष्पवृक्ष, वेलींचे संरक्षण झाले पाहिजे. शिवाजी महाराज हे महान पर्यावरणरक्षक होते, त्यांचा आदर्श आपण ठेवूया!(लेखक इतिहास अभ्यासक आहेत )