सत्तेचे लोणी चाखण्यासाठी मुंबई महापालिकेत एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे़ एकीकडे मोदी सरकारमुळे भाजपाचे सर्वत्र वर्चस्व असल्याने आता भाजपाला आपल्या मित्रपक्षाचीदेखील अडचण होऊ लागली आहे़ त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमध्येदेखील शिवसेनेची गोची कशी करता येईल? याची जणूकाही शर्यतच भाजपाने सुरू केली आहे़ अलीकडे गाजत असलेल्या मुंबईतील खेळाची मैदाने व उद्यानांच्या वादामुळे शिवसेनेला आपलाच मित्रपक्ष डोईजड झाला आहे़ काळजीवाहू तत्त्वावर खाजगी संस्थांना दिलेली खेळाची व मनोरंजन मैदाने तसेच उद्यानांसाठी महापालिकेने नवीन धोरण आणले़ गेली काही वर्षे पालिकेच्या पटलावर रखडलेल्या या धोरणाला गेल्या आठवड्यात शिवसेना-भाजपा युतीने बहुमताच्या जोरावर महासभेत मंजुरी दिली़ या धोरणाला सुरुवातीला विरोध करणाऱ्या भाजपाने ऐनवेळी साथ दिल्यामुळे शिवसेनेला हायसे वाटले होते; मात्र त्यांचा हा आनंद फार काळ भाजपाने टिकू दिला नाही़ भाजपाचे गटनेते पालिका महासभेत शिवसेनेच्या सुरात सूर मिसळत असताना दुसऱ्या नेत्याने मंत्रालय गाठून या धोरणावर स्थगिती आणली़ मित्रपक्षाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शिवसेनेवर हात चोळत बसण्याची वेळ आली आहे़ स्वपक्षीय नेत्यांच्या ताब्यात असलेली मैदाने व उद्यानांवर त्यांचा हक्क अबाधित राहण्यासाठी शिवसेनेने या धोरणात आवश्यक ती खबरदारी घेतली होती़ मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणालाच स्थगिती देऊन काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड परत घेण्याचे आदेश काढले़ त्यांच्या या आदेशानंतर शिवसेनेच्या गोटात असंतोषाचे वातावरण आहे़ तरीही भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडांमुळे शिवसेनेला आशेचा किरण दिसत होता़ मात्र शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील मैदाने व उद्याने पालिका आयुक्तांकडे परत करण्याची घोषणा करून शिवसेनेच्या स्वप्नाला तडा दिला़ मुंबई महापालिकेवर आपला झेंडा कसा फडकविता येईल? याचे स्वप्न भाजपाला पडू लागले आहे़ यातूनच उभय पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगू लागले़ सत्ता काबीज करण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे हेच का ते नेते, जे आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, असा सवाल न पडला तर त्यात नवल काय़
मैदान-ए-जंग
By admin | Published: January 20, 2016 2:53 AM