- गुरुदेव श्री श्री रविशंकर(संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग)
गेल्या दोन वर्षांत आपला उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास कमी झाला आहे. आपल्याला या सगळ्याची पुनर्निर्मिती केली पाहिजे. पण, हे कसे करता येईल? काळाच्या शाश्वत प्रवाहात दरवर्षी नवीन वळणं, उत्साहाची नवी लाट येते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मागील वर्षापासून शिकले पाहिजे आणि स्वतःसाठी एक आणि समाजासाठीही एक हेतू असला पाहिजे. दोन्ही परस्परांशी जोडलेले असतील, तर उत्तमच! आपल्या जीवनात कधीतरी आपल्याला जाणवते की, आपण या पृथ्वीतलावर इतरांच्या भल्यासाठी, प्रत्येकाची सेवा करण्यासाठी आणि काहीतरी विधायक करण्यासाठी आलो आहोत. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नवीन वर्ष म्हणजे नवीन ऊर्जेसह आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आहे.
गर्दीत असलात, तरीही स्वत:च्या ‘आत’ल्या आध्यात्मिक पैलूकडे लक्ष द्या. त्यातून आपुलकी, जबाबदारी आणि मानवतेप्रति काळजीची भावना येते. जात, पंथ, धर्म आणि राष्ट्रीयत्व यांची संकुचित विभागणी प्रभावीपणे दूर सारून सर्वत्र अस्तित्वात असलेल्या जीवनाची व्यापक जाणीव करून देणारा हा आध्यात्मिक पैलू आहे. नवीन वर्षात आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या दोन वर्षांतील महामारी, युद्धे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे आपला उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास कमी झाला आहे. आपण याची पुनर्निर्मिती केली पाहिजे. पण, हे कसे करता येईल? - फक्त एवढेच जाणून असा की, ही शक्ती तुमच्या आत आहे. तुमचे आत्मबल सर्व आव्हानांना पार करू शकते, असा दृढ विश्वास असण्यासाठी ध्यान केले पाहिजे. तुमचे मन शांत असेल तरंच तुमची बुद्धी तीक्ष्ण राहू शकते.
जेव्हा मन क्षुल्लक महत्त्वाकांक्षा, चिंता आणि तापाने भरलेले असते, तेव्हा बुद्धी कुशाग्रता गमावते. जेव्हा बुद्धी आणि निरीक्षण तीक्ष्ण नसते, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीला मर्यादा येतात! विचार प्रवाहित होत नाहीत आणि क्षमताही कमी होते. ही सर्व कुंपणे तुमच्याभोवती घालते, त्या क्षुद्र मनातून बाहेर या. त्यामुळे तुमच्या बहुतेक समस्यांचे निराकरण होईल. प्रेम द्या, प्रेम घ्या, सेवा करा आणि उत्सव साजरा करा! आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याप्रमाणे उन्मुक्त मन तुमच्यापाशी असेल, तर आणि तरंच हे साध्य होऊ शकेल! तर मग कधी करणार हे? - लागलीच! हे एवढेच फक्त तुम्ही स्वतःसाठी करू शकता. समाधानी व्हा. ध्यान करा, नामजप करा आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तुमचे अंतर्मन बलशाली होईल यासाठी प्रयत्न करा. भारताने ‘हर घर ध्यान’ (प्रत्येक घरात ध्यान) अशी हाक दिली आहे. प्रत्येक घरातील प्रत्येकाने ध्यान केले तर लोक मानसिकदृष्ट्या निरोगी राहतील. अन्यथा, एकीकडे लहानसहान मुद्द्यांसाठी आक्रमक होणे किंवा दुसरीकडे भीती आणि अपराधीपणाने ग्रासण्याचा धोका उद्भवतो. आपल्याला दोन्हीपासून मुक्त व्हायचे आहे.
जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे! आपण आपला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि तो सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे! आपण आपले जीवन या दिशेने समर्पित केले, तरंच आपण अधिक अर्थपूर्ण जीवन जगू शकू.या नव्या वर्षी, हे तीन मुद्दे तुमच्या प्राधान्यक्रमात ठेवा - मानसिक आरोग्य, मनाची प्रसन्न स्थिती आणि समाजसेवा.या तिन्ही गोष्टी तुमच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी तुम्हाला मदत करतील! तुम्ही पुढे जात असताना, इतरांनाही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्याल!