‘क्रांतिरथ एक वाहन नही है, एक विचारधारा है! मुलायमसिंह जीवित रहेें या न रहें, क्रांतिरथ चलता रहना चाहिए!’ असे उद्गार १९८७ च्या ऑक्टोबरमध्ये मुलायमसिंह यादव यांनी क्रांतिरथ यात्रेवर हल्ला झाला तेव्हा काढले होते. मुलायमसिंह यादव यांना लखनौ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नेताजी म्हणून संबोधले जात असे. बोफोर्सप्रकरणी दलालीच्या आराेपाने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजवटीवर शिंतोडे उडत होते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातही चौधरी चरणसिंह यांच्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मुलायमसिंह यादव यांनी आपले गुरुवर्य जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया आणि राजनारायण यांच्या शिकवणीनुसार बिगर काँग्रेसवादाची आघाडी उत्तर प्रदेशात उघडली होती. तत्पूर्वी मुलायमसिंह उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एक दमदार विरोधी पक्षनेता म्हणून उदयास येत होते. मात्र, क्रांतिरथ यात्रेने त्यांना बिगर काँग्रेस पक्षांच्या आघाडीचे ‘नेताजी’ बनविले. त्या यात्रेला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
लखनौमध्ये या यात्रेच्या सभेला दहा लाख लोक जमले होते. अनेक राष्ट्रीय नेत्यांनी त्या सभेत मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाचा गौरव केला होता. तेव्हापासून या देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील आणि निर्णायक अशा उत्तर प्रदेश राज्याच्या केंद्रस्थानी मुलायमसिंह यादव राहिले. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करीत मुलायमसिंह जनता दलातर्फे प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री झाले. उत्तर प्रदेशात नेताजींच्या रुपाने नवे नेतृत्व उभे राहिले असतानाच त्यांना धक्का देऊन बिगर काँग्रेसवादाची जागा घेण्यास कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपही प्रयत्नशील होता. परिणामी पुढील तीन दशके भाजप विरुद्ध मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखालील अगोदर जनता दल आणि नंतर त्यांनीच स्थापन केलेला समाजवादी पक्ष असा संघर्ष होत राहिला. राममंदिर, बाबरी मशीद आणि मंडल आयोग या राजकारणाची रणभूमीच उत्तर प्रदेश होती. त्या संघर्षात मुलायमसिंह नेहमी आघाडीवर राहिले. १९९२ मध्ये वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्यानंतर मुलायमसिंहांनीच भाजप विरोधातील आपला लढा अधिक तीव्र केला. बरोबर एका वर्षाने झालेल्या विधानसभा निवडणुकीत काशीराम यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाशी प्रथमच समाजवादी पक्षाने आघाडी केली. परिणामी भाजपचा पराभव करण्यात नेताजींना यश आले. ते पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरुढ झाले. ते तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अनेक वर्षे विरोधी पक्षनेता राहिले. १९९६ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. केंद्रात एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार आले. त्यात संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मुलायमसिंह यादव यांच्याकडे आली होती. दहावेळा विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या नेताजींनी लोकसभेच्या देखील सातवेळा निवडणुका जिंकल्या होत्या. मैनपुरी, कनौज, आझमगढ अशा विविध मतदारसंघातून ते लाेकसभेची निवडणूक लढवत आणि सहज विजयी होत असत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ते निवडून आले. संसदेच्या राजकारणात एक वजनदार आणि अनुभवी नेता म्हणून नेताजींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुलायमसिंह यादव यांचा मूळ पिंड हा नेहमी ग्रामीण शेतकरी वर्गाचा राहिला. सत्तेवर असताना त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या संघर्षाच्या राजकारणात शेतकरी वर्गानेही त्यांना नेहमी साथ दिली. त्या जोरावर त्यांनी बिगर काँग्रेस-बिगरभाजपा आघाडीच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील राजकारण पूर्ण नसे, असा एक काळ देशाने पाहिला आहे. जनता पक्ष आणि जनता दल यांच्यातील फाटाफुटीला कंटाळून मुलायमसिंह यांनी समाजवादी पक्षाच्या रुपाने नवा पर्याय दिला. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आजही हाच पक्ष नेताजींचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ भाजपला पर्यायी विरोधक म्हणून उभा आहे. याचे सारे श्रेय नेताजींना जाते. देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे राजकारण एकहाती यशस्वीपणे लढण्यात मुलायमसिंहांचे मोठे योगदान आहे. मृदू भाषिक, आक्रमक शैली असलेले मुलायमसिंह सामाजिक ऐक्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले. हिंदीचा अभिमान बाळगणाऱ्या जुन्या समाजवाद्यांचे गुण त्यांच्यातही होते. त्यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा असल्या तरी धर्मांध राजकारणाची उघड चर्चा सुरू झाली त्या विरुद्ध लढणारे, शेतकऱ्यांचे नेते म्हणून मुलायमसिंह यादव भारतीय राजकारणात नेहमीच लक्षात राहतील.