किरण अग्रवाल -
सण कोणतेही असोत; ते आनंद, उत्साह व ऊर्जा प्रदान करणारेच असतात. त्यामुळे संकटांवर किंवा अडचणींवर मात करीत ते साजरे होताना दिसतात. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच अपेक्षेने बाजारात चैतन्य संचारलेले दिसत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे इतके दिवस तुंबलेले जनजीवन आता प्रवाही होताना दिसत आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. बाजारात दिसणारा हा उत्साह गत पाच-सहा महिन्यातील निराशादायी वातावरणावर समाधानाची फुंकर मारणाराच म्हणावयास हवा. शासनानेही हळूहळू अनेक निर्बंध हटविल्याने जनजीवन पूर्वपदावर आलेले दिसत आहे. अडखळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत चालल्याचे तर संकेत यातून मिळत आहेतच, शिवाय जनतेच्या मनात जी भीतीची छाया दाटून होती ती दूर होण्यासही यामुळे हातभार लागत आहे ही सर्वात मोठी जमेची बाब म्हणता यावी.
दिवाळी अवघी आठवडाभरावर आलेली असल्याने बाजार फुलला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी व्यावसायिक क्षेत्रात सीमोल्लंघन करीत नवी व्यवस्था वा प्रणालीचा अंगीकार केलेला दिसून आला. कोरोनाने एकूणच जीवनशैली बदलून ठेवल्याचे पाहता त्याचा परिणाम व्यवसायावरही होताना दिसत आहे. संकटामुळे का होईना, काळाची गरज लक्षात घेता अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यापार-उदिमात नवीनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीलाही इष्टापत्ती ठरवून पुढे जाण्याचा बाणा यातून स्पष्ट झाला. कार्पोरेट पातळीवरील रिलायन्ससारख्या मोठ्या समूहांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचे जागतिक कंपन्यांशी झालेले करार-मदार या काळात पहावयास मिळालेत. व्यावसायिकदृष्ट्या या मोठ्या कंपन्यांच्या आपसी भागीदाऱ्या व त्यातील टक्केवारीची चर्चा करण्याचे हे ठिकाण नाही, मात्र यामुळे त्यांचा व्यवसाय व आवाका वाढल्याचा लाभ अंतिमतः ग्राहकांनाही होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाला लक्षात घेता आगामी काळातील गरजांनुसार उत्पादन तर पुढे येत आहेच, शिवाय जे आहे त्याच्या वितरणात सुलभता व अभिनवता आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, जे ग्राहकांच्याच हिताचे ठरणार आहे. यामुळे एकूणच बाजारात जे उत्साहाचे वातावरण आकारास आले आहे त्यामुळे अलीकडे निर्देशांकसुद्धा उसळी घेत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हबकलेल्या मानसिकतेला यामुळे उभारी मिळून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
कोरोनाचा वेग मंदावल्याचे पाहता व त्यावर काहीसे नियंत्रण मिळवता आल्याने शासनानेही हळूहळू अनलॉक करीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. धार्मिक स्थळे उघडण्याविषयीचे व अन्य काही बाबतीतले निर्बंध कायम आहेत हे खरे, त्यावरून शासनाला विविध आरोपांना व नाराजीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे; पण सुरक्षिततेच्या भूमिकेतून त्याकडे पाहता यावे. अनलॉक करून स्थिती पूर्वपदावर आणताना शासनाने आता अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. उद्योजकांना तारणमुक्त पत हमी मिळावी याकरिता आत्मनिर्भर भारत योजनेत आपत्कालीन पत हमी योजना घोषित करण्यात आली होती, त्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख कोटींपेक्षा जास्त वित्त पुरवठा करणाऱ्या कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येते. ही योजना आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली गेली असल्याने त्याचा लाभ कर्जदारांना होऊ शकेल. राज्यशासनाने स्टॅम्प ड्यूटीत कपात केल्यामुळे गृह विक्री वाढून गेली आहे. नाइट फ्रॅंक इंडियाने यासंदर्भात नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत मागील आठ वर्षाच्या तुलनेत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च गृह विक्री झाल्याचे आढळून आले आहे. एका महिन्यात 42 टक्क्यांची ही वाढ असल्याचे म्हटले गेले आहे. आयएचएस मार्किटच्या अहवालानुसार देशातील सेवा क्षेत्राचा वृद्धीदरही ऑक्टोबरमध्ये सुधारला आहे. सप्टेंबर मध्ये 49.8 अंकावर असलेला हा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये 54.1 वर गेला आहे जो वृद्धी दर्शवतो.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली; पण गुणवत्तेवर ज्यांची नोकरी शाबूत आहे अशा नोकरदारांना 2021 मध्ये वेतनवाढ देण्याची तयारी 87 टक्के कंपन्यांनी दाखविल्याचे व्यावसायिक सेवा क्षेत्रातील ‘एओन’ने सर्वेक्षणाअंती म्हटले आहे. विविध सरकारी व सहकारी नागरी बँकांनीही गृह व वाहन कर्जाचे दर कमी केल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. थोडक्यात सर्वच क्षेत्रांत ‘फील गूड’चे वातावरण आहे. ही सकारात्मकता व उत्साहाची स्थितीच यापुढे वेगाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, फक्त ती टिकवून ठेवायची असेल तर शासनाने म्हटल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ओळखून जनतेनेही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कोरोना रोखण्यासाठी उपचाराचा भाग म्हणून जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात येत असले तरी अनिर्बंध होऊन चालणार नाही. जागोजागी बाजारात गर्दी होत असल्याचे पाहता सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज असून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे हा सवयीचा भाग बनवून घ्यावा लागेल. तसे घडून येवो व दिवाळीच्या निमित्ताने आकारास आलेली बाजारातील उत्साहाची स्थिती यापुढे कायम टिकून व वृद्धिंगत होत राहो याच अपेक्षा.