समाजाच्या सांस्कृतिक जाणिवानेणिवांचे संवर्धन करणे आपलीच जबाबदारी आहे, हे मानणा-यांनी नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्यास काय हरकत आहे. अनेकदा या प्रकारचे वाद हे प्रसिद्धीचे तंत्र असल्याचेही दिसून आले आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची चर्चा सनातन आहे. प्रत्येक काळात ती होतच असते. अशा प्रकारची चर्चा होणे हेच आपल्या लोकशाहीचे बलस्थान आहे. पण, प्रत्येकच गोष्ट जातीच्या, धर्माच्या आणि समूहमनाच्या चष्म्यातून पाहत त्यावर उमटत असणाºया प्रतिक्रिया पाहिल्यावर घटनेने दिलेले हक्क आणि कर्तव्य यांचा वेगळाच अर्थ लावला जातोय का, अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. भारतीय मनावर चित्रपटसृष्टीचे गारुडच आहे. आपल्या जीवनाचा तो भाग झाला आहे. त्यामुळे जेव्हा चित्रपटांबद्दल वाद उद्भवतात, तेव्हा त्याला प्रसिद्धीही खूप मिळते. आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.मराठी चित्रपटसृष्टीत या निमित्ताने दोन गटही पडले. त्यातच ‘दशक्रिया’ या चित्रपटासंदर्भातही वादंग निर्माण झाले. ब्राह्मण समाजाची तसेच हिंदू प्रथांची बदनामी करणारा हा चित्रपट असल्याचा पवित्रा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतला. प्रदर्शन रोखावे यासाठी पोलिसांकडे गेले. चित्रपटगृहचालकांना पत्रे दिली. समूहाच्या विरुद्ध जाण्याची मानसिकता नसल्याने काहींनी त्याचे आॅनलाईन बुकिंगही रद्द केले. कोणत्याही चित्रपटाबाबत वाद निर्माण झाल्यावर निर्मात्यांकडून, आंदोलनाची धमकी देणाºयांना ‘पहिल्यांदा आपण हा चित्रपट पाहा’ असे आवाहन केले जाते. अगदी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून ते अलीकडच्या ‘सरकार’, ‘पद्मावती’ या हिंदी आणि ‘झेंडा’ या मराठी चित्रपटांबद्दल हा अनुभव आहे. संबंधितांनी पाहिल्यावर त्यावरची तथाकथित बंदी उठविल्याचीही उदाहरणे आहेत. पण मुळात सेन्सॉर बोर्ड नावाची संस्था असताना अशा प्रकारच्या सेन्सॉरबाह्य गोष्टींना कलाकारांना सामोरे का जावे लागते, याचा विचार करायला हवा. दशक्रिया हा चित्रपट बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित आहे. तिच्यावर आक्षेप घेतला गेला नाही. असेच मागे ‘राजन खान यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘हलाल’ चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला. तो प्रदर्शितही झाला. या चित्रपटाच्या एका ‘शो’ला फक्त सहा प्रेक्षक होते. त्याची कारणे काहीही असोत; पण प्रेक्षकांनी हा चित्रपट नाकारला हे वास्तव आहे. त्यामुळेच समाजाच्या सांस्कृतिक जाणिवानेणिवांचे संवर्धन करणे आपलीच जबाबदारी आहे, हे मानणाºयांनी नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्यास काय हरकत आहे. अनेकदा या प्रकारचे वाद हे प्रसिद्धीचे तंत्र असल्याचेही दिसून आले आहे. हल्ली सुरुवातीचे दोन-तीन दिवसच खºया अर्थाने गल्ला मिळतो. त्यासाठीही असे प्रकार केले जातात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शस्त्राचा गल्लाभरू वापर करणाºयांना समाजाने ओळखले पाहिजे. एरवी ज्या कलाकृतीची फारशी दखलही घेतली गेली नसती ती अधिक लोकांपर्यंत पोहोचून समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी; अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा शब्दच गुळगुळीत आणि अर्थहीन होऊन जाईल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ‘दशक्रिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:41 AM