शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

सोनेरी पिंजरा तोडणाऱ्या तरुण जोडप्याचा उद्वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 3:13 AM

राजेशाही अवडंबरापेक्षा आपले स्वातंत्र्य प्रिय असल्याचे सांगणाऱ्या या तरुण जोडप्याने त्यासाठी मोठी किंमत मोजली आहे, हे कसे नाकारता येईल?

श्रीमंत माने

लग्नानंतर घरात पाऊल ठेवणारी नववधू अधिक शिकलेली असेल, तिचे विचार प्रगत असतील अन् सासर जुन्या वळणाचे असेल तर  तिची घुसमट सुरू होते. घराबाहेर पाऊल टाकून थोडा मोकळा श्वास घ्यावा, असे  वाटू लागते. पतीची साथ असेल तर कसेबसे निभावून जाते. तसे नसेल तर मात्र मांडलेला डाव मोडायला वेळ लागत नाही.. हे झाले आपल्या आवतीभोवतीचे, मध्यमवर्गीय कुटुंबाचे अनुभव; पण  इंग्लंडच्या महाराणीच्या नातसुनेचीही अशीच घुसमट होत होती, हे जगासमोर आले आहे. महाराणी एलिझाबेथचा नातू हॅरी आणि नातसून मेगन या जोडप्याची ओपरा विन्फ्रे यांनी घेतलेली मुलाखत जगभर चर्चेत आहे. राजघराण्यात झालेला छळ, मारले गेलेले टोमणे याची जंत्रीच दोघांनी जगापुढे मांडली. विशेषत: मेगनने डागलेल्या बॉम्बगोळ्यांनी इंग्लंडमध्ये विंडसर पॅलेसला जबर धक्के बसले आहेत. 

प्रिन्स हॅरी व मेगन ही जोडी गेल्या जानेवारीतच चर्चेत आली होती. राजघराण्यातील धुसफूस असह्य झाल्याने दोघांनी राजघराण्याचे सदस्यत्व सोडले, अंगावरची राजेशाही वस्त्रे उतरवली. राजवाडा सोडला. साधे जगण्याचा निर्णय घेऊन दोघेही अमेरिकेत कॅलिफोर्नियाकडे रवाना झाले. तेव्हापासून एक ना एक दिवस त्या निर्णयामागील कारणे दोघे जगापुढे मांडतील, असा अंदाज होताच. तसेच झाले. मेगनच्या व्यथेला तिच्या सासूच्या  प्रवासाची पृष्ठभूमी आहे. राजकुमारी डायनादेखील  स्वतंत्र विचारांची होती. राजवाडा सोडून सामान्यांमध्ये मिसळायला तिला आवडायचे.  तिच्यावर माध्यमांच्या आणि पापाराझी नावाने ओळखल्या जाणाऱ्या छायाचित्रकारांच्या नजरा असायच्या. त्या छायाचित्रकारांकडून पाठलाग होत असतानाच ऑगस्ट १९९७ मध्ये डायनाचा दुर्दैवी अपघाती अंत झाला. थोरला राजपुत्र विल्यम त्यावेळी पंधरा, तर धाकटा हॅरी तेरा वर्षांचा होता. आईच्या स्वतंत्र विचारांची, स्वतंत्र वागण्याची माहिती असल्यामुळेच कदाचित हॅरीला मेगनची घुसमट समजून घेता आली असावी. डोक्यावरून पाणी जाण्याच्या आत राजघराण्याशी नाते तोडून सर्वसामान्यांसारखे जगण्याचा निर्णय दोघांनी घेतला असावा. मेगनचे काही आरोप गंभीर आहेत. विशेषत: मुलगा आर्ची गर्भात होता तेव्हा या मुलाच्या त्वचेचा रंग कसा असेल याची काळजी राजघराण्याला लागली होती, असे मेगनने या मुलाखतीत थेट सांगितले. मेगन ही  अमेरिकन अभिनेत्री.  वडील युरोपीयन,  आई आफ्रिकन वंशाची. ती शुद्ध युरोपीयन गौरवर्णीय नाही. त्यामुळेच मुलगा गोरा निघाला नाही तर राजघराणे त्याला स्वीकारणार नाही, अशी भीती हॅरी व मेगनकडे व्यक्त करण्यात आली होती. विल्यमची पत्नी केट व इतरांशी मेगनच्या कथित वादाच्या सुरस कथा राजघराण्यातूनच पसरविण्यात आल्या, असा आरोप मेगनने केला आहे. राजघराण्यातील लोक खोटे बोलतात. अफवा पसरवतात. त्यामुळेच जगणे नकोसे झाले होते. मनात आत्महत्येचे विचार येत होते, अशी कबुली मेगनने दिली. तिचे हे बोलणे ऐकताना अनेकांना भरून आलेल्या डोळ्यांच्या विकल डायनाची आठवण झाली असेल.

वरवर वैभवशाली दिसणाऱ्या राजघराण्यातली सुखे नाकारून डायना घराबाहेर पडली होती. पुढे तिच्या आयुष्याचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला हे खरे; पण अति प्रिय  असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यासाठीची मोठी जबर किंमत चुकवण्याची तयारी तिने दाखवली. ‘इतिहासाची पुनरावृत्ती होईल याचे भय सतत माझ्या मनात होते,’ असे हॅरी या मुलाखतीत म्हणाला. त्यामागे त्याच्या आईने सोसलेल्या दाहाचे चटके होते. राजेशाही अवडंबरापेक्षा आपले स्वातंत्र्य प्रिय असल्याचे सांगणाऱ्या या तरुण जोडप्यानेही त्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. या मुलाखतीतील तपशिलांवर मतभेद आणि टीकाही होते आहे हे खरे; पण, निर्भर स्वातंत्र्याची आस सोनेरी पिंजरे तोडण्याची हिंमत बाळगून असते हे कसे नाकारता येईल?

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :LondonलंडनPrince Harry-Meghan Royal Weddingप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह