जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी अलीकडेच एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले आहे की, गेल्या काही आठवड्यांत जगभरात कोविड-१९ने बाधित चीनच्या बाहेरील देशातील रुग्णांच्या संख्येत १३ पटीने वाढ झाली असून, ताज्या आकडेवारीनुसार १९८ देशांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. जगभरातील ५,१९,८९९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेले रुग्ण १,२३,२९६ असून, कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या २३,५८८ एवढी भयानक आहे. चीन सोडून हजारोंच्या संख्येने मरण पावलेले लोक प्रामुख्याने इटली, इराण, स्पेन, फ्रान्स आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रातील आहेत. श्रीलंका व बांगला देशात अजून तरी या रोगाने कुणाचा बळी घेतलेला नाही.या महामारीने अनेक देशांतील शेअर बाजार कोलमडले असून, आर्थिक स्थितीने भयानक रूप धारण केले आहे. अनेक देशांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. अर्थकारण कुठे जात आहे, हेच कळेनासे झाले आहे. परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेत देशांनी अखेर करायचे तरी काय? लोकांनी एकत्र येऊ नये, एकमेकांना स्पर्श करू नये. एकमेकांपासून दूर उभे राहून व्यवहार करावेत, खोकू वा शिंकू नये आणि केवळ घरातच बसून राहावे, हे कितपत शक्य आहे? ही स्थिती लोक किती काळ सहन करू शकतील? हा विषाणू हवेतून पसरतो म्हणून माणसांनी श्वास घेणेही सोडून द्यायचे का? अशा स्थितीत इंग्लंडचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे महत्त्वाचे वक्तव्य केले होते त्याचे स्मरण होते. ते म्हणाले होते, ‘कोणताही पेचप्रसंग उद्भवला तर तो तसाच वाया जाता कामा नये. माणसाने त्याचा फायदा करून घ्यायला हवा.’ तेव्हा आपणही या पेचप्रसंगाचे रूपांतर संधीमध्ये करून घेऊ शकू का?कोविड-१९ ची निर्मिती चीनमधील वुहान या प्रांतातून झाली. चीनमध्ये निर्मित झालेल्या अनेक वस्तू वापरण्याची आपल्याला सवय झाली आहे; पण चिनी भाषा ही इंग्रजीप्रमाणे शब्दांची बनलेली नसून वाक्संप्रदायांची आहे. त्या भाषेत पेचप्रसंग हा शब्द धोका आणि संधी असा दोन्ही अर्थांनी वापरण्यात येतो. चीनमधून निघालेली ही महामारी आपल्या देशात शिरण्यापासून आपण तिला रोखू शकलो नसलो तरी या संकटाचे रूपांतर आपण संधीत करू शकतो का, हे बघितले गेले पाहिजे. त्याचवेळी त्या महामारीवर इलाज शोधायचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या स्पर्शाने हा विषाणू इतरांमध्ये संक्रमित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला आणि हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हॅन्क यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशातील दोनतृतीयांश लोकसंख्येला कोरोनाची बाधा झाली आहे. आपल्या देशातील अनेक राज्यांत त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक राष्ट्रांनी त्यांच्या सीमा बंद केल्या असून, लोकांनी सार्वजनिक संपर्क टाळावा, असे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. आपल्या देशातही तीन आठवड्यांची बंदी लागू करण्यात आली आहे; कारण असाधारण परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा तिला तोंड देण्यासाठी असाधारण उपाय योजावे लागतात.
आपल्या देशातील शिक्षण संस्था आपण बंद केल्याच आहेत. अशा स्थितीत आॅनलाईन शिक्षण देण्याकडे वाटचाल करायला हवी. या संकटाचा सामना करण्यासाठी हाच उपाय आहे. शिक्षकांनी आपले धडे घरी बसून व्हिडिओ रेकॉर्डिंगने मुलांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉटस्अॅपवर ते धडे पुन्हा पुन्हा पाहता येतील आणि समजून घेता येतील. हे काम सर्व शिक्षकांनी करायला हवे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ती पद्धत समजून घेऊन अमलात आणायला हवी. या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल. शिक्षणावर होणाºया खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. पालकांचीही पुस्तके, फी वाढ, स्कूल बसवर होणारा खर्च यापासून सुटका होईल. पूर्वी बायबलची शिकवण चर्चच्या माध्यमातून केली जायची, पण गटेनबर्गने छपाईयंत्राचा शोध लावल्यानंतर बायबलच्या प्रती घराघरांत पोहोचल्या. अशा तºहेने परमेश्वराच्या प्रभावाचा अधिक विस्तार झाला.सध्या अनेक व्यापारी संस्था आणि कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगत आहे. वर्क फ्रॉम होमचे नवे कल्चर उदयास आले आहे. उद्योगांनी देखील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनात केला पाहिजे. डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू. म्हणजे वर्ल्ड वाईड वेबमुळे सारे जग वसुधैव कुटुंबकम् या धारणेप्रमाणे एक होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. कोरोनाचा सर्वांत मोठा फायदा धर्माधर्मातील, जातीजातीतील किंवा वंशावंशातील भिंती मोडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सारे जग वेबमुळे एकमेकांशी जोडले जाईल आणि सारी मानवजात एक होईल. कोरोनामुळे आपसातील भांडणे संपुष्टात येतील, त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन अर्थकारणाला बळकटी येईल आणि जीडीपीत वाढ होईल. असे असले तरी जे लोक रस्त्यावर असतात त्यांना रस्त्यावरच राहावे लागेल आणि सैनिकांना देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर राहण्यावाचून दुसरा पर्याय असणार नाही, हेही तितकेच वास्तव आहे; पण भविष्यात कोरोनासारखी एखादी साथ उद्भवली तर या लेखाचा उपयोग आरसा म्हणून व्हावा, असे मला वाटते.डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई,सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण