- वसंत भोसलेकोल्हापूर महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. भाजपा-शिवसेनेकडे सत्ता आली आहे. संपत्तीही येत आहे. त्यामुळे बळ मिळाले आहे. असा हा चौरंगी समान सामना आहे.राज्यातील कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. परंतु पितृपंधरवडा संपताच शेवटच्या दिवशी (मंगळवारी) अर्ज भरण्यासाठी झुंबड उडेल. कोल्हापूर महापालिकेची यावेळची निवडणूक खूपच वैशिष्ट्यपूर्ण व सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची राहणार असून पक्षांतर्गंत वादानेही ती गाजणार आहे. मावळत्या महापालिकेत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता (३३ सदस्य). त्याचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील करीत होते. त्याखालोखाल राष्ट्रवादीला जागा (२७) मिळाल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी करून पाच वर्षे सत्ता राबविली. राज्यात आणि केंद्रातही पाचपैकी चार वर्षे आघाडीचे सरकार असल्याने सतेज पाटील यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा धडाका लावला. त्यात थोडेफार यशही मिळाले. राष्ट्रवादीची साथही होती. याउलट शिवसेना, भाजपा, जनसुराज्य, आदी पक्षांंची ताकद नगण्य होती. प्रमुख विरोधी पक्ष शिवसेनाच आहे. यावेळच्या निवडणुकीत राजकीय चित्र बदलले आहे. काँग्रेस आघाडीची दिल्ली आणि राज्यातील सत्ता गेली. सतेज पाटील यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. जिल्ह्यात दहापैकी आठ आमदार युतीचे निवडून आले व काँग्रेस शून्यावर बाद झाली. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात दोन आमदार निवडून आणता आले. त्यात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. महापालिकेत एक आकडी सदस्यसंख्या असलेली युती आज केंद्र तसेच राज्यात सत्तेवर आहे. चंद्रकांतदादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मंत्रिमंडळातील पहिल्या चार-दोन मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते, पण पक्षाची ताकद कमी पडते. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीशी भाजपाने युती केली आहे. परिणामी नैसर्गिक मित्र असणारी शिवसेना दुरावली. निवडणुका सुरू होण्यापूर्वीच या पक्षांनी एकमेकांचे उणेदुणे काढत प्रचंड वाद घातल्यामुळे राज्याची सत्ता मिळवणारे पक्ष गल्लीत कसे भांडतात, याचे किळसवाणे चित्र कोल्हापूरकरांना दिसले.भाजपाला स्वबळावर जायचे आहे, पण पुरेसे उमेदवार मिळत नाहीत. शिवाय पक्षाचे शहरातील आमदार अमल महाडिक यांना दूर करायचे नाही. याचे गणित घालत अमल महाडिक यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र लढत आहेत. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. काँग्रेसची मदार एकट्या सतेज पाटील यांच्यावर आहे. आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती ताराराणी आघाडीच्या मागे आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना शहराच्या राजकारणात रस नाही. त्यामुळे पक्ष एकसंघ उभा राहात नाही. केवळ सतेज पाटील एकटे लढत आहेत.राष्ट्रवादीचीही गोची झाली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे आहेत, पण चुलते आमदार महादेवराव (विधान परिषद) आणि चुलत भाऊ आमदार अमल महाडिक यांच्याप्रमाणे ताराराणी आघाडीकडेच जाणार आहेत. कोल्हापूरच्या खासदारांना पक्षाचे काम करणे धर्मसंकट वाटते. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकाकी नेतृत्व माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनाच करावे लागत आहे. त्यांच्याकडे दोन डझन तरी तगडे उमेदवार आहेत. मात्र सत्तेचे पाठबळ बळ नाहीे. महापालिकेतील सत्ताधीश राज्यात विरोधी बाकावर आणि वेगवेगळे झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्ष राज्यात एकत्र सत्तेवर आहेत, पण या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. त्यामुळे यावेळची कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांना आव्हान ठरणारी आणि प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. भाजपा-शिवसेनेकडे सत्ता आली आहे. संपत्तीही येत आहे. त्यामुळे बळ मिळाले आहे. असा हा चौरंगी समान सामना आहे. सर्व पक्षीय प्रतिष्ठेची आणि सर्वांना अनेक विषयांवरून अडचण असणारी ही निवडणूक रंगतदार ठरेल, असे वाटते.