डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने वाहनग्राहक पर्यायी इंधन आणि वाहनांच्या शोधात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, केवळ चर्चाच नव्हे, तर ही वाहने खरेदी करण्याकडे शहरी ग्राहकांचा ओढा वाढला आहे. मात्र, याच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या स्फोटांच्या वारंवारच्या घटनांनी ग्राहक संभ्रमितही झाला आहे. त्यामुळे साहजिकच या वाहनांच्या खरेदीला काहीशी खीळही बसली आहे.
आणखी काही काळ थांबून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करूया, असा विचार ग्राहक करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार किंवा अन्य सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार या वाहनांचा उठाव म्हणावा तसा होणार नाही, हे अतिशय स्पष्ट आहे. साहजिकच सरकारे आणि कंपन्यांनी या वाहनांवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर नियम व अटी कडक करण्याचीही आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहने घाईगडबडीत रस्त्यावर आणणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यावर अधिक काम होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच पुण्यात माहिती देताना सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खपात तब्बल १३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या १२ लाख विजेवर चालणारी वाहने आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा ४० लाखांपर्यंत जाईल, तर येत्या दोन वर्षांत ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे वाहन उद्योगक्षेत्रात खूप वाव असून, या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
विजेवर चालणाऱ्या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र, फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेने पर्यायी ॲल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, ॲल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झाले आहे. परिणामी, आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांना खूप वाव असल्याचे गडकरी म्हणतात. मात्र, यासाठी कंपन्यांनी वेगाने काम करताना अतिशय काळजीही घ्यावी लागणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज आहे. यापुढे इंधनांची कमतरता अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे पर्यायी इंधानाचा शोध घेतानाच इलेक्ट्रिक वाहने हाच एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे. मात्र ही वाहने तयार करताना त्यातील कमतरता, त्रुटी लवकरात लवकर दूर करणेही तितकेच गरजेचे आहे. सरकार आणि कंपन्यांनी याकडे गंभीरपणे लक्ष पुरवायला हवे.
अलीकडच्या दोन- तीन वर्षांत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरल्या. मात्र, आज अशाच कंपन्यांच्या वाहनांना बॅटरी बदलताना अडचणी निर्माण होत आहेत. पुरेशा प्रमाणात बॅटऱ्या उपलब्ध होताना दिसत नाहीत. परिणामी ग्राहकांना आर्थिक घाट्याला सामोरे जावे लागत आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत, जि. सांगली