शनिशिंगणापूरच्या देवस्थानातील चौथऱ्यावरून होणाऱ्या पूजेत स्त्रियांनाही सहभागी होता यावे या मागणीवरून देवस्थान व महिला कार्यकर्त्या यांच्यातला वाद आपण एका चुटकीसरशी सोडवू अशा अविर्भावाने त्यांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत भाग घ्यायला आलेले श्री श्री हे दुहेरी बिरुद लावणारे पद्मविभूषण रविशंकर पार फुसके निघाले आणि त्यांचा तोडगा कुणी मान्यही केला नाही. समाजाचे नवे प्रश्न त्याच्या जुन्या गुरुंना सोडविता येत नाहीत. ते त्यांनी सरकारला, लोकांच्या प्रतिनिधींना किंवा न्यायालयांनाच सोडवू दिले पाहिजेत. त्यातही ते सुटले नाहीत तर समाज त्याची उत्तरे स्वत:च शोधतो आणि पुढे जातो. शनीच्या पूजेपासून स्त्रियांना वंचित राखले जाऊ नये, त्यांनाही पुरुषांप्रमाणेच शनीच्या चौथऱ्यावर चढून त्याची पूजा करता यावी ही आंदोलनकर्त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती. देवस्थानचे पुजारी मात्र तिला विरोध करण्यासाठी एकवटले होते. आपल्या विरोधाला बळकटी यावी म्हणून त्यांनी आपल्या मताच्या काही महिलांना मंदिराच्या व्यवस्थापन मंडळावर घेऊन त्यांना ‘आम्ही तशी पूजा करणार नाही’ असे वक्तव्य द्यायला भाग पाडले होते. त्यातून हा वाद वाढला आणि वातावरण तापले तेव्हा सगळ््या जगाला शांततेचा उपदेश करणारे श्री श्री रविशंकर यांना त्यात सहभाग सापडला व आपल्या अध्यात्मिक वजनाच्या बळावर तो निकालात काढू असे त्यांना वाटू लागले. प्रत्यक्षात त्यांचा तोडगा स्त्रियांएवढाच पुरुषांवरही अन्याय करणारा निघाला व तो कुणी मान्य केला नाही. श्री श्रींचे म्हणणे असे की स्त्रियांना चौथऱ्यावर प्रवेश नसावा तसा तो पुरुषांनाही नसावा. त्यावर फक्त अधिकृत पुजाऱ्यांनाच जाता यावे. तिरुपतीच्या बालाजीचे किंवा जगन्नाथ पुरीच्या भगवंताचे दर्शन जसे दुरून घेतले जाते तसे शिंगणापूरच्या शनीचे दर्शनही साऱ्यांनी दुरुनच घ्यावे असे त्यांचे म्हणणे होते. साऱ्यांवर सारखाच अन्याय केला की तो न्याय होतो असा हा या श्री श्रींचा अजब तर्क आहे. स्त्रियांना प्रवेश नसलेली पूजास्थाने व अन्य ठिकाणे पुरुषांनाही बंद केल्याने असे वाद संपतात हा समजच मुळात चुकीचा, समाजाला मागे नेणारा आणि स्त्रियांएवढ्याच पुरुषांच्याही पायात बेड्या घालणारा आहे. (त्यातून या मंदिरात विशिष्ट रक्कम देणाऱ्या पुरुषांनाच चौथऱ्यावर येण्याचा अधिकार असल्याने तो मंदिराच्या व्यवस्थापनावरही आर्थिक अन्याय करणारा होता.) देव, मंदीर व पूजास्थाने ही श्रद्धेची ठिकाणे आहेत आणि श्रद्धा बाळगणे स्त्रियांचा हक्कच नव्हे तर स्वभावही आहे. देशातील बहुतेक सगळीच मोठी व प्रसिद्ध मंदिरे त्यांना खुली आहेत. एकेकाळी ज्या मंदिरात दलिताना प्रवेश नव्हता त्या मंदिरांनीही त्यांची माफी मागून आपले दरवाजे आता खुले केले आहेत. श्रद्धेबाबत समता स्थापन करण्याचाच हा मार्ग आहे. अशावेळी शनीचे मंदिर स्त्रियांसाठी दूरचे करणे आणि ते तसे रहावे म्हणून पुरुषांनाही दूरचे ठरविले जाणे हा श्री श्रींचा प्रस्तावच मुळी हास्यास्पद, कालविसंगत आणि त्यांच्या आजवरच्या भूमिकांच्या विरोधात जाणारा आहे. पण श्री श्रींचे किंवा त्यांच्यासारख्या बाबांचे अशा विसंगतीने काही बिघडत नाही. त्यांचे चेले व भगत त्यांना घट्ट धरून असतात. काही काळापूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आपण थांबवू अशी वल्गना करून हे श्री श्री त्या प्रदेशाच्या दौऱ्यावर आले. त्यात त्यांनी दोन तीन सभा घेतल्या. त्या सभांमध्ये ‘मी आत्महत्त्या करणार नाही’ असे श्रोत्यांना त्यांनी आपल्या मागून म्हणायला लावले. माध्यमांनी त्यांच्या या योगशक्तीचा व त्यांच्या मानवी दृष्टीचा तेव्हा प्रचंड उदोउदो केला. पुढे श्री श्री आपल्या गंतव्यस्थानी गेले आणि इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या सुरुच राहिल्या. २०१५ मध्ये विदर्भात एक हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचे आता सरकारनेच जाहीर केले आहे. पण आत्महत्त्यांच्या गदारोळात श्री श्रींचे दिव्यत्व मात्र जराही कमी झाले नाही आणि त्यांचे भगत त्यांच्या दिव्य शक्तीने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या कमी झाल्याचे सांगतानाही दिसले. शनिशिंगणापूरच्या महिला आंदोलनाने मुंबईतील मुस्लीम महिलाना तशा आंदोलनाची प्रेरणा दिली व हाजी अलीच्या दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी घेऊन त्या पुढे आल्या. ही आंदोलने थांबत नाहीत. विझत नाहीत. ती पसरत असतात. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या प्रेरणांमध्येच तसे वाढत जाण्याची अंगभूत क्षमता असते. श्री श्री सारख्यांना जमत असेल तर त्यांनी या ताकदीचे महत्त्व ओळखून ती वाढेल असा प्रयत्न करावा. अन्यथा काहीएक न करता तिथल्या महिलाना त्यांचा लढा लढू द्यावा. मध्य प्रदेशचे एक मंत्री बाबूलाल गौर यांचे म्हणणे असे की बायकानी घरात बसूनच पूजा करावी. श्री श्री सारख्यांच्या गमजा अशा बाबूलालांचेच बळ वाढवितात हे येथे स्पष्टपणे नोंदविले पाहिजे. शिवाय आजची स्त्री शनिशिंगणापूरच्या चौथऱ्याच्या व हाजी दर्ग्याच्या फार पुढे निघून गेली आहे हेही त्यांना सांगितले पाहिजे.
अन्यायाचे समन्यायी वाटप
By admin | Published: February 09, 2016 3:47 AM