धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. विदर्भातील शासकीय बालगृहांमधील पायाभूत व शैक्षणिक सुविधांसाठी हा सव्वा कोटीचा निधी कामी येणार आहे. बालगृहांची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या सांगण्यानुसार या पैशाचा योग्य उपयोग झाल्यास या देशाचे भविष्य असलेल्या बालकांचे जीवन काही प्रमाणात तरी उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या निधीचे व्यवस्थापन आणि वितरणासाठी एक तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. अतिक्रमण कारवाईला ज्या दीड हजार धार्मिक स्थळांनी आक्षेप घेतला त्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकङे धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे सध्या उपराजधानीत रान पेटले आहे. विशेष म्हणजे एरवी एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकीय पक्षही या मुद्यावर एकत्र आले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेताना हेच राजकीय पक्ष असे ऐक्य का दाखवीत नाहीत? असा प्रश्न पडतो. या पक्षांनी अतिक्रमित धार्मिक स्थळांच्या बचावासाठी मोर्चा उघडला असून, ठरावाचे अस्त्र उपसले आहे. परिसरातील नागरिकांना मन:शांतीकरिता धार्मिक स्थळ जवळ असणे ही सर्वधर्मीयांची गरज असल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वामी विवेकानंदांनी फार चांगले सांगितलेय. ते म्हणतात, ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो तो आस्तिक आणि विश्वास नसतो तो नास्तिक. ही स्वत:वर विश्वास नसलेली माणसं कर्मकांडाच्या आहारी जातात अन् मग माणूसधर्म सोडून मूर्तिपूजा हाच त्यांचा धर्म बनतो. अतिक्रमण हटविण्याविरोधात संघर्ष करणाऱ्यांनी आपली ही ऊर्जा समाजातील रंजल्यागांजल्यांच्या उत्थानासाठी खर्ची घातली तर यापेक्षा किती तरी जास्त मनशांती आणि कमालीचे समाधान त्यांना लाभेल, देवत्वाची प्रचिती येईल. याचा अर्थ श्रद्धेला विरोध असा अजिबात नाही. पण ती जपताना असा आक्रस्ताळेपणा बरा नव्हे. मनापासून इच्छा असली तर माणसातच देव शोधता येईल, असे थोरमहात्मे सांगून गेलेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयातून आम्ही सर्वांनीच बोध घेतला पाहिजे. आजही आपल्या समाजातील एक मोठा वर्ग अत्यंत दयनीय जीवन जगत आहे. भुकेलेल्यांच्या यादीत हा देश आघाडीवर आहे. राज्यात बालमत्यू वाढताहेत. बालकामगारांची समस्या सुटता सुटत नाहीये. लाखो मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी खूप काही करण्यासारखे आहे. अखेर माणूसधर्माचे पालन हे मानवी जीवनाचे साध्य आहे. बहिणाबार्इंनी म्हटले, ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’. त्यांचे हे आवाहन आजही किती प्रासंगिक आहे, याची प्रचिती या संपूर्ण घटनाक्रमातून येते.
माणसातच देव शोधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:50 AM