"झूठ बोला जा सकता है, लेकिन आँखों से छुपाया नहीं जा सकता, हे उद्धव ठाकरेंना आधीच समजले असते, तर आपल्या आमदारांची बंडखोरी त्यांना अगोदरच समजली असती; पण डोळ्यांची अशी भाषा समजणं हे काही सोपं काम नाही. प्रत्येकाला ती समजतही नाही. म्हणतात ना, न्यायालयामध्ये खोटं वारंवार पकडलं गेलं असतं, जर तोंडाऐवजी डोळ्यांनी साक्ष दिली असती; पण कोर्टाचं कामकाज काही डोळ्यांच्या भाषेत चालत नाही. राजकारणही डोळ्यांच्या भाषेत चालत नाही. तसे ते चालले असते, तर पहाटेचे शपथविधी आदल्या दिवशीच समजले असते. तसे असते तर गुवाहाटीच्या दिशेने निघालेले बंड आधीच शमले असते. अजित पवारांचा डोळा कशावर आहे, हे कळले असते तर त्यांच्यावर आधीच डोळे रोखले गेले असते डोळे हा प्रांत खरं म्हणजे कर्वीचा आणि कलावंतांचा. या डोळ्यांच्या डोहात किती कवी बुडून गेले! 'वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले,' अशा गवळणीपासून ते 'अशी रोखा नजर, त्यात भरलं जहर' या लावणीपर्यंत किती नि काय काय सांगावं । 'तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ' असा सवाल करणारा हिंदी सिनेमा तर या जादूनेच वेडावला आहे; पण डोळ्यांची ही भाषा डॉ. विजयकुमार गावित यांनी कशी आत्मसात केली हा मात्र मोठाच प्रश्न.
'आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया, असं म्हणत त्यांनी एकदम ऐश्वर्या रायच्या डोळ्यांचं गुपितच सांगून टाकलं. 'सितारों सी जगमगा रही आँखे' असलेल्या ऐश्वर्यामुळे गावितांचे डोळे दिपून न गेले तरच नवल; पण तेवढंच बोलून थांबतील ते मंत्री कसले? 'ऐश्वर्या रायचे डोळे आणि त्वचा सुंदर दिसते, कारण ती मासे खाते' असा भन्नाट शोध गावित साहेबांनी लावल्यावर सर्वांचेच डोळे विस्फारले. भल्याभल्यांना समजले नाही, ते गावितांनी शोधले. उद्या मोनालिसाच्या हास्याचं गूढ गावितांनी उकललं तरी आश्चर्य वाटायला नको. मासे खाल्ले की माणूस (आणि त्यातही बाईमाणूस) चिकने दिसायला लागतो, असेही मंत्र्यांनी सांगून टाकले. या मॅजिक सोबतचे 'लॉजिक' त्यांनी सांगितले. 'ऐश्वर्या समुद्रकिनारी राहणारी. ती लहानपणापासून मासे खायची. तुम्ही बघितले का तिचे डोळे? तुमचेपण असेच होणार. कारण फिशमध्ये तेल असते. त्याचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. या तेलामुळे स्किन चांगली होते,' असे सांगत मंत्र्यांनी 'चिकने' होण्याचे गुपित सांगून टाकले! ते बिचारे इकडे बोलले आणि तिकडे रुपाली चाकणकरांनी डोळे वटारले.
राज्य महिला आयोगाने अजिबात डोळेझाक न करता, गावितांना थेट नोटीसच पाठवून टाकली. आदिवासी लोकांशी गप्पा मारताना गावितांनी ऐश्वर्याचे ऐश्वर्य सांगत मासे खाण्याचे आवाहन केले; पण त्यामुळे रूपाली चाकणकर मात्र भडकल्या. 'प्रत्येकवेळी उदाहरण देताना महिलाच का लागतात?' असा सवाल करत त्यांनी गावितांच्या डोळ्यांत अंजन घातले. मागे बिहारचे मुख्यमंत्री असताना, लालूप्रसाद यादवांनीही 'हेमामालिनींच्या गालांसारखे गुळगुळीत रस्ते बनवू, असे आश्वासन दिले होते. एकूण काय, अल्पशिक्षित मंडळींना आरोग्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी ऐश्वर्या रायचे उदाहरण मंत्र्यांनी काय दिले आणि भलेमोठे कवित्व सुरू झाले. 'ऐश्वर्या माझ्या मुलीसारखी आहे,' असा डोळेभरून खुलासा करण्याची वेळ या सत्तरीतल्या नेत्यावर मग आली. खरं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि डॉ. विजयकुमार गावित हे आता सत्तेमध्ये सोबत आहेत. पण तरीही तमाम लोकप्रतिनिधींचे डोळे उघडण्यासाठी आणि महिलांविषयी त्यांनी जपून बोलावे यासाठी ही तंबी दिली गेली असावी. गावित हे डॉक्टर. त्यामुळे आरोग्यविषयक सल्ला देणे हा त्यांचा अधिकारही. ते नंदुरबारचे आमदार. आदिवासी नेते. त्यांची मुलगी हीनादेखील डॉक्टर. त्या नंदुरबारच्या खासदार आहेत. डॉ. गावितांना डोळ्यांची भाषा कळत असल्यामुळेच बहुदा त्यांचा खुर्चीवर डोळा होता! चाकणकरांनी जे आता केले ते गावितांनी २०१४ मध्येच केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असणारे गावित नेमक्या वेळी भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
'आँखें खुली हो या हो बंद दीदार उनका होता है', असे म्हणणाऱ्या गावितांनी खुर्चीवरचे आपले प्रेम कधी कमी होऊ दिले नाही. योग्य वेळी योग्य शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे डॉक्टर यावेळी मात्र डोळ्यांमुळे अडचणीत आले. 'बोलत गेले आणिक सारे ओठावर आले.. पण मग डोळ्यांमधले पाणीही काठावर आले! महिला आयोगाने जुलमी डोळे रोखल्यानंतर गावितांचेही डोळे भरून आले असावेत.