भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल. वायूदल सध्या दोन आघाड्यांवर लढण्याच्या स्थितीत नाही, असे एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले. युद्ध सुरू झाल्यास केवळ दहा दिवस पुरू शकेल एवढाच दारूगोळा सैन्याकडे असल्याचे, गत शुक्रवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅगच्या अहवालात म्हटले होते. पाकिस्तान व चीनसोबतच्या सीमांवरील सद्यस्थिती आणि वायूदल प्रमुखांचे वक्तव्य व कॅगचा अहवाल यांचा एकत्र विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. भारत आणि अमेरिकेचे सख्य वाढीस लागल्यापासून पाकिस्तान जणू काही चीनचे मांडलिक राष्ट्रच झाले आहे. यापूर्वी १९६५ व १९७१ मध्ये भारताचे युद्ध झाले तेव्हा चीन तटस्थ राहिला होता. तत्कालीन सोव्हिएट रशियासोबतच्या भारताच्या मैत्रीने त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली होती. आज रशिया भारतापासून दूर गेला आहे आणि अमेरिका भारताला कितीही घनिष्ट मित्र संबोधत असला तरी, युद्धाच्या स्थितीत तो देश भारताच्या मदतीला धावून येईलच, याची काही खात्री नाही. दुसरीकडे पाकिस्तान अथवा चीन या दोनपैकी कोणत्याही देशासोबत भारताचे युद्ध सुरू झाल्यास, ते दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरुद्ध संयुक्त आघाडी उघडतील, अशी दाट शक्यता आहे. त्या स्थितीत भारतीय सेनादलांना दोन आघाड्यांवर लढा द्यावा लागेल. त्यासाठी आवश्यक ते मनोबल तिन्ही सेनादलांकडे निश्चितपणे आहे; मात्र लढाया केवळ मनोबलाच्या आधारे जिंकल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी उच्च प्रतीची शस्त्रास्त्रे, दारुगोळा, उपकरणे यांची नितांत गरज असते. दुर्दैवाने सेनादलांकडे त्याची कमतरता दिसत आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नसल्याची तक्रार सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे धुरीण उठताबसता करीत असतात; मात्र या सरकारच्या कारकिर्दीतही फार काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. लष्कराकडे किमान २० दिवसांचा राखीव दारूगोळा असावा, असे १९९९ मध्ये निश्चित करण्यात आले होते. दुर्दैवाने १८ वर्षे उलटल्यावरही ते लक्ष्य आपल्याला साध्य करता आलेले नाही. सीमांवर युद्धाचे ढग जमा होऊ लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.
अत्यंत चिंताजनक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:44 AM