जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली. पण त्यापूर्वीच भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाचपैकी चार नोबेल पारितोषिक विजेत्यांनी, मोदींना न मागताच एक चांगला सल्ला दिला आहे. मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात बदल करून, त्याला ‘इन्व्हेंट इन इंडिया’चे स्वरुप द्यावे, हा तो सल्ला! केवळ मोदींनीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने आणि विशेषत: विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असाच तो सल्ला आहे. जगाला शून्य या संकल्पनेची अमूल्य देणगी देऊन आधुनिक विज्ञानाचा पाया रचणाऱ्या भारताला त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात फार काही करता आले नाही, हे बोचरे असले तरी सत्य आहे. आज आम्ही मंगळावर पोहचलो आहोत आणि लवकरच सूर्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे खरे असले तरी त्यासाठी लागणारे कोणतेही मोठे तंत्रज्ञान आपण सर्वप्रथम विकसित केलेले नाही. मानवी जीवन बदलून टाकणारा कोणताही मोठा शोध भारतीयांनी लावलेला नाही. इतरांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाची नक्कल करण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत. प्रा. डेव्हिड ग्रॉस, प्रा. डॅन शेख्तमन, जॉन गॉर्डन आणि सर्ज हॅरॉच या नोबेल विजेत्यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. भारतात उत्पादन होणे भारतासाठी महत्त्वाचे आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, ते इतरांवर विसंबून न राहता भारतात उत्पादन करणे आणि त्यासाठी भारतात शोध लागावे लागतील, असाच त्यांचा सूर होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर आज जवळपास सर्वच क्षेत्रात दबदबा प्रस्थापित केलेल्या अमेरिका व युरोपियन देशांनी तोच मार्ग अवलंबला होता. नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे, शोध घेणे आणि शोध लावणे, याच मार्गाने दीर्घकालीन यशाच्या दिशेने अग्रेसर होता येईल. हे करीत असतानाच उद्यमशीलतेलाही प्रोत्साहन द्यावे लागेल. विद्यापीठात लागलेले शोध उद्योजकांपर्यंत पोहचायला हवेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यानंतर तो माल जगभर पोहचायला हवा. समृद्धी याच मार्गाने येऊ शकते. हे प्रत्यक्षात आणायचे असल्यास शिक्षण प्रणाली मजबूत करावी लागेल, त्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी लागेल, अभियांत्रिकीसोबतच विज्ञान शाखेकडेही लक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ बोलघेवडेपणाने हे होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात प्रचंड काम करावे लागेल.
इव्हेन्ट इन इंडिया
By admin | Published: January 06, 2016 11:19 PM