लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातून धडे घेतलेले ब्रिजेश पाठक यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.
आपण लागोपाठ दुसऱ्यांदा लखनौमधून निवडून आलात. यावेळी आपल्याला उपमुख्यमंत्रिपद मिळाले. त्याशिवाय कोणत्या जबाबदाऱ्या आपल्याकडे आहेत? माझ्यावर इतकी महत्त्वाची जबाबदारी टाकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मी आभारी आहे. माझ्या खात्याव्यतिरिक्त दुसऱ्या खात्यांशी संबंधित बैठकांमध्येही मी सहभागी होत असून, उत्तर प्रदेशच्या एकंदरीत विकास कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकारी दवाखान्यांत छापेमारी मोहीम चालवत आहोत. जमिनीवर उतरल्याशिवाय वास्तव कळत नाही. या छाप्यांमधून कोणते वास्तव समोर आले? राज्यातल्या सर्व सरकारी दवाखान्यांत रुग्णांना परमेश्वर मानून सेवा व्हावी असा माझा प्रयत्न आहे. रुग्णांना डॉक्टर आणि औषधे याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना बसण्याची जागा, थंड पाणी याची व्यवस्था झाली पाहिजे. रुग्णवाहिका त्वरित मिळाली पाहिजे.आतापर्यंत आपण या दवाखान्यांमध्ये कोणते बदल घडवून आणले? प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर, त्यांच्या कामाचे तास, औषधांची उपलब्धता या गोष्टी रोजच्या रोज अद्ययावत होत आहेत. आवश्यक यादीतील २८९ औषधे प्रत्येक दवाखान्यात उपलब्ध असलीच पाहिजेत. दवाखान्यात स्वच्छता असावी. सगळी उपकरणे योग्य प्रकारे काम देत असावीत हे आम्ही पाहतो. उत्तम आरोग्य असलेला उत्तर प्रदेश हे माझे उद्दिष्ट आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली होती. आता अशा आजारांचा सामना करण्यासाठी काय तयारी केली गेली आहे? उत्तर प्रदेशमध्ये लसीकरणाचे काम जोरात चालू आहे. केवळ वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठात नव्हे तर जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी)मध्येही डॉक्टर्स आणि औषधांची पूर्ण व्यवस्था आहे.आपल्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याचा संकल्प केला होता. आज काय स्थिती आहे? उत्तर प्रदेशात २०१७ ला भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा राज्यातील ७५ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय होते. आज मात्र १४ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्य सर्व जिल्ह्यांत सरकारी किंवा खासगी क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय एक तर काम करत आहेत किंवा सुरू करणार आहेत. नोयडात आम्ही एक वैद्यकीय उपकरण उद्यान उभे करतो आहोत. तेथे तयार झालेली उपकरणे संपूर्ण देशात उच्चस्तरीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होतील.समाजवादी पक्षाच्या बाबतीत आपण अत्यंत आक्रमक का असता? ‘समाजवाद एक अशी टोपी आहे जी प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीने डोक्यावर ठेवते’ असे एका ब्रिटिश समाज शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. समाजवादी पक्षाच्या मते समाजवादाचा अर्थ आपल्या परिवाराला आर्थिक-सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मजबूत करणे आणि सरकारी साधन सामग्रीची लूट करणे असा आहे. आपल्या मते समाजवादाचा खरा अर्थ काय? आमच्यासाठी गोरगरिबांचे सशक्तीकरण हाच समाजवाद आहे. भारतात आचार्य नरेंद्र देव, डॉ. राम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांच्यासारख्यांनी खरा समाजवाद राबविला. परंतु, १९९३ मध्ये मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी जनता पक्ष तोडून समाजवादी पक्ष स्थापन केला तेव्हाच देशात समाजवाद अखेरचा श्वास घेऊ लागला. त्यांनी फक्त गुंडांना एकत्र आणून आपल्या परिवाराला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यालाच समाजवाद असे नाव दिले. प्रत्येक जिल्ह्यात मिनी माफिया तयार झाले.असे असूनही गेल्या ३५ वर्षांत मुलायमसिंह यादव आणि त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात टिकून का राहिला? मुलायमसिंह यादव यांची राजकीय दंडुकेशाही श्रीमंतांच्या विरुद्ध नव्हती आणि गरिबांच्या बाजूनेही नव्हती! ती केवळ समाजवादी पक्षाच्या नेत्यांची गुंडागर्दी होती. गुंडागर्दीला राजकारणाचा पेहराव इतकेच! गरीब लोक अशा बाहुबलींनाच आपल्या मुक्तीचे साधन समजू लागतात, हे दुर्दैव!