-अविनाश थोरात लेखक भविष्यवेधी, कालदर्शी किंवा अगदी द्रष्टेही असतात, असे म्हटले जाते. प्रख्यात विज्ञान लेखक ज्यूल्स व्हर्न यांनी आपल्या ‘सायन्स फिक्शन’मध्ये अनेक शोधांची कल्पना केली. टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान आदी कल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी व्हर्न यांनी आपल्या कथांमधून या मांडल्या होत्या. पुढे त्या प्रत्यक्षात उतरल्या. महाभारतातील संजय यांच्या रुपाने दूरचित्रवाणी किंवा गणपती म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी यासारखे बादरायण संबंध त्यामध्ये जोडले नव्हते. व्हर्न यांनी मांडलेल्या कल्पनांचा कार्यकारणभाव सांगितला होता. विज्ञानाच्या कसोटीवर त्या खऱ्याही उतरल्या होत्या. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस संदर्भात समाजमाध्यमांवर फिरत असलेली एक पोस्ट. डीन कुंट्ज या अमेरिकन लेखकाने 'द आइज ऑफ डार्कनेस' या आपल्या कादंबरीत कोरोना व्हायरसशी मिळत्या जुळत्या विषाणूचा उल्लेख केला आहे. वुहान -४०० नावाचा हा विषाणू जैविक हत्यार म्हणून विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये सध्या ज्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा उद्रेक आहे त्याच शहरातून हा विषाणू प्रसारित झाला आहे.डिन कुंटझ यांनी १९८१ साली ‘द आईज ऑफ डार्क’ ही कादंबरी लिहिली. अतिंद्रिय शक्ती, गुप्तहेर, भावनिक द्वंद आणि मानवी नातेसबंध हा सगळा मसाला या कादंबरीमध्ये भरलेला असला तरी याचा गाभा जैविक युध्दासाठीची तयारी आहे.
ख्रिस्टिना इव्हान्स नावाची घटस्फोटित नृत्यदिग्दर्शिका डॅनी या आपल्या १२ वर्षांच्या मुलासह लास वेगास येथे राहत असते. एके दिवशी डॅनी आपल्या मित्रांबरोबर एका पर्वतारोहणाच्या शिबिराला जातो. मात्र, काही दिवसांनी या सगळ्या पथकाचा बस दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे ख्रिस्टिनाला कळविले जाते. अपघातात डॅनी भीषणरित्या जखमी झालेला असल्याने त्याचा चेहरा पाहू नये असे सांगुन त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले जातात. मात्र, या घटनेनंतर तीन-चार महिन्यांनी ख्रिस्टिनाला विचित्र स्वप्ने पडू लागतात. काही दिवसानंतर तर घरामध्ये विचित्र गोष्टी घडू लागतात.
डॅनीच्या रुममधल्या वस्तू आपोआप हलायला लागतात. हे सगळे प्रकार सुरू झाल्यावर त्या खोलीतले तापमान एकदम कमी होते. डॅनीवरील अतिव प्रेमामुळे हे होतेय असे तिला सुरूवातीला वाटते. परंतु, वेगवेगळ्या माध्यमातून डॅनी ‘मी जीवंत आहे’ असा संदेश देतोय अशी तिची भावना होते. याच काळात सैरभैर झालेल्या ख्रिस्टिनाची ओळख इलियट स्ट्रायकर या वकीलाशी होते. तरुणपणी त्याने लष्करी गुप्तहेर म्हणून काम केलेले असते. डॅनीबाबत नक्की काय घडले याचा शोध घेण्यासाठी त्याची कबर उघडण्यासाठी मदत करण्याची विनंती ख्रिस्टिीना इलियटला करते. पूर्वी गुप्तचर यंत्रणेतील त्याचा वरिष्ठ आता न्यायाधिश झालेला असतो. इलियट त्याची मदत मागतो. पण त्याच गुप्त पोलीस त्याच्यावर घरात हल्ला करतात. ख्रिस्टिनाने डॅनीबाबत काय सांगितले असे ते विचारतात. मात्र, आपल्या शारीरिक कौशल्याने इलियट सुटका करून घेतो.
दरम्यानच्या काळात एका गुप्त पोलीस ख्रिस्टिीनाच्या घरी पोहोचतो. गॅसचा स्फोट करून तिला मारण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, वेळेवर पोहोचून इलियट वाचवतो. त्यानंतर गुप्त पोलीस आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा मागावर लागलेली असताना दोघांचा थरारक प्रवास सुरू होतो. ते दोघे एका हॉटेलात गेले असताना सुरू असलेल्या गाण्यातून पुन्हा ‘मी जीवंत आहे’ असे शब्द बाहेर येतात. आता मात्र डॅनी खरोखरच ख्रिस्टिनाला काहीतरी संदेश पाठवतोय, याची खात्री इलियटला पटते. मात्र, हा भुताटकीचा प्रकार असल्याचेही त्याला वाटते. मात्र, डॅनी जीवंत असल्याबाबत ख्रिस्टिीनाची पूर्ण खात्री असते. पोलीसच जीवावर उठले असल्याने डॅनीबाबत नक्की काय झाले शोधल्याशिवाय आपण वाचू शकणार नाही, याची खात्री दोघांना पटते. त्यामुळे ते प्रत्यक्ष अपघातस्थळावर जाण्याचे ठरवितात. त्या भागाचे नकाशे आणतात. डॅनी आपल्या अतिंद्रिय शक्तीने नकाशावरून मार्गही दाखवतो.‘प्रोजेक्ट पॅँडोरा’ नावाने अमेरिकन सरकारची गुप्त प्रयोगशाळा असते. दोघेही तेथे पोहोचतात. डॅनी पुन्हा आपल्या शक्तीने कडेकोट बंदोबस्तातील या प्रयोगशाळेत दोघांचा आतमधील प्रवेश सुकर करतो. तेथे गेल्यावर त्यांना धक्काच बसतो. डॅनीला प्रयोगशाळेत ठेवलेले असते आणि त्याच्यावर विविध प्रकारचे प्रयोग केले जात असतात. येथील एक सह्रदय शास्त्रज्ञ सर्व गोष्टींचा उलगडा करतो. जैविक हत्यारे तयार करण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत असतात. चीनमधील वुहान शहराजवळील एका प्रयोगशाळेत चीनी शास्त्रज्ञ वुहान-४०० नावाचा एक विषाणू तयार करतात. त्यांच्यातील एक शास्त्रज्ञ फितुर होऊन अमेरिकेत येतो. सोबत वुहान-४०० हा विषाणूही आणतो. या विषाणूचे वैशिष्टय म्हणजे तो फक्त माणसासाठीच घातक असतो. संसर्ग झाल्यावर चार तासानंतर तो सक्रीय होतो. मात्र, त्यानंतर बारा तासात संबंधित माणसाचा मृत्यू होतो. हा विषाणू फक्त मानवी शरीरातच जीवंत राहत असल्याने संपूर्ण शहर तेथील माणसे मारून रिकामे करणे शक्य असते.प्रयोगशाळेतीलच एका शास्त्रज्ञाला अनावधानाने संसर्ग होतो. नियमानुसार कोणाला या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्याला एका खोलीत कोंडून ठेवत असतात. तेथेच त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे घाबरून हा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेतून बाहेर पडतो. त्याचवेळी डॅनीच्या पथकाशी त्याची भेट होते आणि सगळ्यांनाच संसर्ग होतो. दरम्यानच्या काळात तेथे पोहोचलेली शास्त्रज्ञांचे पथक डॅनी, त्याचे शिक्षक आणि तेरा मुलांना प्रयोगशाळेत घेऊन येतात. डॅनी वगळता सर्वांचा मृत्यू होतो. फक्त डॅनीच्या शरीरात या विषाणूला प्रतिकार करणारी शक्ती असते. शास्त्रज्ञ लस बनविण्यासाठी त्याच्यावर प्रयोग करतात. त्याच्या शरीरात सतत चौदा वेळा हा विषाणू सोडला जातो मात्र तो त्याच्यावर मात करतो. मात्र, या सगळ्यामुळे त्याच्या मेंदूच्या पेशींमध्ये वाढ होते. त्यातून त्याला अतिंद्रिय शक्ती प्राप्त झालेली असते.डीन कुंट्ज या लेखकाने शंभराच्या वर कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील अनेक बेस्ट सेलर झाल्या. मात्र, चीनमध्ये कोरोना व्हायसरचा उद्रेक झाल्यावर ‘ दर आईज ऑफ डार्कनेस’ पुन्हा चर्चेत आली. डीन कुंटझने आयुष्यभर अमेरिकेत शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी १९८० च्या काळात ही कादंबरी लिहिली असे गृहित धरले तरी त्या वेळी चीन लष्करी सत्ता म्हणून पुढे आली नव्हती. माओंची सांस्कृतिक क्रांती संपुष्ठात आली होती आणि डेन झिओपिंग यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली होती. त्यांनी सर्व क्षेत्रांत क्रांतीकारक बदल केले होते. लष्करी खर्च मोठ्या प्रमाणावर कमी केला होता. मात्र, लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. नॅशनल डिफेन्स सायन्स, टेक्नॉलॉजी अॅँड इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली होती. संशोधनावर भर दिला जाऊ लागला होता. दुसºया बाजुला व्हिएतनामबरोबरील युध्दात चीनचा दारुण पराभव झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर डीन कुंटज यांनी पुढील काळात चीन मोठी लष्करी सत्ता झाल्यावर काय करू शकेल याची कल्पना केली की खरोखरच त्या काळात चीनच्या जैवीक युध्दाच्या तयारीचे संदर्भ मिळाले हा प्रश्न उरतोच!