आमच्या जीवाला स्वस्थता नाही, हेच खरं. देशात एकाच दिवशी सगळ्या निवडणुका घेण्याची कल्पना किती सुखद वाटते. पण छे, एवढं कुठलं मेलं आमचं नशीब. आज गुजरात तर उद्या महाराष्ट्र आणि परवा राजस्थान. कुठं गोठवून टाकणारी थंडी, तर कुठं अंगाची लाहीलाही करणारा कडक उष्मा. सारं मुकाट्यानं सहन करायचं कशासाठी, तर म्हणे लोकशाही चिरायू होण्यासाठी. कुठल्या एखाद्या बुथवर एखादीच्या अंगात वारं शिरल्यानं कुठलंही बटण दाबलं तरी एकाच निशाणीला मत दिल्याची चर्चा सुरू होते आणि हा हा म्हणता म्हणता साऱ्यांनाच नाकं मुरडली जातात. आता परवाचंच पाहा. कुठूनकुठून प्रवास करून दमूनथकून निवडणुकीचं ठिकाण गाठलं. लागलीच आम्हा साºया मैत्रिणींना वेगवेगळं करून निवडणूक अधिकाºयांच्या ताब्यात दिलं. हे निवडणूक कर्मचारीसुद्धा बळेबळे दावणीला बांधल्यासारखे काम करतात. त्यांना लागलेल्या ड्युटीचा राग आमच्यावर काढतात. त्या मेल्या अधिकाºयानं मला तिकडं धुळीत, घाणीत ठेवून स्वत: गरमागरम पदार्थ चापत बसला. इतकी धूळ उडत होती सांगू, गेली नाकातोंडात. त्यातच उकाडा मी म्हणत होता. मग, त्या पठ्ठ्यानं मला वरवर पुसून मतदान केंद्रात ठेवलं. मी पण मनात म्हटलं आता दाखवते चांगलाच इंगा. काही केल्या हालचाल केली नाही. मला जागं करण्याकरिता बसला खटपट करीत. चांगले तासभर रुसून बसले. बाहेर नुस्ती बोंबाबोंब. रांगेत खोळंबलेल्या लोकांचे शिव्याशाप ऐकून गयावया करायला लागला. मी मनात म्हटलं, काय पठ्ठ्या कसा घेतला सूड. मला धुळीत अन् उन्हात टाकून मजा मारतोस का? रात्री आम्ही साºयाजणी एकत्र झालो, तेव्हा इतरांनी पण अशाच खोड्या करून पार नक्षा उतरवला होता, या निवडणूक यंत्रणेचा. आम्हाला काय वेठबिगार समजतात की काय? फेरमतदान घ्या, फेरनिवडणूक घ्या, निवडणूक हायजॅक केलीय वगैरे काय एकेक आरोप, प्रत्यारोप, टीका, चर्चा आणि महाचर्चा. हसून मुरकुंडी वळली बघा. रात्री आम्ही गप्पा मारत असताना दोन-पाचजण आले आणि आमच्यापैकी तीन-चारजणींना घेऊन गेले. पहाटे आल्या तर त्या खूप थकलेल्या वाटल्या. आम्ही विचारलं काय कुठं गेला होतात? तशा त्या बोलल्या, हे काय नवीन आहे का? एकाच चिन्हासमोरील बटणं दाबून आमच्या तनामनावर अत्याचार केला त्या नराधमांनी. लोकशाही बदनाम करतात हे आणि बदनाम होते आमची जात. दररोज उठून होणारे आरोप असह्य करतात. एवढ्यात, अंधाºया कोपºयात हालचाल झाली. साºयाजणी घाबºयाघुबºया झाल्या. एक थकलीभागली. जीर्ण मतपेटी पुढं झाली. पोरींनो, गेली कित्येक वर्षे मी या कोपºयात पडल्येय. उंदीर, घुशी, पाली आणि ही अंगावर चढलेली धुळीची पुटं हेच काय ते माझं विश्व झालंय. जेव्हा मी तुमच्या जागी होते, तेव्हा माझी पण शान होती. मला पळवून त्यात बोगस मतपत्रिका घुसडण्याकरिता धडपड केली जायची. तेव्हा माझ्यावरही भलतेसलते आरोप झाले. लोकशाहीचे पावित्र्य टिकवले नाही, अशी ओरड झाली. आता तुम्ही आलात. दोष तुमचा, माझा नाही या माणसाच्या जातीपासून सावध राहा पोरींनो.- संदीप प्रधान
ईव्हीएमची ‘मन की बात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:32 AM