ताकदेखील फुंकून प्यायला हवे’ अशी एक उक्ती समाजात रूढ झालेली आहे. तिचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी वारंवार येऊ लागले आहे. पूर्वी आणि अपवाद वगळता अलिकडचे सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठी आंदोलने, मोर्चे काढायचे. दुसऱ्या दिवशी कोणती प्रसिद्धीमाध्यमे दखल घेतील याविषयी त्यांना काही देणे-घेणे नसायचे. कारण ते करण्यामागे त्यांचा हेतू प्रसिद्धीलोलूप नसायचा. जनहित डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणाऱ्या त्या आंदोलनांना समाजात वेगळे असे महत्त्व आणि जनाधारही मिळायचा मात्र सध्या आंदोलने आणि मोर्चे यांचा वापर एक राजकीय स्टंटबाजी आणि मिडियाचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी केली जाऊ लागली आहेत. सर्वात आधी मिडियाला खबर देऊन केल्या जाणाऱ्या हल्लीच्या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचा उल्लेख केला जात आहे. आधी शनि शिंगणापूर येथील चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करून तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारच्या आंदोलनांना माध्यमे अधिक प्रसिद्धी देतात, संपूर्ण दिवस आपण अनेक वाहिन्यांवर झळकत असतो ही नस ओळखून त्यांनी दुसऱ्यांदा त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील गर्भभृहातही महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी दिवस निवडला तोही महाशिवरात्रीचा. यादिवशी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त याठिकाणी येतात, हे ठाऊक असतानाही देसाई यांनी त्र्यंबकेश्वरकडे येण्याचे जाहीर करून तेथील जनतेला, पोलीस प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही. अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही हा आताच घेण्यात आलेला निर्णय नाही. पिढ्यानुपिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा एका दिवसात खंडित होणे बोलण्याइतके सोपे निश्चितच नाही. देवदर्शनात स्त्री-पुरूष असा भेद नसावा हे मान्य परंतू धार्मिक रूढी-परंपरांशी निगडीत हा प्रश्न चर्चेतून आणि सामोपचाराने सोडविण्याचा विषय आहे. परंतू तसे न होता निवडक महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणे आणि प्रशासनाला वेठीस धरणे उचित नाही. शनिवारी त्र्यंबकमध्ये झालेल्या भूमाता ब्रिगेड आणि देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत गर्भगृहात प्रवेशासाठी धर्मसंसद भरावी असा विचार भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गाताई शुक्रे यांनी मांडला. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असून शेतकरी संकटात असल्याने त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करीत असताना अॅड. देसाई यांच्याकडून सुरू असलेले आंदोलन म्हणजे प्रसिद्धी मिळण्यासाठीची स्टंटबाजी असल्याची टिकाही त्यांनी केली. शुक्रे म्हणतात देसाई यांची आम्ही जानेवारीतच संघटनेतून हकालपट्टी केली तर देसाई म्हणतात मी संघटनेची संस्थापक अध्यक्ष असताना हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून माझी बदनामी करणारे माझी हकालपट्टी कशी करू शकतात? अशा एकमेकांवर कुरघोडी करून समाजमनाशी खेळण्यापेक्षा विधायक कार्याद्वारे प्रसिद्धी मिळविणे हेच बरे.