आसवांच्या ओलितात हंगाम गेला रिता... भूमिपुत्र भवरलाल सांगे सिंचनाची गीता... शेतकऱ्यांच्या आसवांना आश्वस्त करणारं भवरलाल जैन हे विरक्त हसू आता विरलेलं आहे. ‘भाऊ’ म्हणून सर्वपरिचित असलेले भवरलालजी हे एक महान भूमिपुत्र. शेतकऱ्यांना थेंबाची गीता त्यांनी सांगितली... थेंबातून क्रांती घडवली. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस इतका गंभीर होत चाललाय, की तिसरे महायुद्ध पाण्यावरून होेईल, असे म्हटले जाते. जलसमस्येवर जग आता बोलत असताना ५० वर्षांपूर्वी भवरलालजींनी त्यावरील उपायांची पायाभरणी द्रष्टेपणाने केली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. जिल्हाधिकारीपदापर्यंत संधी होती. मनात मात्र पाणी पिंगा घालत होते. आईने सांगितले, की नोकरी करशील तर स्वत:चा आणि कुटुंबाचा पोशिंदा होशील. असा काही उदीम कर, की हजारोंचे पोट भरेल, लाखोंचा पोशिंदा होशील. इथूनच भवरलाल जैन नावाचे पाणीपर्व सुरू झाले. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील वाकोद या खेड्यातून सुरू झालेली वाटचाल आता विश्वव्यापी बनली आहे. वाघूर नदीच्या काठावर अंकुरलेल्या या स्वप्नाने सातही समुद्र पार केले आहेत. जैन उद्योगसमूहाच्या प्रकल्पांनी सातही खंड व्यापलेले आहेत. भाऊंनी आपल्यामागे सगळ्यांसाठीच ठेवा म्हणून सोडलेल्या या अभूतपूर्व यशाच्या तळाशी कल्पना, कष्ट आणि करुणा होती, आध्यात्मिक अधिष्ठानही होते. वैयक्तिक पातळीवर कसलीही आसक्ती नव्हतीच... जे काही करायचं होतं, ते सांघिक हितासाठी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर जल-शेती-मातीभोवतीच फिरणारं असं काही तरी मला करायचं होतं, की आपल्याकडे काम करणाऱ्यांना काही मिळेल, जो शेतकरी आपल्याला खूप काही देतो त्या शेतकऱ्याला बरंच काही मिळेल, गुराढोरांना मिळेल, चिऊकाऊला आणि मग उरेल ते थोडं आपल्यालाही... व्यावसायिक वाटचालीत एका टप्प्यावर समोर संकटही आले. डोलारा जरा हलला; पण घसरण त्यांनी लपवली नाही. ‘मी चुकलो’ अशी जाहीर कबुली दिली. त्यांचा हा प्रांजळपणा समाजाला भावला आणि अशा प्रकारे त्यांनी विश्वासार्हतेचे उदंड पीक घेतले. एक कल्पक, यशस्वी आणि समर्पित उद्योगपती एवढीच भाऊंची ओळख नाही. एक संवेदनशील माणूस, सर्जनशील विचारवंत, आदर्श पुत्र, पती, पिता, कुटुंबप्रमुख आणि मित्र... अशा मानदंडांच्या कितीतरी वाटांना भवरलाल जैन या एका व्यक्तिमत्त्वाकडे जाऊन मुक्काम करावासा वाटेल, असे हे अजब रसायन होते. कुटुंबव्यवस्था ढासळत असताना चार मुले, सुना आणि नातवंडे, असे सारे एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदताहेत, ही किमया त्यांनी साधली. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संस्कार या किमयेच्या मुळाशी आहे. एकत्र कुटुंब पद्धती, भारतीय संस्कार, पती-पत्नींतले नातेसंबंध, मातृ-पितृभक्ती यांबद्दल अत्यंत मौलिक विचार भवरलाल जैन यांनी आपल्या विपुल लेखनातून मांडले आहेत. समाजातील सज्जनशक्ती एकत्र येण्याचा आग्रह धरत त्यांनी मौलिक विचारांचे धन समाजाला दिले. ‘ती आणि मी' या पुस्तकातून सहजीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. ‘कर्मचारी’ हा शब्दही जैन उद्योगसमूहाच्या शब्दकोशात नाही. इथे सगळे सहकारी आहेत. ‘भाऊं’च्या विचारांवर आधारलेल्या जैन उद्योगसमूहाच्या कार्यसंस्कृतीने कामावरील मालक हे एक तत्त्व स्वीकारले आहे. भाऊंच्या देण्यातून सेवेच्या कितीतरी सुंदर लेण्या कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. महात्माजींवर भाऊंनी साकारलेले ‘गांधीतीर्थ’ हे स्मारक तर केवळ विश्ववैभवी. गांधीविचार हा त्यांच्या जीवनाचा आधार होता. नेहरूंचा स्वप्नवत समाजवाद आणि आदर्शवाद ते जगले. गरीब-श्रीमंत ही दरी मिटविणाऱ्या उपक्रमांना, प्रकल्पांना पदरचा पैसा देण्याला ते परोपकार मानत नसत; धन्यता मानत असत. ‘लोकमत’ खान्देश आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात पहिला ‘खान्देशरत्न’ पुरस्कार देऊन भवरलालजींना गौरविण्याची संधी आम्ही घेतली होती. वस्तुत: त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणे, हे आमच्यासाठी गौरवास्पद होते. ‘पद्मश्री’सह कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या राशी त्यांच्याभोवती पडल्या. प्राप्तीच्या सर्वच पातळ्यांवर त्यांनी आकाश स्पर्शले; पण मातीशी असलेली नाळ हलू दिली नाही. कर्म हेच त्यांच्या या उपलब्धीमागचे बळ होते. कर्म हाच त्यांचा श्वास होता आणि अखेरपर्यंत ते कार्यमग्न राहिले. काम कुणापेक्षाही अधिक महत्त्वाचे, यावर ते ठाम होते. त्यात स्वत:च्या मृत्यूचाही अपवाद केला नाही. भाऊंनी स्वत:च्या मृत्यूबद्दलही थेट सांगून ठेवलेलं होतं. ‘सर्वच जातात, मीही जाईन; पण मी गेलो म्हणून काम बंद करू नका. कंपनीचा कुठलाही विभाग बंद ठेवू नका. जमलं तर माझं एक छोटं थडगं बांधा... आणि त्यावर लिहा... ‘कर्म हेच जीवन...’ आता कृषीपंढरीचा हा कर्मयोगी वारकरी पुन्हा दिसणार नाही. हा चटका दीर्घ काळ हुळहुळत राहणार आहे...
कृषीपंढरीचा वारकरी
By admin | Published: February 27, 2016 4:25 AM