- गजानन जानभोर
आयुष्यभर त्याने स्वत:ला उधळून दिले. हा फकीर घेणारा नाही, दोन्ही हातांनी वाटणारा आहे. त्यामुळे त्याला काहीही दिले तरी तो स्वत:जवळ काहीच राहू देत नाही. मान-सन्मान नाही आणि त्यातून येणारी प्रतिष्ठाही नाही...शेतकरी चळवळीचा प्रवाह जसजसा क्षीण होत गेला, तसतसे कार्यकर्ते वैफल्यग्रस्त झाले. यातील काहींनी व्यवस्थेशी जुळवून घेतले तर इतरांंनी सामाजिक जाणिवांशी त्रयस्थपण स्वीकारले. विजय यशवंत विल्हेकर नावाचा कार्यकर्ता मात्र तसाच राहिला. तो अजूनही व्यवस्थेशी भांडतो, शेतकऱ्यांसाठी पेटून उठतो, कंठ फुटेपर्यंत घोषणा देतो, आकाशाला भिडणारी गाणी म्हणतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी व्यथितही होतो. कष्टकऱ्यांवर जिथे अन्याय होतो तिथे विजूभाऊ धावून जातो आणि त्याच्या समस्यांची तड लागेपर्यंत तो तिथेच ठाण मांडून बसतो. त्यांच्याशी त्याचे हे वेदनेचे नाते वर्षानुवर्षांचे. शेतकऱ्यांसाठी त्याने केलेल्या आंदोलनांचा हिशेब नाही. जेलमध्ये कितीदा गेला? त्यालाही आठवत नाही. आपल्या सभोवतालची माणसे हतबल, निराश होताना त्याने पाहिली. काही लाचार होत प्रस्थापित होतानाही दिसली. विजूभाऊ मात्र चळवळीशी एकनिष्ठ राहिला. या फकिरीलाच त्याने आपले वैभव मानले.अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर हे विजूभाऊंचे गाव. तिथे कुटुंब राहते म्हणून हे मुक्काम पोस्ट. एरवी त्याच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असते. रस्त्यात भेट झाली की तो मित्रांना कडकडून मिठी मारतो. ‘जादू की झप्पी’ हे नाव त्यानेच दिलेले. संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई’ला हे नंतर सुचले. आपल्यापेक्षा कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या माणसाला तो न चुकता ‘सॅल्युट’ करतो. त्याच्या भेटीने मित्रांना बळ येते आणि कार्यकर्त्यांना उमेद. मग ते शरद जोशी असोत, चंद्रकांत वानखडे किंवा अमर हबीब... प्रत्येकाला तो हवा असतो. विजूभाऊ जेपींच्या आंदोलनातून घडला. छात्र युवा संघर्ष वाहिनीत तो होता. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा तो बिनीचा शिलेदार. चळवळीतील काही कार्यकर्ते आयुष्यभर कफल्लक राहतात. विजूभाऊला पैसे कमवावेसे कधी वाटले नाही. उलट आंदोलनासाठी त्याने घरची शेती आणि दागिनेही गहाण ठेवले. उद्या आर्थिक सुबत्ता आली तर चळवळीपासून आपण तुटून जाऊ, ही त्याची भीती. एकदा असे विरक्त जगायचे ठरवले की पुढे त्रास होत नाही. विजूभाऊ रोज स्वत:ची अशी परीक्षा घ्यायचा, अजूनही घेत असतो. त्याच्या लग्नात मंगलाष्टकांऐवजी बळीराजाच्या कल्याणासाठी साऱ्यांनी प्रार्थना केली. या निखाऱ्याला पत्नी सौ. सिंधूताई पावलोपावली जपते. ही माऊली या वादळाला साथ देते आणि संसारही सांभाळते. खरं तर अशा नि:संग कार्यकर्त्यांचे घराकडे दुर्लक्ष होते. बायको-पोरांमुळेच त्यांचा हा ‘संन्याशाचा संसार’ टिकून राहतो. अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या अंतरीच्या कळा समाजाला कधी ऐकू येत नाहीत. सिंधूताई आणि मुलांनी केलेला त्याग त्या अर्थाने विजूभाऊंपेक्षाही मोठा आहे. शेतकरी संघटनेच्या गावबंदी आंदोलनात तो आघाडीवर होता. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण दर्यापुरात येणार होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पण सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत हा लढवय्या हेलिपॅडवर पोहोचला आणि शेतकरी संघटनेचा झेंडा त्याने तिथे रोवला. बळीराजाचे राज्य येईल ही आशा त्याला अजूनही स्वस्थ बसू देत नाही. माणसांच्या जिव्हाळ्यात तो रमतो. त्याचे कार्यकर्तेपण कधी हरवत नाही. म्हणूनच हे वादळ शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी सतत घोंघावत असते. आपुलकी सामाजिक संस्थेचा ‘आपुलकी जीवन गौरव पुरस्कार’ विजूभाऊला जाहीर झाला आहे. आज २९ मार्चला अमरावतीत एक लाखाचा हा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात येईल. त्याचे त्याला अप्रूपही नाही. एव्हाना पुरस्कारानंतर तो ठरवून विसरूनही जाईल. मनासारखे जगता यावे, यासाठी त्याने स्वत:हून ही फकिरी पत्करली. त्याचे त्याला ना वैषम्य ना कौतुक! त्यातच तो सुखी आहे. आयुष्यभर त्याने स्वत:ला उधळून दिले. हा फकीर घेणारा नाही, दोन्ही हातांनी वाटणारा आहे. त्यामुळे त्याला काहीही दिले तरी तो स्वत:जवळ काहीच राहू देत नाही. मान-सन्मान नाही आणि त्यातून येणारी प्रतिष्ठाही नाही. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ‘कधी न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे, बांधू ना शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे’... ती विजूभाऊच्या भणंग आयुष्याला लागू पडते. म्हणूनच त्याचे असे नि:संग जगणे चळवळीतल्या फकिरांना श्रीमंत करणारे आहे.