- पन्नालाल सुराना
‘‘परधर्मद्वेश शिकवणा-या अतिरेकी शक्ती आणि जागतिकीकरणाच्या गोंडस नावाखाली बेबंद भांडवलशाहीचे तुफान या दोघांविरुद्ध आपल्याला एकाच वेळी लढायचे आहे. देशाचे ऐक्य व व्यक्तीचे महात्म्य जोपासायचे आहे. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला उपजिवीकेचे योग्य साधन उपलब्ध देणा-या विकास धोरणाचा अंगीकार करावयाचा आहे. स्वतःला समतावादी म्हणवणा-या प्रत्येक स्त्री-पुरुषाने समाजवादी आंदोलन शक्तीशाली बनवण्यासाठी अहोरात्र झटले पाहिजे,’’असे प्रत्येक छोटया मोठया मेळाव्याचे उद्घाटन करताना भाई म्हणत असत. त्यांचा लोकसंग्रह विलक्षण होता. महाराष्ट्राच्या अनेक तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांशी त्यांचा जिवलग संपर्क असायचा. पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार- अशा अनेक राज्यातील साथींशी त्यांची सतत देवाणघेवाण चालत असे. आमची साथ सत्तर वर्षांची आहे. त्यावेळच्या इंग्रजी पाचवीत शिकायला मी पुण्याला नानीजीकडे राहिलो. गाडगे महाराज धर्मशाळेत जवळच्या सेवादल शाखेवर जायचो. भाई वैद्य त्यावेळी पुण्याचे शहर शिक्षक होते. भाईंची औपचारिक ओळख झाली. साता-याच्या मेळाव्याला जाता येताना आमची गट्टी जमली ती अखेरपर्यंत राहिली. 1954 साली बी.ए. पास होवून मी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात एम.ए ला प्रवेश घेतला. भाईने त्यावेळी बी.टी. केले. भूदान आंदोलनाचे मला विशेष आकर्षण होते. जे.पी.नी जीवनदान दिले होते. बिहार ही जमीन फेर वाटपाची प्रयोगशाळा करण्याचे ठरवले होते. त्याभागात सेवादलासारखी संघटना उभी करावी असेही त्यांच्या मनात होते. एसेमना त्यांनी दोन कार्यकर्ते पाठवायला सांगितले. अण्णांनी मला चिठ्ठी देवून गयेला पाठवले. मी तिकडे गुंतलो. इकडे गोव्याचा सत्याग्रह सुरु झाला होता. भाईच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सत्याग्रहींना पोर्तुगीज पोलिसांनी जनावरांसारखे झोडपले होते. भाईचा हात तेंव्हापासून अधु झाला. गोवा पाठोपाठ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाईने महत्वाची कामगिरी बजावली. 1959 ला मी पुण्यात समाज प्रबोधन संस्थेचे काम करत असताना भाई सांगेल ते सेवादलाचे व पक्षाचे ही काम करत होतो. 1957 च्या झंझावातात शुक्रवार पेठ मतदार संघातून काॅंग्रेसचे मातबर नेते बाबुराव सणस यांना टक्कर दयायला समितीने एसेमना उभे केले चळवळीचा रेटा त्यांच्या पाठीशी होताच. पण निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र पातळीपर्यंतचे संघटन फार चांगले उभे करावे लागते. भाईने आपले सर्व संघटनाकौशल्य पणाला लावून यश खेचून आणले. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. यशवंतरावाने बेरजेचे राजकारण केले विरोधी पक्षातले अनेक तरुण कार्यकर्ते काॅंग्रेसमध्ये घेतले. पुण्यातील रामभाऊ तेलंग यांना काॅंग्रेसच्या तिकीटावर एसेमच्या विरोधात उभे केले. निवडणूक मोहिमेचे सूत्रधार भाईच होते त्यांनी मला नाना-भवानी या भागात काम करायला सांगितले अनेक तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण यशाने झुकांडी दिली. भाई पुणे महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालत होते. नगरसेवक म्हणून आपल्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे ते लक्ष दयायचेच पण एकुण स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय महत्व आहे याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. 1965 साली प्रसोपा व सोपा यांचे एैक्य होवून संसोपा या नावाने आम्ही काम करु लागलो. पुण्यात नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान यांनी प्रसोपा पुनरुज्जिवीत केला. भाईची त्यांच्याशी खुप जवळीक होती पण वैचारिकदृष्ट्या नरनारी समता, मागस जातींना विशेष संधी, राजकीय व आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण या मुदद्यांवर डाॅ.लोहियांनी ज्या मूलगामी धोरणांचा पुरस्कार केला होता त्यांना उचलून धरण्यानेच देषातील दलित,वंचित व कष्टकरी जनतेला न्याय मिळणार आहे अषी भूमिका एसेमनी घेतली म्हणून भाई, दशरथ पाटील, बापु काळदाते, डाॅ.बाबा आढाव, मी आदींनी संसोपात राहणेच पसंत केले. मुंबईत मृणाल गोरे, सोहनसिंग कोहली, जाॅर्ज फर्नांडीस आदींनी मुंबई महापालिकेत चांगली कामगिरी बजावली होती. मुंबई महापालिकेचा कायदा आधीच झालेला होता. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर पुणे, नागपुर, औरंगाबाद, अमरावती अशा विविध महापालिकांसाठी एकच कायदा केला जात होता. पुण्यात रामदास परांजपे, भाई,बाबा,राम वडके व मुंबईचे मृणालताई आणि बाबूराव सामंत यांच्या अनेक एकत्र बैठकात तपशीलवार चर्चा करुन संसोपाच्या वतीने आम्ही सरकारला सुचनांचे विस्तृत निवेदन सादर केले. त्यातल्या बहुतेक सूचना स्वीकारल्या गेल्या. भाईने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले देशातल्या सर्व महापौरांचे संघटन उभारण्यात त्याने पुढाकार घेतला. सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, झोपडपटटी सुधारणा आदीबाबत. देशातल्या इतर महापालिकांच्या नियमांची व अनुभवांची देवाणघेवाण आणि राज्यसरकारांशी संबंध - या विषयावर चर्चा घडवून आणल्या. भाईने स्वतः अनेक वृत्तपत्रात लेखही लिहिले. त्या सगळयांचा ‘‘एका समाजवादयाचे चिंतनं’’ हा गं्रथ सुगावा प्रकाषनने प्रसिध्द केला. तो ग्रंथ हा मराठीतील या विषयावरील संदर्भ कोष म्हणून मानला जातो. 1967 च्या सार्वत्रिक निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून एसेमना निवडून आणण्यात भाईंचा महत्वाचा वाटा होता. संसोपाचे अध्यक्षपद ही अण्णांकडे आले होते. पक्षांतर्गत ओढाताण असायची. देशाच्या राजकारणातही महत्वाच्या घटना घडत होत्या. अण्णंाना कार्यालयीन साहय देण्यासाठी बा.न.राजहंस, भाई व मी बरीच मेहनत करत होतो. पक्षाच्या राष्ट्रीय संम्मेलनात आम्हाला अन्य राज्यातील सहका-यांबरोबर खूप विचारविनिमय करावा लागे. 1967च्या निवडणुकीत काॅंग्रेस हटाव चा नारा डाॅ.लोहियांनी दिला होता. काॅंग्रेस, कम्युनिस्ट व जनसंघ यांच्यापासून समान अंतरावर राहून आपण आपले परिवर्तनवादी राजकारण चालवावे असे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे मत होते. मात्र उत्तरेकडील राजनारायण आदी नेते हे काॅंग्रेस हटाव हे धोरण पोथीबंदपणे चालवावे व त्यासाठी जनसंघ, संघटना काॅंग्रेस, स्वतंत्र या पक्षांशीही हातमिळवणी करावी असे म्हणत होते. संसोपाने आपले परिवर्तनवादी चारित्र्य जोपासले पाहिजे या हेतूने 1970 साली राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात घ्यायचे असे आम्ही ठरवले. भाईने भगीरथ प्रयत्न करुन तेे अधिवेशन यशस्वीरीतीने पार पाडले. उजव्या पक्षांशी सहकार्य करायचे नाही. असे राजकीय ठरावात नमुद करण्यात आले. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करुन मध्यावधी निवडणूका जाहीर केल्या. दोन तीन दिवसात दिल्लीत राजनारायण वगैरे नेत्यांनी संघटना काॅंग्रेस व जनसंघ यांच्याशी हातमिळवणी करुन बडी आघाडी उभी केली. आम्हाला वज्राघात झाल्यासारखे वाटले. इंदिराजींनी ‘गरीबी हटाव’ चा नारा दिला. आमचा दारुण पराभव झाला. शेतजमिनीचे फेरवाटप हा प्रश्न अडगळीत टाकला जात आहे. म्हणून आपण भूमिमुक्ती आंदोलन करावे असे आम्ही महाराष्ट्र कार्यकारणीत ठरवले. राष्ट्रीय पातळीवरही तो कार्यक्रम ठरला. एसेम जोशींनी बिहारमध्ये पुर्णियात सत्याग्रह केला. महाराष्ट्रात आम्ही ब-याच ठिकाणी सत्याग्रहींच्या तुकडया पाठवल्या. तेवढयात बांगलादेशचे आंदोलन सुरु झाले. 1971 च्या डिसेंबरात पाकिस्तानी आक्रमणाचा जोरदार मुकाबला करुन भारतीय सैन्याने दिमाखदार विजय मिळवला. पाकिस्तान ची फाळणी होवून बांग्लादेश अस्तित्वात आला. त्याचा स्वाभाविक फायदा इंदिराजींना मिळाला. 1972 च्या विधानसभा निवडणुकात बहूतेक विरोधी पक्षांप्रमाणे समाजवादयांची ससेहोलपट झाली. प्रसोपा व संसोपा यांचे एकत्रिकरण करुन सोशलिस्ट पार्टीची निर्मिती करण्यात आली त्यासाठी लोणावळयाला राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. सर्व व्यवस्था भाईंनी अतिशय चांगल्या रीतीने केली. यापुढे सहकार्य करायचे तर ते फक्त डाव्या पक्षांशीच असा ठराव झाला. जाॅर्ज फर्नांडीस अध्यक्ष व प्रा.मधु दंडवते सरचिटणीस असे पदाधिकारी निवडले गेले. महागाई दुष्काळ आदी प्रश्नांवर ठिकठिकाणी मोर्चे काढले गेले. 1972 ते 1974 या तीन वर्षात दुष्काळाचा सामना करण्यासाठी सोशलिस्ट पार्टीने महत्वपुर्ण कामगिरी बजावली. राज्यचिटणीस म्हणून भाई व मी काम करत होतो. मुंबईत मृणालताई व अहिल्याताईंचे लाटणे मोर्चे सत्ताधा-यांना दे माय धरणी ठाय करुन सोडत होते. 1974 च्या मे महिन्यात रेल्वेचा देशव्यापी संप झाला. त्यात आम्हा बहूतेक सगळयांना तुरुंगवास घडला. गुजरात मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु झाले. बिहारमध्ये नवनिर्माण आंदोलनाला जेपींनी नेतृत्व दिल्याने सत्ताधा-यांना हादरे बसू लागले. त्यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रदद् ठरवली. जेपींच्या नेतृत्वाखालील लोकसंघर्ष समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशभर वातावरण तापले. 25 जून 1975 रोजी मध्यरात्री इंदिराजींनी अंतर्गत आणीबाणीची घोषणा करुन वृत्तपत्रांवर सेन्साॅरशिप लादली. विरोधी पक्ष नेत्यांची धरपकड केली. त्यावेळी भाई पुण्याचे महापौर होते. त्यांनी आणीबाणीचा निषेध करण्यासाठी शनिवार वाडयावर सभा घेतली सभेनंतर त्यांना अटक करण्यात आली. मी त्यावेळी बिहारमध्ये होतो. मृणालताई व मी भूमिगत राहून काम करावे असे ठरले. त्या सगळया संघर्षात आमच्या प्रत्यक्ष भेटी होणे शक्य नव्हते तरी देवाणघेवाण सतत चालू होती. संघटना काॅंग्रेस, जनसंघ, लोकदल व सोशलिस्ट पार्टी यांची मिळून जनता पार्टी करावी. असा प्रस्ताव आला. बाबा आढाव व मी त्याच्या विरोधात होतो पण भाई, बापु, मृणाल वगैरे सगळे अनुकूल होते. 1977 च्या मार्च मध्ये लोकसभेच्या निवडणूकीत जनता पार्टीला बहुमत मिळून सरकार बनले. पुढे पुढाÚयांच्यात भांडणे झाली. गंगा यमुने प्रमाणेे मुळामुठेतूनही बरेच पाणी वाहून गेले. षेवटी 1995 साली समाजवादयांनी आपला वेगळा पक्ष चालवावा. या निर्णयाला आम्ही काहींजण आलो. भाईंनी पुढाकार घेवून समाजवादी जनपरिषदेची स्थापना केली. त्यानंतर 28-29 मे 2011 ला हैदराबादला सोशलिस्ट पार्टी इंडीयाची आम्ही स्थापना केली. भाईंनी सलग पाच वर्षे अध्यक्ष पद सांभाळले. देशातल्या 17 राज्यात या पक्षाच्या शाखा संघटित झाल्या. काम चालू आहे. सेवादलाच्या कामात आम्ही रस घेत होतोच. 1986 साली एसेमच्या सुचनेवरुन सेवादलाचे अध्यक्ष पद मी घेतले. 1991 ला भव्य प्रमाणात सुवर्ण महोत्सव साजरा केला. संघटनेला 54 लाखाचा (3 कोटी आज पर्यंत) स्थायी निधी उभा करुन देण्यात भाईने महत्वाची कामगिरी बजावली. पुढे भाईने काही काळ अध्यक्ष पद स्वीकारुन हीरक महोत्सव साजरा केला. 1991 साली भारत सरकारने जागतिकीकरणाचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. आमचे अनेक ज्येष्ठ सहकारी त्याला पाठिंबा देवू लागले. साधना साप्ताहिकात प्रा. सदानंद वर्दे वगैरेंनी तसे लेख लिहिले. भाई व मी मिळून साधना विश्वस्तांच्या बैठकीत असे मांडले की, साने गुरुजींचे ‘‘भारतात लोकशाही समाजवाद फुलो’’ हे शेवटचे कथन आपण विटाळू नये. मधु दंडवते व किशोर पवार यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. ‘‘ग्यानबाचे अर्थकारण’’ हे पुस्तक मी लिहिले व भाई ने एखादया मिशन-या प्रमाणे त्याची विक्री केली. पुर्ण रोजगार हे प्रमुख उद्दिष्ट मानूनच सर्व आर्थिक धोरणे आखली पाहिजेत असे अभियान आम्ही चालवत राहिलो. ते काम चालू ठेवणे हीच खरी भाईंना श्रध्दांजली ठरेल.
-------------------
जुलै 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार स्थापन झाले. गृहराज्यमंत्री म्हणून भाई काम पाहू लागले. आधीच्या सरकारने प्रलंबित ठेवलेल्या सुमारे 3000 फाईली उपसण्याचे काम रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्ही करत असू. मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच नाव दयावे असा ठराव विधीमंडळात जुलै 1978 मध्ये झाला. मात्र मराठवाडयाच्या अनेक जिल्हयात दलितांच्या वस्त्यांवर हल्ले झाले. नोव्हेंबर 1979 मध्ये डाॅ.बाबा आढाव आदींनी लाॅंग मार्च काढला त्यांना मध्येच अटक झाली. औरंगाबादेत क्रांती चैकात सत्याग्रह चालला होता. दिनकर साक्रीकर व मी 11 वाजता तेथे पोहोचलो. एका बाजूला सत्याग्रहींचे जथ्ते उभे होते. त्यांना पाणी मिळाले नव्हते, बसेस येत नव्हत्या अस्वस्थता वाढत चालली. दुस-या बाजूने हे पोलिस अधिकारी हातात पिस्तूल घेवून जमावाला दरडावू लागला. मी पुढे घुसलो ‘‘हात खाली करा’’ जोरात ओरडलो. दोन तीन क्षण गेले त्या अधिका-यालाही शहाणपण सुचले. पुढे काही दिवसांनी आमची भेट झाल्यावर भाई म्हणाले- पोलिसांचा क्षणाक्षणाला वायरलेस येत होता पन्नालाल जोरात पुढे घुसलेे. तू तिथे अन् मी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर. काय विलक्षण सिच्युएशन होती...
स्मगलरला पकडून दिल्याची हकीकत भाई सांगत होते‘‘माझी अटक टळावी अषी विनंती करण्यासाठी मला तुमची भेट घ्यायची आहे’’ असा निरोप एका जबाबदार पोलिस अधिका-याने मला सांगितला. काय खरे, काय खोटे... प्रशासनाबाबत आपण नवखे लाच घेवून स्मगलरला मदत करण्याचे काम आपल्या हातून होणे शक्यच नव्हते पण त्यालाच जाळयात पकडले तर असे मनात आले. पण सगळे नीट होईल ना नाहीतर सगळयांचीच नाचक्की व्हायची शेवटी मी ठरवले की, एसेम ना विचारायचे त्यांनी सांगितले हिम्मत कर आणि त्याला जाळयात पकड. अन्य कुणालाही कसलीही कल्पना दिली नाही. एका अधिका-याला विष्वासात घेवून सापळा रचायला सांगितले. शेवटपर्यंत धाकधुक होतीच पण काम फत्ते झाले. अण्णांच्या आदेशाची तामिली करता आली या भावनेने ऊर दाटून आला.