भगवानगडावर पंकजा मुंडे जिंकल्या की हरल्या, त्यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी किती होती, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दिसणारी गर्दी वाढली की ओसरली, असे हिशेब जुळविणे सुरु आहे. मुंडेंचे समर्थक व विरोधक असे दोघे ही आकडेमोड करीत आहेत. भगवानगडाचे दरवाजे बंद झाल्याने आता मुंडे यांचे काय होणार, असाही प्रश्न होता. पण, या सगळ्या शंकांवर मात करीत आपले स्थान अधिक बळकट करण्याचा राजकीय प्रयत्न पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केलेला दिसतो. गडावर मेळावा घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केल्याने पंकजा यांच्या समर्थकांनी गडाच्या पायथ्याशी तो घेण्याचा तह स्वीकारला. या सगळ्या वादाचा फटका बसण्याऐवजी मेळाव्याचा ‘टीआरपी’ वाढला. यापूर्वी हा मेळावा नगर-बीड व वंजारी समाजापुरता मर्यादीत होता. यावेळी तो राज्यात गाजला. तणावाच्या परिस्थितीमुळे मेळाव्यात महिलांची संख्या कमी होती. वृद्धांपेक्षा तरुण जास्त होते. पण, गर्दीपेक्षाही मुंडे यांनी महादेव जानकर, सदाभाऊ खोत, राम शिंदे या मंत्र्यांना व राजू शेट्टी यांना व्यासपीठावर आणून स्वपक्षाला व विरोधकांनाही एक संदेश दिला. या तिन्ही मंत्र्यांना लाल दिवे मी मिळवून दिले असे त्यांनी उघडपणे सांगितले. मंत्र्यांनीही त्याची कबुली दिली. जानकर, खोत यांनी मंत्रिपदासाठी किती संघर्ष केला व भाजपाने त्यांना कसे झुलविले हे राज्याला ज्ञात आहे. अशा वेळी पंकजा यांनी हे विधान करुन भाजपात बहुजनांना आपणच न्याय देत आहोत, असे ठसविण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपदे फडणवीस नाही, तर मी ठरविते असेच त्यांना म्हणायचे असावे असे दिसते. मेळाव्यात उपस्थित मराठा आमदारांनाही पंकजा यांनीच उमेदवारी दिली असे जानकर यांनी या आमदारांकडून व्यासपीठावरच वदवून घेतले. पंकजा यांच्या पाठीशी किती ताकद आहे हेच यातून दाखविण्याचा प्रयत्न झाला. एकप्रकारे पंकजा यांचे अनुयायी म्हणून राजकीय दीक्षा समारंभच झाला. राज्यातील मराठा मोर्चांचे प्रायोजक हे शरद पवार व प्रस्थापित मराठा नेते आहेत, असा तर्क काढला जातो. या पार्श्वभूमीवर जातीचे मोर्चे दुर्देवी आहेत हे पंकजा यांचे विधानही अर्थपूर्ण आहे. मराठा आरक्षणाला समर्थन दाखवितानाच दलितांना मुख्य प्रवाहात का आणले नाही, असा मुद्दा मांडत त्यांनी दलितांबद्दल सहानूभूती दाखविली. ‘माधवं’ समीकरणात दलितांची मते वाढावीत या नव्या राजकारणाची नांदी म्हणून त्यांच्या या विधानाकडे पाहाता येऊ शकेल. पंकजा यांनी भाषणात स्वत:ला हिरकणीची उपमा दिली. आपला ‘अभिमन्यू’ केला गेलाय असेही म्हटले. कटकारस्थानांचा बुरुज उतरुन मी हिरकणीसारखी गड उतरुन खाली आले, या त्यांच्या विधानाचा रोख महंतांसोबतच सत्ताधारी व विरोधकांकडे होता. मुख्यमंत्री या वादावर काहीही बोललेले नाहीत. पवारांचेही मौन आहे. या दोघांनीच कारस्थाने करुन गडाचे दरवाजे पंकजा यांच्यासाठी बंद केले, असा वंजारी समाजाचा रोष आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गत वर्षी भगवानगडावरील गर्दी पाहून आश्चर्यचकित झाले होते. तेव्हापासूनच मेळाव्याविरोधात राजकारण शिजले, असे मानले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही भगवानगड सोडणार नाही. पुढील वर्षी महंतच बोलावतील, असे ठासून सांगितले गेले.भगवानगडाचा मेळावा राजकीय नाही असे सांगितले जाते. पण, सर्व भाषणे राजकारणाने ओतप्रोत होती. जानकर, खोत यांनी तर या अध्यात्मिक पीठावर ‘दलाल’, ‘हरामखोर’ असे आक्रस्ताळी शब्द वापरले. विरोधी पक्षनेत्याचे नाव जानकर यांनी उद्धटपणे उच्चारले. गर्दीवर स्वार होण्याच्या नादात आपण मंत्री आहोत हेही सारे विसरले. भगवानगड मंत्रिपद देतो, हे नेत्यांनीच जाहीर केले. त्यामुळे भगवानबाबांपेक्षाही मंत्रिपदांसाठी येथे गर्दी वाढेल, असे दिसते.- सुधीर लंके
फडणवीस,पवार आणि हिरकणी
By admin | Published: October 13, 2016 1:31 AM