- प्रा. डॉ. विश्राम ढोले, समाजमाध्यमांचे अभ्यासक
सध्याचे इंटरनेटचे जग तसे द्वीमिती. ते उलगडते लांबी-रुंदी असलेल्या द्विमिती पडद्यावर. पण मेटा या नव्या नावाद्वारे फेसबुकमेटाव्हर्सची जी नवी दुनिया सुचवते आहे ती आभासी त्रीमितीची तर असेलच, पण वावराच्या, संवेदनांच्या ज्या शक्यता प्रत्यक्ष जगामध्ये उपलब्ध नाही त्याही तिथे अनुभवायला मिळू शकतील. लांबी, रुंदी, खोली यांच्यासोबतच चित्र, प्रतिमा, ध्वनी, स्पर्श यांचाही एक एकात्मिक आभासी पण गुंगवून टाकणारा (इसर्मिव) अनुभव मेटावर्स देऊ शकते.
मध्यंतरी ‘पोकेमान गो’ या खेळा ने जगभर धुमाकूळ घातला होता. तो खेळ या मेटाव्हर्स कल्पनेचा एक अगदी प्राथमिक आविष्कार. आजमितीला असे अनेक प्रगत खेळ उपलब्ध आहेत. खरेतर आज मेटाव्हर्स संकल्पना अधिक प्रकर्षाने अनुभवायला येते, ती डिजिटल गेमिंगच्याच क्षेत्रात. तिथे प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवनव्या खेळांबरोबरच आभासी सांगितिक कार्यक्रम, गप्पांचे कट्टे आकाराला येत आहेत. अतर्क्य, विलक्षण असे एक अनुभवाचे दालन उघडले जात आहे.
महाभारतातील मयसभेप्रमाणे भासणाऱ्या या नव्या मयसभेवर फेसबुकला वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. सोशल मिडिया पोस्ट, व्हिडिओ, फोटो, लाईक्स, शेअर याच्या पलिकडे जाणाऱ्या, संवेदनांच्या पातळीवर गुंगवून टाकणाऱ्या, विलक्षण अनुभव देऊ शकणाऱ्या पराविश्वात (मेटाव्हर्स) फेसबुकला बस्तान बसवायचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून छोट्या-मोठ्या प्रकल्पांद्वारे फेसबुकची त्यादृष्टीने तयारी सुरूही होती. होरायझन वर्करूम नावाच्या आभासी सुविधा त्यातलीच एक. विशिष्ट डिजिटल शिरोधान (हेडगिअर) लावले तर या सुविधेमुळे एकमेकांपासून हजारो किलोमीटरवर असलेल्या व्यक्तींना अगदी शेजारी बसून चर्चा करीत असल्याचा भास होतो. भविष्यातील कार्यालयांचे आणि कामकाजाचे स्वरूप यामुळे अंतर्बाह्य बदलेल असे फेसबुकचे म्हणणे आहे. फक्त कार्यालयच नव्हे तर घराच्या आतील दुनियाही मेटाव्हर्समध्ये आणण्याचा फेसबुकचा मानस आहे. त्यासाठी होरायझन होम ही सुविधा कंपनी विकसित करीत आहे. यामध्ये तुम्ही तुमचे एक आभासी घर विकसित करू शकता. तिथे तुमचा आभासी अवतार तुमच्या मित्रांच्या अवतारांना जेवणाचे निमंत्रण देऊ शकतो. अवतार मित्रमंडळी मिळून घरीच पिक्चर बघू शकता. आणि या अवतारांच्या माध्यमातून तुम्हाला त्याच वेळी या साऱ्याचा आभासी अनुभवही घेता येईल.
होरायझन वर्ल्डस् ही फेसबुकची आणखी मेटा सुविधा. घर आणि कार्यालयाबाहेरच्या जगामध्ये शक्य असलेल्या आणि सध्या शक्यतेच्या परिघाबाहेर असलेल्या अनेक अनुभवांचे आभासी विश्व होरायझन वर्ल्ड खुले करून देईल. खरेदी-विक्रीचा अनुभव हा तर अशा अशा प्रकारच्या प्रयोगांसाठीचे सर्वात आकर्षक क्षेत्र. मेटाव्हर्सची दुनिया तेही बदलून टाकेल. अगदी उदाहरणच द्यायचे तर आज अमेझॉनवरून खरेदी करताना आपल्याला वस्तूला फक्त पाहून अनुभवता येते. मेटाव्हर्सच्या दुनियेत वस्तूला आभासी पद्धतीने हाताळून मग विकत घेता येईल. कपडे खरेदी करायचे असतील तर आधी आपल्या आभासी प्रतिमांवर ते चढवून पाहता येतील. आपल्या त्याखेरीज डिजिटल अवतार संकल्पनेवर आधारीत आभासी सुविधांवरही फेसबुकचे काम सुरू आहे. अर्थात अशा सुविधांवर काम करणारी फेसबुक एकच कंपनी नाही. इतरही बऱ्याच आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून इंटरनेटच्या युनिव्हर्सचे भविष्यातील हे मेटाव्हर्स रूप आकाराला येईल.
अर्थात इतके मोठे बदल काही लगेच घडून येणार नाही. मेटाव्हर्सच्या शक्यता या आधीही व्यक्त केल्या जात होत्याच. पण ते प्रत्यक्षात येण्याचा वेग अपेक्षेपेक्षा बराच कमी आहे. फेसबुकनेही येत्या दहाएक वर्षात मेटाव्हर्सचे जग टप्प्याटप्प्याने आकाराला येईल असेच म्हटले आहे. एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या आणि येऊ घातलेल्या तरुणाईला आपल्या जाळ्यातून सुटू द्यायचे नसेल तर विसाव्या शतकात विकसित झालेले इंटरनेटचे युनिवर्स उपयोगी नाही. तिथे मेटावर्सची मयसभाच निर्मिली पाहिजे अशी ही फेसबुकची धारणा आहे. फेस आणि बुक या दोन्ही कल्पनांच्या पलिकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे.
एका अर्थाने घर, कार्यालय, खरेदी, सामाजिक वावर आणि सामाजिक चर्चा अशा आपल्या अस्तित्वाच्या आणि अनुभवांच्या साऱ्याच क्षेत्रांना मेटाव्हर्सने प्रभावित करण्याची फेसबुकची दीर्घकालीन योजना आहे. फेसबुकचे मेटा हे नामांतर त्याची एक औपचारिक घोषणा आहे. (उत्तरार्ध)