शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

Editorial: एरिक्सन, गेट वेल सून!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:43 AM

जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते.

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनच्या टेलिया पार्कन फुटबॉल स्टेडियमवरील सोळा हजारांवर प्रेक्षक आणि युरो चषकाच्या ब गटातील डेन्मार्क विरुद्ध फिनलंड लढत टीव्ही, ओटीटीवर पाहणाऱ्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या काळजाचा ठोका शनिवारी चुकला. सामन्याचा पूर्वार्ध संपायला आलेला असताना, ४२ व्या मिनिटाला यजमानांचा मधल्या फळीतला खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन एक थ्रो-इन घेताना अचानक कोसळला. शरीराची हालचाल बंद झाली. भांबावलेले संघ सहकारी धावले. पंचांनी खेळ थांबविला. संघाचे प्रशिक्षक कॅस्पर हजुलमंड, वैद्यक चमूतील मार्टिन बोसन व सहकारी धावले. निपचित पडलेला एरिक्सन बेशुद्ध होता. हृदयाचे ठोके थांबले होते. कृत्रिम श्वासोछ्वास देण्यात आला. त्याने तो थोडा शुद्धीवर आला. त्याला इस्पितळात हलविण्यात आले. यादरम्यान,  डॅनिश खेळाडूंनी एरिक्सनभोवती केलेले कडे व उमदा सहकारी वाचावा म्हणून केलेला परमेश्वराचा धावा पाहून जग स्तब्ध झाले.

एरव्ही, आपल्या संघाच्या समर्थनार्थ हाणामारीवर उतरणारे प्रेक्षक भावुक झाले होते. सामना स्थगित झाला. मैदानावर चिटपाखरू नव्हते. तेव्हा एरिक्सनच्या प्रकृतीबद्दल खुशालीची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांपैकी पाहुणे फिनिश समर्थक पार्कन स्टेडियमच्या एका बाजूने ‘ख्रिश्चियन’ अशी साद घालत होते. दुसऱ्या बाजूने यजमान डॅनिश समर्थक ‘एरिक्सन’ असा प्रतिसाद देत होते. नंतर युरोपियन फुटबॉल संघाने, डेन्मार्कच्या संघटनेने बातमी दिली, की इस्पितळात पोचल्यानंतर एरिक्सन शुद्धीवर आला. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. थांबलेला सामना दोन तासांनंतर सुरू झाला. त्याही मनोवस्थेत खेळाडू खेळले. एका गोलाच्या फरकाने पाहुण्यांनी युरो चषकातील पहिला विजय नोंदविला. शेकडो किलोमीटर दूर रशियातील सेंट पिटसबर्ग इथल्या स्टेडियमवर बेल्जियम विरुद्ध रशिया सामन्यात आणखी एक भावुक क्षण अनुभवास आला. एरिक्सन हा इटलीतल्या इंटर मिलान क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. त्याचा तिथला संघ सहकारी रोमेलू लुकाकू बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदविल्यानंतर टीव्ही कॅमेऱ्याकडे धावला आणि ‘ख्रिस, ख्रिस आय लव्ह यू!’ म्हणत तो गोल त्याने आपल्या मित्राला अर्पण केला. - हे सगळे क्षण वेदनादायी असले तरी त्यांच्या मालिकेने गेले काही महिने कोरोना महामारीमुळे जगावर दाटलेले निराशेचे मळभ जणू दूर झाले. विषाणूशिवाय अन्य विषयावर लोक भावुक होतात, हे स्पष्ट झाले.

खेळता खेळता मैदानावर खेळाडू कोसळण्याची ही काही पहिली घटना नाही. कॅमेरूनचा मार्क व्हिवियन फो, स्कॉटलंडचा फिल ओडिनल, आयव्हरी कोस्टचा चेईक टिओट हे मैदानावरच कोसळलेेले व जग सोडून गेलेले फुटबॉलपटू किंवा आपल्या गोव्यामध्ये २००४च्या डिसेंबरमध्ये ब्राझीलच्या ख्रिस्तियानो ज्युनिअर या उगवत्या ताऱ्याचा डेम्पोकडून खेळताना झालेला अंत, अशा अनेक घटना आधी घडल्या आहेत. एकतर फुटबॉल, रग्बी वगैरे खेळांसाठी प्रचंड शारीरिक क्षमतांची गरज असते. त्याचप्रमाणे खेळातून निर्भेळ आनंद दुर्मिळ झाला असून विजय ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. आपण ज्याचे समर्थन करतो, त्या खेळाडूचा किंवा त्याच्या संघाचा पराभव चाहत्यांना मानहानीसारखा वाटतो. मग अद्वितीय कामगिरीसाठी एखाद्या खेळाडूला कधी देवत्व बहाल करायचे तर तोच अपयशी ठरला की त्याच्या घरावर दगडफेक करायची, छायाचित्राची विटंबना करायची, असे टोकाचे प्रेम व तितक्याच टोकाचा राग चाहते व्यक्त करतात. चाहत्यांच्या या प्रेमाच्या दडपणामुळे स्पर्धा अतितीव्र बनते. तिच्यात टिकून राहण्यासाठी खेळाडूंना शारीरिक व मानसिकदृष्ट्या खंबीर राहावे लागते. हे दडपण व ताण खेळाडूंना कधी कधी सहन होत नाही. विजय-पराजयाच्या भावनेपलीकडे निव्वळ खिलाडूवृत्तीने खेळले जाणारे खेळ माणसांमध्ये खेळभावना, सद्भावना व संघभावनाही रुजवितात. संकटसमयी, प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडताना आवश्यक असणारी जिद्द व लढाऊ बाणाही खेळातून येतो आणि यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी गरजेची असणारी विजिगिषू वृत्तीही खेळाच्या मैदानावर जन्म घेते. म्हणूनच खेळ हा माणूसच काय सगळ्याच प्राण्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो.

जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते. मग प्रांत, देश, भाषा, धर्म वगैरे सगळ्या माणसांनी उभ्या केलेल्या भिंती पाडून क्रीडारसिक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातला माणूस एक होतो. ‘एरिक्सन, गेट वेल सून’ अशी सोशल मीडियावर प्रार्थना करतो.

टॅग्स :FootballफुटबॉलDenmarkडेन्मार्क