भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ, खेळात कोणी तरी हरणार आणि कोणी तर जिंकणार वगैरे तत्वचिंतन येथे किमान प्रेक्षकांच्या बाबतीत तरी कधीच कामाला येत नाही. मैदानावर संबंधित संघांमधील खेळाडू भले आपसात ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’ दाखवून देत असले तरी प्रेक्षकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो आणि याबाबत दोन्ही देशांमधील (बांगला देश म्हणजे आधीचा पाकिस्ताच की) प्रेक्षकांमध्ये तसूभरही फरक नाही. वीस षटकांच्या मर्यादित सामन्यांच्या विश्व करंडक सामन्यात भारताने आपला पहिला सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावला तेव्हां भारतीय प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली खरी, पण ती तेवढ्यापुरतीच. पण अशीच हार पाकिस्तानशी खेळताना पदरात पडली असती तर धोनीच्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा जीव नकोसा करुन टाकला गेला असता. अर्थात हा कल्पनाविलास नाही. धोनीच्या घरावर लोक चालून गेले तो इतिहास काही फार जुना नाही. अगदी हाच आणि असाच प्रकार पाकिस्तानातही. आशियाई स्पर्धेत बांगला देशने पाकिस्तानाला हरवले तेव्हां समाज माध्यमांमधून दुबईत बसलेल्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचे आकांडतांडव बरेच फिरत होते. याच स्पर्धेतील अंतिम सामना बांगला देश आणि भारतात झाला आणि भारत जिंकण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचला तेव्हां शेर ए बांगला स्टेडियममध्ये जणू मातम पसरला होता. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडल्यानंतर या प्रारंभिक सामन्यालाच अंतिम सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले. उभय देशांमधील ‘हूज हू’ मोठ्या संख्येत या सामन्याला हजर राहिले. सामना फारसा अटीतटीचा न होता विराट कोहलीने भारताला विजय मिळवून दिला आणि मातम पसरला पाकिस्तानात. पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्या नावाने अक्षरश: शिमगा सुरु झाला. त्याला प्रचंड शिवीगाळ सुरु झाली आणि अखेर लोकांच्या दबावाला बळी पडून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने आफ्रिदीची कप्तानपदावरुन चक्क हकालपट्टी केली. याचा अर्थ जसे प्रेक्षक तसे प्रशासक. जगातील कोणत्याही संघाने हरवले तर दोन्ही देशात त्याचा काही परिणाम होत नाही. पण भारताने पाकला वा पाकने भारताला? लाहौल वलाकुवत!