एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपताना ज्या दोन नेत्यांनी तमाम भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, त्यापैकी एक नरेंद्र मोदी आणि दुसरे अरविंद केजरीवाल ! पुढे मोदी पंतप्रधान पदावर, तर केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. पूर्ण राज्याचा दर्जा नसलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर केजरीवाल कधीच खूश नव्हते. त्यांची नजर पंतप्रधान पदावर होती आणि आताही आहे. त्यांनी ते दडविण्याचा प्रयत्नही केला नाही; मात्र आज कारकिर्दीचा जवळपास अर्धा टप्पा पूर्ण झाला असताना, त्यांचे ते स्वप्न मुठीतील वाळूप्रमाणे निसटू लागल्यासारखे भासू लागले आहे. राष्ट्रबांधणीच्या ध्येयाने भारून, भ्रष्टाचारविरोधी लढ्याला आयुध बनवून राजकीय समरांगणात उडी घेतलेल्या केजरीवालांच्या प्रामाणिकपणावरच आज शंका घेतली जाऊ लागली आहे. त्यांनी क्षणभर उसंत घेऊन मागे वळून बघितल्यास, अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात हिरिरीने सहभागी झालेला स्वप्नवेडा, ध्येयवेडा तरुण कधीच हरपल्याची जाणीव त्यांना स्वत:लाच होऊ शकते. अर्थात ते हे कधीच मान्य करणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केजरीवालांवर गुदरलेल्या मानहानीच्या खटल्यात केजरीवालांची बाजू मांडत असलेले प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या मानधनाच्या मुद्द्यावरून केजरीवालांच्या प्रतिमेला जबर धक्का बसला आहे, हे मात्र त्यांचे समर्थकही मान्य करतील. दिल्लीची सत्ता मिळाल्यावर गाडी, बंगला इत्यादी शासकीय सुविधा घेणार नसल्याचे सांगणारे केजरीवाल आता त्यांच्या वैयक्तिक खटल्याचा खर्चही दिल्ली सरकारला करायला सांगू लागले आहेत, याला नैतिक अध:पतन नव्हे तर काय म्हणावे? यापूर्वी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी, दिल्ली सरकारने देशभरातील प्रसारमाध्यमांना दिलेल्या जाहिरातींची ९७ कोटी रुपयांची रक्कम केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेही केजरीवाल व त्यांच्या पक्षाची भरपूर शोभा झाली होती. त्यामध्ये आता भर पडली आहे. सार्वजनिक जीवनातील सचोटी व प्रामाणिकपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला हे खचितच शोभणारे नाही. प्रारंभी केजरीवाल व त्यांच्या पक्षाभोवती जे नैतिकतेचे प्रभामंडळ शोभत होते, ते आता पार निस्तेज भासू लागले आहे. केजरीवालांकडे पैसा नसल्यास मोफत खटला लढविण्याच्या राम जेठमलानी यांच्या वक्तव्याचा आधार आता आम आदमी पक्ष घेऊ लागला आहे; पण थेंबाने गेलेली इज्जत हौदाने परत येत नसते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. दिल्लीच्या जनतेने फार मोठ्या अपेक्षेने केजरीवालांच्या हाती सत्ता सोपवली होती. उर्वरित देशातील जनताही राजधानीतील जनतेने केलेल्या प्रयोगाकडे मोठ्या अपेक्षेने बघत होती. दुर्दैवाने केजरीवाल यांनी मात्र त्यांचे पायही मातीचेच असल्याचे सिद्ध करण्यातच धन्यता मानली, असेच आता म्हणावे लागेल!
यांचेही पाय मातीचेच!
By admin | Published: April 06, 2017 12:13 AM