कर्नाटकातील कोलार येथे असणारी सोन्याची खाण जगप्रसिद्ध होतीच, पण आता ती आणखी एका वेगळ््या कारणाने चर्चेत येणार आहे, ती विल्सन बेजवाडामुळे. अत्यंत प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. विल्सन यांचा जन्म १९६६ साली कोलार येथे एका अल्पसंख्य दलित जातीमध्ये झाला. त्या काळात अत्यंत गजबजलेल्या त्या शहराची वेगाने भरभराट सुरु होती. सोन्याच्या खाणीवर मोठ्या होणाऱ्या शहरात प्रगतीची सर्व चिन्हे दिसत होती, परंतु मानवी मैला वाहण्याचे काम अजूनही दलितांनाच करावे लागत होते. लहानपणापासूनच विल्सन यांनी हे आपल्या डोळ््यांनी पाहिले होते. या पद्धतीला त्यांनी विरोध सुरु केला. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना आपल्या घरातूनच विरोध सहन करावा लागला. स्थानिक प्रशासनाने आपले म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे दिसताच विल्सन यांनी थेट पंतप्रधान राजीव गांधी यांनाच पत्र लिहून आपल्या वेदना आणि संताप व्यक्त केला होता. कोरडे संडास बंद करून त्याजागी पाण्याने साफ करता येतील असे संडास बांधणे सुरु व्हावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. मानवी मैला उचलण्याचे किळसवाणे व घृणास्पद काम बंद करण्यासाठी विल्सन यांनी मोहीमच उघडली, त्याचाच परिणाम म्हणून मानवी मैला माणसांनी वाहून नेण्यास बंदी घालण्याचा १९९३ साली कायदा संसदेने मंजूर केला. कायदा करूनही फारसा बदल न झाल्याने विल्सन यांनी १९९४ साली सफाई कर्मचारी आंदोलनाची सुरुवात करून आपल्या कामास गती दिली. त्याच वर्षी ही वाईट प्रथा सुरु असल्याचे पुरावे छायाचित्रांच्या रुपात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. लोकसभा आणि कर्नाटक विधानसभेत याबाबत प्रश्न विचारले गेले, त्यामुळे विल्सन यांनी आपली मोहीम अधिक बळकट करण्याचा विचार सुरु केला. आज मैला डोक्यावरून वाहून नेण्याची पद्धत कमी झाली असली तरी लोकांच्या मानसिकतेत फारसा बदल झाला नसल्याचे मत विल्सन मांडतात. सध्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेल्या स्वच्छ भारतच्या घोषणा आणि मोहिमा यांच्या पलीकडे जात मानवी मैला वाहून नेण्याची ५००० वर्षे जुनी कुप्रथा कशी बंद होईल यावर सखोल विचार करण्याची गरज विल्सन बोलून दाखवतात. याचा स्पष्टच अर्थ असा की आजही देशात ही कुप्रथा अस्तित्वात आहे आणि केवळ सरकारच नव्हे तर संपूर्ण समाजासमोरीलही ते एक फार मोठे आव्हान आहे.
माणुसकीसाठी लढा
By admin | Published: July 30, 2016 5:41 AM