- विनायक पात्रुडकर
कर्मचाऱ्यांच्या मागण्या संपत नाही. मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संपाचे हत्यार असतेच. आर्थिक अडवणीत असलेल्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होत नसते. अशा विवंचनेत बेस्ट गेल्या काही वर्षांपासून सापडत आहे. बेस्टची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. दुसरीकडे येथील कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतन वेळेवर मिळत नाही. बोनससाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. न्यायालयाच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. परिणामी दर तीन किंवा सहा महिन्यांनी बेस्टचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसतात.
संप करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार केला जात नाही. ही स्वार्थी वृत्ती प्रत्येकाचीच असते. पण बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. काही वर्षांपूर्वी मुंबईकरांसाठी बेस्ट हा वाहतुकीचा उत्तम पर्याय होता. त्यावेळी बस वेळेवरही येत होती. आता तिला वाहतूक कोंडीचे कारण आहेच म्हणा. तेव्हा शेअर टॅक्सी नव्हती. त्यामुळे छोट्या अंतरावर जाण्यासाठी मुंबईकरांना बसशिवाय पर्याय नव्हता. अशा प्रकारे तेजीत असलेल्या बसला उतरती कळा लागली. मुंबईकरांना शेअर टॅक्सीचा पर्याय आला. हळूहळू खासगी कंपन्यांच्या अॅप बेस्ड टॅक्सी आल्या. बेस्टचे प्रवासी कमी होवू लागले. तिजोरी रिकामी होऊ लागली. याची झळ लागल्यानंतर बेस्टने उपाय सुरू केले. छोट्या अंतरासाठी बस सेवा सुरू केली. फेऱ्या वाढवल्या. तरीदेखील बेस्टच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्याही या काळात वाढत गेल्या.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, वेतन वाढ करावी, या प्रमुख मागण्या आजवर प्रलंबितच आहेत. याच प्रमुख मागण्या पुढे करून कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. हा संप होऊ नये यासाठी बैठक झाली, पण ती निष्फळ ठरली. त्यामुळे संप अटळ आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा संप सर्वसार्मान्यांना फटका देणाराचा असतो. त्यामुळे त्याचे समर्थन सर्वसामान्यांकडून होणार नाही. मात्र कामगारांचे प्रश्न सोडवायलाच हवेत. कामगार चळचळ इतिहासजमा झाली आहे. नवीन कार्यप्रणालीत कामगारांना संप करण्याची मुभा ठेवलेली नाही. परिणामी बेस्ट कामगारांना न्याय मिळायलाच हवा, पण त्यात सर्वसामान्य भुरडला जाऊ नये, एवढीच अपेक्षा.