मिलिंद कुलकर्णीनिवासी संपादक, लोकमत, जळगावएकनाथराव खडसे यांचा बहुप्रतीक्षित प्रवेश सोहळा अखेर निश्चित झाला. २ सप्टेंबरच्या वाढदिवसापासून सुरू झालेले हे नाट्य अखेर पावणेदोन महिन्यानंतर संपुष्टात आले. असेच नाट्य एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत रंगले होते. रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला. हा पराभव आणि भाजप -सेना युती सरकारच्या काळात साडेतीन वर्षे मंत्रिपदाविना राहणे खडसे यांच्या जिव्हारी लागले. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.
वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी राष्टÑवादीचे तिकीट घ्यावे म्हणून स्वत: अजित पवार हे इच्छुक होते. अखेरपर्यंत त्यांनी वाट पाहिली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला अपक्ष उमेदवारी करायला लावून राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. आतादेखील काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खडसे यांना बोलावत होते, तरी खडसे यांचा निर्णय होत नव्हता. समर्थकांचा दबाव वाढत असला तरी हा निर्णय सोपा नव्हता.
भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची घोषणा करताना खडसे यांनी अनेक पत्ते अद्याप खुले केलेले नाही. मुरब्बी, चाणाक्ष राजकीय नेता असल्याने त्यांनी जेवढे सांगायचे तेवढेच उघड केले आणि बाकी गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या.
भाजप, केंद्रीय व प्रदेशनेतृत्व यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही, असे वारंवार स्पष्ट करीत असताना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष असल्याचे दिसून आले. पावणेदोन महिन्यांपासून उघडपणे ते फडणवीस यांचे नाव घेत आहेत. यामागे पूर्वनियोजित सूत्र दिसते.
भाजपश्रेष्ठींनी फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी दिलेली मुख्यमंत्रिपदाची संधी, दुसऱ्यांदा सत्तास्थापनेत अपयश येऊनही दिलेली विरोधी पक्षनेतेपदाची संधी आणि आता बिहार निवडणुकीची दिलेली जबाबदारी याचा अर्थ श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. खडसे यांचे खरे दुखणे येथे आहे आणि त्यातून ते पक्षापासून दुरावले गेले.
विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्यपालपद अशी अनेक आश्वासने देऊनही भाजपने डावलले असे जाहीरपणे सांगणाऱ्या खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने कोणते आश्वासन दिले आहे, याची लोकांना उत्सुकता असेल.
विधान परिषद सदस्यत्व, मंत्रिपद, संघटनेतील मोठे पद असे पर्याय सांगितले जात असले तरी अद्याप त्याविषयी स्पष्टता नाही. कन्या रोहिणी खडसे या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या, त्यांना काहीतरी द्यावे लागणार आहेच. सून खासदार रक्षा खडसे या खडसेंबरोबर जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. कोणीही खासदार, आमदार त्यांच्यासोबत येणार नाही, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने इतर चर्चांवर पडदा पडला आहे.
खडसे यांच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काय परिणाम होईल, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून भाजपची सूत्रे खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांच्याकडे एकवटली आहेत.
महाजन यांच्या नेतृत्वाखाली दोन खासदार, ४ आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव महापालिकेसह ६ पालिकांमध्ये सत्ता आली. ‘संकटमोचक’ उपाधी लाभलेले महाजन यांची आता खरी कसोटी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात उभारी येईल, हे मात्र निश्चित. अरुणभाई गुजराथी, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासारखे मोठे नेते असूनही पक्षसंघटना कमकुवत आहे. दहा वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत एकमेव आमदार निवडून येत आहे. सहकारी संस्थांमध्ये पक्ष अधिक मजबूत होईल.