- डाॅ. अनिल राम सुतार(प्रसिद्ध शिल्पकार )राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभे करणं ही किती गांभीर्यपूर्वक करण्याची गोष्ट आहे? आपल्या आई-वडिलांची, आजी-आजोबांची आठवण म्हणून, त्यांचा सन्मान म्हणून आपण त्यांचे फोटो घरात लावतो. उत्तर भारतात लोक आपल्या आई-वडिलांचे पुतळे संगमरवरात बनवून समाधी तयार करतात. गेलेल्या व्यक्तीची आठवण जपण्याचा हा प्रयत्न असतो. कर्तृत्वाने उत्तुंग माणसांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतळे उभारणं ही काळाची गरजच म्हटली पाहिजे. नवीन पिढीसमोर कर्तृत्ववान व्यक्तीची प्रतिमा पुतळ्यातून उभी राहाते. पुतळे उभारताना त्या व्यक्तीबद्दलच्या आदरासोबतच पुतळे उभारण्यामागचा विचार, उद्देश भक्कम असणंही आवश्यक आहे.
..पण हल्ली अगदी गल्लीबोळात पुतळे उभारले जातात, त्यात गांभीर्यापेक्षा हौस जास्त दिसते.. - ज्या व्यक्तीबद्दल आदर आहे, तिचा पुतळा उभारणं ही कृती हौशी पातळीवर आली की त्यामागचं गांभीर्य हरवतं. पुरेशी आर्थिक ताकद नसते, म्हणून मग घाईघाईत स्वस्तातले, कसेही बनवलेले काँक्रीटचे पुतळे उभारले जातात. ते ओबडधोबड असतात आणि दिसतातही तसे. हा त्या व्यक्तीचा सन्मान नसून अवमानच म्हटला पाहिजे. छोट्या गल्लीबोळात, चौकाचौकात ठिकठिकाणी पुतळे उभारणं योग्य नाही. असं करून आपण त्या महापुरुषांचं, त्यांच्या कर्तृत्वाचं मोल-महत्त्व कमी करत असतो.
छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारताना संबंधित लोकांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? - पुतळा दीर्घकाळ टिकावा ही तर प्राथमिक अपेक्षा असते. धातूचे पुतळे दीर्घकाळ टिकतात. मोहेंजोदडो येथील उत्खननात ब्राॅन्झचे जे पुतळे मिळाले ते पाच हजार वर्षं जुने होते. इतकी वर्षं जमिनीत गाडलेले असूनही ते सुस्थितीत मिळाले ते त्या धातूच्या वैशिष्ट्यामुळे. ब्राॅन्झचे पुतळे नि:संशय भक्कमच आहेत. उपलब्ध प्रतिमा, छायाचित्रांचा वापर करून शिल्प तयार करताना त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व योग्य पद्धतीने उतरतंय ना हे बघणं ही अतिशय जोखमीची जबाबदारी आहे. लोकमानसात त्या व्यक्तीची जी प्रतिमा आहे, ती त्या पुतळ्यात ‘उतरणं’ फार महत्त्वाचं! या पातळीवर उन्नीस-बीस इतकाही फरक क्षम्य मानू नये. पाच मजली इमारत बांधायची असेल तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा वापर अनिवार्य असतो. त्यात स्टील स्ट्रक्चर डिझाइन करून मग बांधकाम केलं जातं. स्थानिक हवामान, कमाल आणि किमान तापमान, डोंगर-दरी अगर समुद्राचं सानिध्य या बाबींबरोबरच भूकंपाचासुध्दा विचार केला जातो. हीच प्रक्रिया भव्य पुतळे उभारतानाही अपेक्षित असते. तीन फुटांचे लहान पुतळे कुठेही उभारले तरी चालतात. ज्याचा चबुतरा चांगला बांधला ते पुतळे चांगले टिकतात. माझे वडील ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा तयार केला, तेव्हा तिथलं हवामान, वाऱ्याची सर्वसाधारण दिशा आणि वेग, वादळं, भूकंपाच्या शक्यता अशा अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला गेला. आता आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंचीचा पुतळा तयार करतो आहोत, ते डिझाइनही याच सगळ्या प्रक्रियांमधून जातं आहे. आम्ही पुतळे तयार करताना SS३०४ या स्टेनलेस स्टीलचा वापर करतो. ब्राॅन्झप्रमाणेच दीर्घकाळ टिकणारं हे मटेरिअल आहे. पुतळ्यांमध्ये त्याचा वापर व्हावा, असा सल्ला मी कायम देतो.
राजकोट किल्ल्यावर झालेली दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी? - भव्य पुतळे उभारताना शिल्पकारासोबतच इतर तांत्रिक गोष्टींमध्ये तज्ज्ञता असलेली टीम हवी. पुतळा ज्या व्यक्तीचा आहे, त्या क्षेत्रातले जाणकार, अभ्यासक, कला समीक्षक या सर्वांच्या नजरेखालून पुतळ्याची ‘माॅडेल प्रतिकृती’ गेली पाहिजे. ‘माॅडेल’ला सर्वांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच मोठी प्रतिकृती तयार करायला हवी. पुतळा जिथे उभारला जाणार त्या ठिकाणचं वातावरण, हवामान, वादळांची शक्यता, वाऱ्याचा वेग आदी गोष्टींचा विचार करून मगच पुतळ्याच्या आतील संरचनेसाठीची सामग्री निवडायला हवी. हे फार काळजीने करायचं जोखमीचं काम आहे, याचं भान कधीही सुटता कामा नये! मुलाखत : माधुरी पेठकर