- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेराजस्थानमधील अरवली पर्वतशृंखलेतील अबू (सिरोही जिल्हा) येथील रंगीबेरंगी वृक्षवेलींनी नटलेल्या सनसेट पॉइंटवर आम्ही बरेच लोक उत्सुकतेने उभे होतो. समोर नजर पोहोचेल तिथपर्यंत सपाट आणि विस्तीर्ण वाळवंट दिसत होते. मंद वायुलहरींचा वेग वाढला. मैदानावर उठलेल्या धुळीच्या आणि वाळूच्या ढगांनी क्षितिजाला गिळून टाकले. अस्ताचली निघालेल्या सूर्याला त्या अवडंबराने अकाली वेढून टाकले. या गुजरात टूरची सुरुवातच प्रभास क्षेत्रापासून झाली होती. एकेकाळी श्रीकृष्ण एका अश्वत्थ वृक्षातळी नि:स्तब्ध बसले असताना त्यांचे गुलाबी तळवे जणू मृगाचे कान आहेत असा भास जरा नावाच्या व्याधाला झाला. त्याचा बाण लागण्याचे निमित्त श्रीकृष्णाच्या देहत्यागास पुरेसे वाटले. २०१६ या वर्षाचा अस्त आज मनाला असाच अस्वस्थ करतो आहे.२०१५ सालची सांगता आमच्या सुखाच्या खुज्या मोजपट्ट्यांनुसार छान झाली होती. साहित्य विहारच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध कवयित्री आशा पांडे आणि पद्मगंधाच्या अध्यक्ष व सुप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी शासनाकडून कोणतीही मदत न घेता १९ व २० डिसेंबर २०१५ला नागपूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तमपणे यशस्वी केले. विदर्भाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून सा.सं.ची ‘दखल’ ही माझे संपादन असणारी स्मरणिकाही वाखाणली होती.२०१६ हे वर्षही बरे जाणार अशा अपेक्षेत असताना ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. वैचारिक स्वातंत्र्यासाठीच अमेरिका ओळखली जाते. त्या विकसित लोकशाहीत सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात नाही कारण विकसित लोकशाहीत मतभेदांना मानाचे स्थान असते. सगळे जग ग्लोबल वॉर्मिंगच्या चिंतेत असताना ‘वी नीड ग्लोबल वॉर्मिंग’ अशा शब्दात पर्यावरणाची काळजीच त्यांनी विक्षिप्तपणे फोल ठरवली. अल्बर्ट आईनस्टाईनने जर्मनीचे नागरिकत्व सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचे ठरवले ते या विचारस्वातंत्र्यासाठीच.८ नोव्हेंबरलाच आपल्याकडे विमुद्रीकरणाचा निर्णय प्रसारित झाला आणि बँका, एटीएमसमोर, स्वत:चेच पैसे काढण्यासाठी ताटकळणारी, भविष्याविषयी चिंतित जनता दिसू लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७० वर्षात आमची प्रगती नव्हे तर अवनतीच केवळ झाली हे ऐकताना वाटले की जणू जुन्याचा पूर्ण विध्वंस करून, उलथापालथ (डिसरप्शन) करून नवे वर्ष येणार आहे. नवे वर्ष पण तारखा त्याच जुन्या क्रमाने असतात. जुन्या भूमीवर दरवर्षी नवे अंकूर, नवे स्वप्न घेऊन उमलतात. याविषयीची कृतज्ञता ‘जो तो वंदन करी उगवत्या’ ही मानसिकता ठेवणारा समाज विसरला का? उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या मावळत्या दिनकराला आवर्जून आम्ही वंदन करतो ते याचसाठी. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीच. जे दरवर्षी मृगजळाप्रमाणे दूरदूर जात असते.
मावळत्या दिनकरा
By admin | Published: December 31, 2016 4:40 AM