मराठी चित्रपटाचा इतिहास आणि त्याची साक्षीदार माणसं एक-एक करीत काळाच्या पडद्याआड जात आहेत. त्यातील प्रमुख नाव आशा पाटील यांचे आहे. त्या मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावरच्या आई होत्या. याचे कारण की, एक मराठमोळी, सोज्वळ, प्रेमळ आणि कणखर आईची व्यक्तिरेखा उभी करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्या चित्रपटसृष्टीच्या आई म्हणूनच अखेरपर्यंत ओळखल्या जात होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत जशी निरूपमा रॉय यांची प्रतिमा तशीच जणू मराठीमध्ये आशा पाटील यांची होती. विशेषत: दादा कोंडके यांच्या पडद्यावरील भोळ्याभाबड्या मुलाची प्रेमळ आई ही प्रतिमा मराठी चित्ररसिकांच्या मनावर कायमची कोरली गेली होती. त्यांच्या निधनाने एक सशक्त तसेच ज्यांचे असणे आणि हसणे खानदानी परंपरेला शोभणारे असे होतं. त्याला आपण मुकलो आहोत. सुमारे १५० चित्रपट आणि काही नाटकांमध्ये त्यांनी काम केले. मराठी चित्रपटसृष्टीचा ज्यांनी पाया घातला. त्यामध्ये अग्रेसर नाव असलेले भालजी पेंढारकर यांच्यापासून ते मराठी चित्रपटांचा विस्तार विविध अंगांनी केला ते अनंत माने यांच्यासोबत त्यांनी असंख्य चित्रपटांत काम केले. आशाताई यांचे एक कलाकार म्हणून मोठेपण होतेच; पण चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहून सेवावृत्तीने त्यांनी काम करण्यातच धन्यता मानली. त्यामुळे कदाचित त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आलेही नसतील. पण, त्यांच्यातील ममत्त्व आणि माणूसपणाचे दर्शन नेहमीच घडत आलेले आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये थोडशी फरफट झाली तरी, कोल्हापूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव करताना त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने तेथेही चैतन्यदायी वातावरण निर्माण केले. म्हणूनच ‘साधी माणसं’ या मराठीच्या मानदंड ठरलेल्या चित्रपटापासून सामना, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, माहेरची साडी, बोट लावीन तिथं गुदगुदल्या, कामापुरता मामा, बन्याबापू अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटातील आशाताई यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. मराठी चित्रपट महामंडळाच्या वर्चस्वासाठी चाललेली भांडणे पाहता त्या पार्श्वभूमीवर आशाताई यांच्यासारख्या थोर कलावंताचं दुर्लक्षित जीवन पाहिलं तर, मनाला वेदना होतात. आपण ‘तो मी नव्हेच’ किंवा ‘एकच प्याला’ या नाटकांची नावे जरी उच्चारली तरी, मन रोमहर्षक होते. या नाटकांची नोंद घेतल्याशिवाय मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास पूर्ण होत नाही. अशा नाटकांमध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेतील लखोबा लोखंडेची पत्नी म्हणून अजरामर भूमिका करणाऱ्या आशाताई यांचा उचित गौरवदेखील होऊ नये याची खंत वाटते. मराठी सारस्वतांच्या जगताने याची नोंद घेऊन आशाताई यांच्यासारख्या कलावंतांची उपेक्षा होऊ नये याची काळजी घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
चित्रपटसृष्टीची आई
By admin | Published: January 20, 2016 2:53 AM