- मिलिंद कुलकर्णीमोठी परंपरा असलेल्या सारंगखेडा (जि. नंदूरबार) येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सव आणि त्याअनुंषगाने भरणा-या अश्वबाजाराला पर्यटन महामंडळाने ‘चेतक फेस्टिव्हल’च्या रूपाने नवा आयाम दिला आहे. खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.महानुभाव पंथीयांचे पवित्र स्थान असलेल्या सारंगखेड्याच्या एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षी दत्त जयंतीला मोठी यात्रा भरते. खान्देश, मराठवाडा, नाशिक तसेच लगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने यात्रोत्सवासाठी येत असतात. यात्रोत्सवासोबत असणारा अश्वबाजार प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब या प्रांतातून अश्व व्यापारी, व्यावसायिक, संस्थानिक, हौशी अश्वप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. अश्वबाजारात पुष्करचा मोठा लौकिक आहे. त्या धर्तीवर या ठिकाणी उत्सव व्हावा, अशी खान्देशवासीयांची अनेक वर्षांपासूनची मनीषा होती. सारंगखेडा ग्रामपंचायत त्यांच्या परीने सुविधा उपलब्ध करून देत होती. परंतु त्याला मर्यादा होत्या.शेजारील धुळे जिल्ह्यातील जयकुमार रावल हे मंत्री झाले. त्यांच्याकडे पर्यटनमंत्री आणि नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले आणि या विषयाला खºया अर्थाने चालना मिळाली. पर्यटन महामंडळाने या उत्सवाला अधिकृतरीत्या प्रोत्साहित केले. अहमदाबादच्या खासगी कंपनीला ‘चेतक फेस्टिव्हल’च्या आयोजनाचे १० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आणि या उत्सवाचे एकंदर रूप पालटले.यंदाच्या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन केले.नंदूरबार जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या निधीतून तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन संकुल, सारंगखेडा व प्रकाशा या तापीकाठाच्या गावात जलक्रीडा योजना, प्रकाशाच्या संगमेश्वर मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दूरदृष्टी, उपक्रमशीलता आणि पर्यटन महामंडळाचा केलेला कायापालट याविषयी जाहीरपणे कौतुकोद्गार काढले. पर्यटनमंत्र्यांनी सारंगखेड्यासोबत नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातील रावलापाणी, उनपदेव, लळिंग किल्ला, भामेर किल्ला यांचा विकास करण्याची घोषणा केली. यंदाच्या उत्सवाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कर्नाटकचे पणनमंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्यासह जपान, अमेरिका, रशिया या देशातील अश्वप्रेमींनी हजेरी लावली.३ डिसेंबर ते २ जानेवारी असा महिनाभराचा चेतक फेस्टिव्हल खºया अर्थाने देखण्या स्वरूपात साजरा होत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम निवास व भोजन व्यवस्था, साहसी क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तापी बंधाºयाच्या काठावर तंबूचे गाव वसविण्यात आले आहे. साहसी क्रीडा प्रकारांची व्यवस्था करण्यात आली आहे. अश्वबाजारात रोज घोड्यांच्या स्पर्धा, कसरती, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहेत. रशियन छायाचित्रकार कातिया डूज हिने केवळ घोड्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. कोट्यवधीची उलाढाल होणाºया या अश्वबाजार, उत्सवामुळे स्थानिकांना मोठा रोजगार मिळाला आहे.
पर्यटनाला नवा आयाम देणारा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:13 PM