- संजय मोने, अभिनेता
अतुल परचुरे हा माझ्यासाठी किंवा आमचा पाच-सहा जणांचा एक समूह आहे किंवा अगदी सरळ सांगायचे, तर एक टोळकं आहे तो आमच्यात वयाने सर्वात लहान होता, तरी आमच्यात एकदम चपखल कसा काय बसला? झालंच तर शिवाय पूर्वी शिवाजीपार्क कट्टा, जी पंधरा-सतरा लोक सकाळचा व्यायाम करून दमल्यावर टेकायची एक जागा होती. त्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतुल कोण होता?, त्याच्या मालिकांमधील सहकारी कलावंतांचा त्याच्याकडे पाहायचा काय दृष्टिकोन होता?, त्याचे दिग्दर्शक त्याच्याकडून भूमिका करवून घेताना काय अपेक्षा ठेऊन असायचे?, तो काही काळ बँकेत काम करत होता, त्यातल्या त्या इतर लोकांना अतुलबद्दल नेमकं काय वाटायचं?, या सगळ्याची उत्तरं मिळवायची, तर प्रत्येकाकडून त्याबद्दल वेगवेगळे लेख लिहून घेतले जाऊ शकतात. पण, सगळ्या लेखांत एक गोष्ट शंभर टक्के नक्की असेल आणि ते म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. त्याचं वाचन, विषयाचं क्षणार्धात आकलन करवून घेण्याची क्षमता.
मी आणि आमचं सध्या जवळपास रोज सकाळी भेटणारं टोळकं, रोज म्हणजे गेली चाळीसएक वर्ष रोज भेटणारे लोक. त्यांना अतुल म्हणजे काय वाटतं, दुर्दैवानं आता वाटत होतं, असं म्हणायला लागेल. खरंतर मी केवळ संगणकावर लिहितोय, म्हणून हा स्मृतीरंजन करवून घेणारा लेख लिहितोय. हाताने पेन वापरून लिहायला माझ्याकडे ती ताकद अजिबात नाही. बोटं बधीर होतील. मेंदू बिंदूचं काय होऊ शकेल, याची कल्पनाही करू शकत नाही.
अतुल हा अत्यंत उत्तम नट आहे. आपल्या शरीरयष्टीच्या (उंची आणि रुंदी सकट) सगळ्या मर्यादा झुगारून इतकी वर्षे एकाहून एक भूमिका वठवायला एक विशिष्ट दर्जाची गुणवत्ता लागते. (हल्ली गुणवत्ता आणि भूमिका वठवणं याला फार काही लागत नाही) आणि अतुलकडे ती थोडी जास्तच होती. त्याची ती अधिक गुणवत्ता जर दुसऱ्या कोणाला देण्याची सोय जर उपलब्ध असती, तर बिचारे अजून दोन-चार कलाकार पुढे जाऊन आपापली कारकीर्द सुखाने पार करते झाले असते. गुणवत्तेबरोबरच आवाजाचा वापर करणं, समोरच्या प्रेक्षकांची त्या-त्या प्रयोगाची येताना सर्वसाधारण काय मनोवस्था असेल, याचा अंदाज घेऊन नाटकाची सुरुवात कशी करायची याबाबत त्याचं गणित विलक्षण होतं.
व्यक्ती आणि वल्ली या नाटकात तो नायकाची म्हणजे पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकार करायचा. (मी त्याच्याबरोबर काही प्रयोग मी एक वल्ली म्हणून केले होते, म्हणून सांगतोय. मी भूमिका करायचो हे सांगायचा माझा अजिबात हेतू नाही.) पडदा उघडल्यावर त्याचं पहिलंच वाक्य रोज वेगळ्या तीव्रपणे तो उच्चारायचा. हे का करायचा?, कारण त्याच्या मते त्याला आजच्या प्रयोगाला आलेल्या साधारण किती टक्के लोकांनी पु. ल. देशपांडे यांचं साहित्य वाचलं असावं, ते त्याला कसं कोणास ठाऊक पण कळायचं. हे आश्चर्यकारक आहे. त्याच्या कितीतरी भूमिका त्याला शरीर पातळीवर विसंगत वाटतील अशा होत्या, पण त्या त्याने विलक्षण परिणामकारकरीत्या सादर केल्या.
तरुण तुर्क म्हातारे अर्क, बे दुणे पाच, वासूची सासू अशी अनेक नावं आहेत. त्याबद्दल त्याला भरपूर मान-सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सगळ्यात मोठी प्रशंसा त्याला दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांच्याकडून मिळाली होती. त्यांना मनापासून वाटायचं की, व्यक्ती आणि वल्लीमधील भाऊ हे पात्र अतुलने साकार करून हुबेहूब त्यांचा पूर्ण आभास निर्माण केला होता. विश्राम बेडेकर यांच्या टिळक आणि आगरकर या नाटकात त्याने आगरकरांच्या पुतण्याची भूमिका साकार केली होती. त्याच्या स्पष्ट आणि अत्यंत उत्तम मराठी भाषा बोलण्यामुळे स्वतः बेडेकर खूश झाले होते.
अतुल हा अत्यंत रसिक होता. गाण्याची किंवा मैफिली ऐकण्याची त्याला आवड होती. नव्हे त्याला त्यात गती होती. उत्तम कपडे वापरावेत, अत्तर वापरावी, चविष्ट खावं यांनी तो सुखावून जायचा. स्वतः उत्तम स्वयंपाक करायचा आणि इतरांना खाऊ घालायचा. विनोदाचा त्याला वरदहस्त लाभला होता. अंमळ तिखट पण अत्यंत चविष्ट विनोद त्याच्या मुखातून बाहेर पडायचे. एकदा झालं असं की, अतुलला उंची घड्याळे वापरायला मनापासून आवडायची. एकदा एका सहकालाकाराने, त्याचं दुर्दैव म्हणून अतुलला विचारलं, ‘एवढी महाग घड्याळांचा काय उपयोग? सगळ्यात वेळ सारखीच दिसते नाही का? मी बघ! सातशे रुपयांचं घड्याळ वापरतो.’आपलेच दात ओठ जोरात खाऊन कशाला त्यांना त्रास द्यायचा म्हणून अतुलने दीर्घ श्वास घेतला. (तो असा दीर्घ श्वास घ्यायला लागला की, आता लवकरच स्फोट होणार हे आम्ही अनुभवावरून जाणून होतो. पण, उत्तर काय येतंय याची उत्सुकता होती.)‘ते तरी का वापरतोस? राजाबाई टॉवरच्या जवळ जाऊन फुकटात वेळ कळेल. सातशे रुपये वाचतील, नाही का?’ अत्यंत भिकार प्रयोगात त्याच्याहून भिकार काम करून एक प्रशिक्षित कलाकार त्याच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, ‘सर! कसं वाटलं माझं काम?’ आम्हाला वाटलं की, आता एक दीर्घ श्वास घेतला जाणार, पण अतुल गप्प होता. आम्हीच दीर्घ श्वास घ्यायला लागलो होतो.‘छान झालं तुझं काम! पहिली रांग थोडी लांब होती नाही, तर तुझं काम आवडलं असतं अधिक.’ ‘पण तुम्ही तर थोडा वेळ झोपला होतात.’ ‘तरीही विचारतोस काम कसं झालं? सांगू?’असं म्हणून त्याने दीर्घ श्वास घेतला, आजपर्यंत तो नट पुन्हा कोणाला दिसला नाही, जरी अतुल असा तिखट होता, तरीही त्याच्या बरोबर सहकलाकार म्हणून काम करणाऱ्यांना त्याचा फार आधार वाटायचा. त्यांना कायम तो सूचना करायचा. खरंतर आम्हालाही त्याने सूचना कराव्या, असं वाटायचं. त्यालाही कदाचित वाटत असणार, पण केवळ वयाचा मान ठेऊन तो करत नसावा, म्हणून आम्ही त्याला कायम साहेब म्हणायचो. आज आमचा साहेब आता फक्त कै. साहेब झाला, बाकी तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत.