हरीष गुप्ता
‘‘शाळेत असताना माझा आवडता विषय नाटक होता’’, अशी कबुली पंतप्रधान मोदी यांनी एका पत्रकाराबरोबर बोलताना दिली होती. ते अधूनमधून जी काही आश्चर्ये फेकतात आणि लोकांना चकीत करून टाकतात, त्यामागचे रहस्य हेच असावे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी नेहमीपेक्षा लांब केस वाढवले आणि दाढीही वाढवली. कोविड पथ्याचा भाग म्हणून त्यांनी तसे केले असणार. पण ‘‘आपली ‘फकीर’ अशी प्रतिमा मोदींना लोकांच्या मनात ठसवायची आहे’’ असे त्यावेळी देशात सातत्याने म्हटले गेले. ‘खरे रामभक्त’ म्हणून राम मंदिराचा मार्ग मोकळा करून देणारे संत देशाचा कारभार पाहताहेत, अशी प्रतिमा त्यांना लोकांपुढे न्यायची आहे, असे काहींचे म्हणणे. देशातली कोविडची साथ ओसरेपर्यंत दाढी न करण्याची शपथ त्यांनी घेतली असावी, असाही एक तर्क देशात लावला गेला. पंतप्रधानांना खूप मोठा प्रतिमा बदल करावयाचा आहे, असे काहींचे म्हणणे होते. काहींनी त्याहीपुढे जाऊन मोदींना आता महात्मा गांधी किंवा रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी देवासमान अशी प्रतिमा देशाच्या जनमानसावर ठसवायची आहे, असा निष्कर्ष काढला होता.
दाढी वाढवलेले मोदी शिवाजी महाराजांसारखे दिसतात, असाही शोध या काळात काही लोकांना लागला. पण आता या समस्त लोकांना तोंडघशी पाडत आणि साऱ्या तर्ककुतर्कांना पूर्णविराम देत पंतप्रधानांनी दाढी कमी करायला सुरुवात केली आहे. केसही कापले आहेत. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देऊन झाल्यावर या क्रियेला गती आली. गेल्या शनिवारी कोविडसाठीचा आढावा घेणारी एक बैठक दिल्लीत झाली, त्या बैठकीतला मोदी यांचा फोटो आणि व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केला आहे. तो बारकाईने पहिला तर त्यांनी डोक्यावरचे आणि दाढीचे केस कमी केलेले लक्षात येते. कोविडची भीती कमी होत आहे आणि निर्बंध शिथिल होत आहेत, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांचा केशकर्तन कलाकार पुन्हा प्रविष्ट झालेला दिसतो. असे सांगतात की, कोविड काळात मोदी यांनी त्यांचा स्वयंपाकी, मालीशवाला आणि पी. एम. ओ.मधील एक अधिकारी (प्रधान सचिव नव्हेत) यांनाच केवळ आपल्या निकट सानिध्यात ठेवले होते.
चौकडी नसलेले पंतप्रधान
निकटवर्तीयांच्या चौकडीने न घेरलेले नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारतातले कदाचित पहिले पंतप्रधान असतील. जे त्यांच्या आसपास आहेत त्यांच्यापैकी कोणीही ‘आपण हे काम पंतप्रधानांकडून खात्रीने करून घेऊ शकतो’, असा दावा करणार नाही. कोणी मंत्री, नोकरशहा, मित्र किंवा उद्योगपती हे म्हणण्याचे धाडस करणार नाही. मोदींशी थेट संबंध असणारेही कोणीही असे स्वातंत्र्य घेऊ शकत नाही. आधी तर ते कोणाला जवळही येऊ देत नसत. ‘मी पंतप्रधानांशी बोललो आहे, काम होईल’ हे वाक्य मोदींच्या कार्यकालात दिल्लीत कधीही कानावर आले नाही. दिवसातून १८-१८ तास काम करण्याची क्षमता बाळगणारे, प्रामाणिक पंतप्रधान असे मोदींबद्दल म्हणता येईल. अर्थात, कसलाही लिप्ताळा नसलेले मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे नव्हे. पूर्वी लालबहादूर शास्त्री किंवा मोरारजी देसाई यांचे वर्तनही असेच होते. मात्र ते फार काळ पदावर राहिले नाहीत.
दिल्लीतल्या सत्तेवर येऊन इतक्या वर्षानंतरही ‘‘मोदी नेमके काय आहेत?’’ याचे आकलन करणे कठीण आहे. एकतर त्यांना कुटुंब नाही, माध्यमांशी ते अजिबात बोलत नाहीत, सात वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. सरकार, पक्ष आणि रा. स्व. संघ या मातृसंस्थेतही मोदी यांचाच दबदबा आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यानंतर मोदी कोणाशीही सल्ला मसलत करताना दिसलेले नाहीत. सध्याचे केंद्रातले सरकार मोदी आणि अमित शहा ही दोनच माणसे चालवतात, असे लोक म्हणतात. पण हाही गैरसमजच होय. मोदी हेच मोदींचे धनी आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना त्यांच्या खात्यातल्या नेमणुका माहीत नसायच्या. नेमणुकांविषयीच्या मंत्रिमंडळ समितीचे ते एकमेव सदस्य असूनही गृह मंत्रालयाला अनेक नेमणुकांची माहितीच नसायची. पंतप्रधानांच्या विशेष अखत्यारितील खातेच सर्व काही करत असे.
मोदी लवचिकही आहेत
पण एक मात्र मान्य केले पाहिजे, निर्णय चुकला तर मोदी तो मागेही घेतात, हटवादीपणा न करता तत्परतेने दुरुस्ती करतात. जम्मू-काश्मिरात त्यांनी ३ वर्षांत ४ राज्यपाल बदलले. एन. एन. व्होरा या अनुभवी नोकरशहाच्या जागी त्यांनी २०१८मध्ये सत्यपाल मलिक यांना नेमले. मलिक पक्षात तसे बाहेरचे होते आणि संघ वर्तुळातले नव्हते. त्यामुळे या नेमणुकीचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण २०१९ साली मलिक यांना गोव्यात धाडून मोदी यांनी त्यांचे विश्वासू जी. सी. मुरमू यांना काश्मिरात पाठवले. ते काम करत नाहीत, हे लक्षात येताच त्यांना दोन वर्षांत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मग अनुभवी राजकारणी मनोज सिन्हा यांना राज्यपाल केले गेले. यातून मोदी यांनी आपण बदलू शकतो दाखवून दिले आहे. शीर्षस्थानी अशी लवचिकता क्वचितच दिसते.
स्मितहास्यात गुंफलेला संदेश
एखादा संदेश देण्याची मोदी यांची शैली अनोखी आहे. उत्तर प्रदेशातील खासदारांची आढावा बैठक त्यांनी घेतली. प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग प्रत्येकाचा आढावा घेत होते. मोदी यांनी त्यांना विचारले, ‘आप वाराणसी के एमपी का भी कुछ हिसाब-किताब रखते हो? उसको भी कुछ बताओ!’ स्वतंत्रदेव भांबावले पण इतरांना संदेश स्पष्ट गेला. प्रदेशाध्यक्षांचे ऐकावे लागेल!