मार्गदर्शक, शिक्षक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी न्यूरोस्पायनल सर्जरीला नवी ओळख प्राप्त करून दिली. वयाच्या उत्तरायणात येऊन एखाद्या तरुण मुलाएवढीच ऊर्जा असणारे डॉ. रामाणी सांगतात की, संस्कृती, सद्विचार, आहार आणि व्यायाम ही चतु:सूत्री अंगीकारायला हवी. बदलत्या जीवनशैलीत मानसिक आणि शारीरिकरीत्या ‘फिट’ राहण्यासाठी ही चतु:सूत्री गुरुकिल्लीच असल्याचे अधोरेखित करतात. १२ मे रोजी डॉ. रामाणी यांच्या ८०व्या वर्षातील पर्दापणाप्रीत्यर्थ भव्य ‘गुरुवंदना ’ हा संस्मरणीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकरिता डॉक्टरांचे देशासह जगभरातील शिष्य आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आपले ज्ञान मुक्तपणे वाटून, समाजासाठी वाहून घेणाऱ्या आणि वयाच्या ८०व्या वर्षी रोज त्याच एकाग्रतेने आणि उत्साहाने शस्त्रक्रिया करणाºया चिरतरुण डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनप्रवासाविषयी प्रतिनिधी स्नेहा मोरे यांनी साधलेला संवाद ...गेल्या ८० वर्षांत इतकी माणसं कशी काय जोडली?तुम्ही मनापासून समाजासाठी काही तरी केले, तरी त्याची परतफेड म्हणून तो घटक तुम्हाला लक्षात राहतो. हाच एक फॉर्म्युला आहे. मी गुरु-शिष्य परंपरेला मानतो. त्यातूनच आज शिष्यांच्या पाठिंब्याने हे स्थान मिळविले आहे. त्यामुळे १२ मे रोजी माझ्या शिष्यांनी आयोजित केलेल्या संस्मरणीय गुरुवंदना कार्यक्रमात देशच नव्हे, तर जगभरातील शिष्य एकत्र येणार आहोत. याच सोहळ्याच्या दिवशी शिष्यांकडून माझा सन्मान होणार आहे. या इतक्या वर्षांत मित्र, शिष्य आणि परिवार यांच्यामुळेच माझी ओळख आहे.शिक्षण क्षेत्रात कसे चढ-उतार आले?वाडीमध्ये शाळा नसल्याने घरापासून दूर राहून ४२ कि.मी.वरील नेरूळ गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी आईने मला फोंड्याच्या शाळेत घातले. शालांत परीक्षेसाठी मुंबईला दाखल झालो खरा. मात्र, यश संपादन करून वाडीला गेलो. त्यानंतर, महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला, त्यासाठी आईने पुन्हा मुंबईला पाठविले, परंतु तोपर्यंत अॅडमिशन फुल झाले होते. मग कशीबशी धडपड करून अखेर सिद्धार्थ कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळविले. मुंबई सेंट्रलच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस झाल्यानंतर, त्याच कॉलेजातून १९६८ साली एमएस पूर्ण केले. नियोजन आणि स्नेह्यांच्या आर्थिक मदतीच्या बळावर लंडनला रवाना झालो. ब्रुक जनरल हॉस्पिटल आणि न्यू कॅसल जनरल हॉस्पिटलमधील प्रशिक्षणाच्या काळात त्या सर्जरीच्या नव्या तंत्रांचा अभ्यास केला. स्वीडन आणि अमेरिकेतून मायक्रो न्यूरोसर्जरीमध्ये कौशल्य मिळविले.वैद्यकीय खर्च आवाक्यात यावा, यासाठी काय कराल?गेल्या काही वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्र असो वा वैद्यकीय क्षेत्र याबद्दल ओरड होताना दिसते. समाजात सध्या प्रत्येकाला पैसे साठविण्याची, त्याची बचत करण्याची सवय लागलीय. त्यामुळे समाजाप्रती असणारे कर्तव्य, जबाबदारी आपल्या आवडी-निवडी यांना कोणीही प्राधान्य देत नाही. परिणामी, समाधानाची भावना कमी झाल्याने भूक वाढत चालली आणि त्यातून हा विचार समाजात रुजत गेला. आपल्याकडे आरोग्यसेवेचा दर वाढण्याचे कारण हे बदलती जीवनशैली आहे. वैद्यकीय सेवांमध्ये अनेक शाखा असल्यामुळे स्वस्त पर्यायांचा अवलंब करून पैसे वाचविले जातात. जर प्रयत्न फसले, तर खर्चाचा डोंगर उभा राहतो. याची दुसरी बाजू म्हणजे, हल्ली कोणतेही उपचार करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. त्यामुळे उपचारांचा दर्जा वाढला की, आर्थिक बाजूकडे अधिक कटाक्षाने पाहिले पाहिजे.पाठीच्या कण्याच्या दुखण्याने प्रचंड त्रास होतो, सध्या याविषयी काही अद्ययावत तंत्रज्ञान आले आहे का?गोव्यात वैद्यकीय शिक्षण झाल्यावर सायन रुग्णालयात दाखल झालो. याच कारकिर्दीत मला खरी ओळख मिळाली. प्लीफ या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा देशातील जनक म्हणून माझी ओळख आहे. स्पाँडिलायटीसमुळे निर्माण झालेल्या मणक्याच्या असमतोलावर उपचार म्हणून पोस्टिरिअर लंबर इंटरबॉडी फ्युजन (प्लीफ) ही सर्जरी करतात. आठ तासांच्या या सर्जरीसाठी मी नवी पद्धत वापरल्याचे पाहून, ‘प्लीफ’चे जनक असलेल्या जपानच्या डॉ. पीएम लीन यांनी कौतुक केले. तेव्हापासून माझी ‘प्लीफ रामाणी’ अशी ओळख निर्माण झाली. अमेरिकन जर्नल आॅफ क्लिनिकल न्युरोसर्जरीने हजारांहून अधिक ‘प्लीफ’ सर्जरी करणाºया जगभरातील १२ डॉक्टरांची निवड केली; त्यात एक मी होतो. त्यानंतर, मायक्रोलंबर डायसेक्टोमी, अँटिरिअर सर्व्हायकल स्पाइन अशा सर्जरी केल्या. मणक्याच्या सर्जरीदरम्यान पेशंटच्या कमरेचे हाड काढून बसवावे लागते. यातूनच हाडांच्या बँकेची संकल्पना पुढे आली. सायन हॉस्पिटलमध्ये १९८५मध्ये मी त्याची स्थापना केली.तुमच्या ऊर्जेचेरहस्य काय?तुमच्यामध्ये आत्मशक्ती असायला हवी. ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने देतो. लहान मुलांना आपल्या आई-वडिलांनी चांगली संस्कृती द्यायला हवी. संस्कृती, सद्विचार यामुळे माणूस घडतो. आपल्या आयुष्यात एखादे स्थान मिळविल्यानंतर समाजासाठी काहीतरी करायला हवे, ही जाणीव जेव्हा रुजते, तेव्हा आपोआपच आपल्यात ऊर्जा येते. मी मूळचा गोव्याचा. फोंडा येथील वाडी गावात माझा जन्म झाला. माझे बाबा वनअधिकारी होते. त्यामुळे ते फिरतीवर असायचे. अशा परिस्थितीत आईने आम्हा सहा भावंडांना वाढविले. आमची परिस्थिती बेताची होती. दिवस कष्टाचे होते. मात्र, संघर्षातून घडत गेलो, त्यामुळे ध्येय पूर्ण करू शकलो. त्या सगळ्या खडतर प्रवासातूनच आज समाजमान्य व्यक्ती व कुशल सर्जन बनलो आहे.पाठीच्या कण्याबाबत सध्या देशात काय स्थिती आहे? सत्तरीतलं हे दुखण आता तिशीवर आले आहे, त्याचं कारण काय?जे शरीर आपण वापरतो, याची योग्य काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, संस्कृती, सद्विचार, व्यायाम आणि प्राणायाम हे केले पाहिजे. मुख्य म्हणजे, आपल्या समाजात व्यायाम हा धर्म झाला पाहिजे, तसेच आहारावर ताबा पाहिजे. उघड्यावरील पदार्थ आणि जंकफूडचे पर्याय बंद केले पाहिजे. आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या.याशिवाय, आपल्या आहारावर आपण नियंत्रण केले पहिजे. जीवनशैलीत आलेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधांवर विसंबून न राहता, आपणच आपली जीवनशैली बदलली पाहिजे. परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे आरोग्यसेवा स्वस्त आहेत.
व्यायाम हा धर्म व्हायला हवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:19 AM