- महेश सरनाईक
बहुचर्चित चिपी विमानतळावर १२ सप्टेंबरला अखेर लॅडिंग झाले. ते कसे झाले ?, कोणी केले ?, का झाले ? हे सर्व प्रश्न महत्वाचे नाहीत मात्र, आम्ही लँडिंग केले म्हणजे आम्ही विमानतळ सुरू केले. मग त्यासाठी या अगोदर कोणी कोणी विरोध केलेला? जमिनीचे भूसंपादन होत असताना म्हणा किवा विमानतळाच्या धावपट्टीसाठी कातळ फोडताना म्हणा ते सर्व तूर्तास राहूदे बाजुला. आम्ही गणेशोत्सवापूर्वी चिपीत विमान उतरविणार हा दिलेला शब्द खरा केला. यासाठी खूप आटापिटा केला. आता विमानाचे ट्रायल लँडिंग तर झाले पुढचे काय ते पुढे बघू, सध्या तरी लोकांना आपल्याबाबत सहानुभूती मिळेल असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. कारण चिपी विमानतळासाठी गेली २0 वर्षे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करणारे हात हे कधीच गगनाला भिडणार नाहीत. कारण त्यांना तसे आपले ‘ब्रँडिग’ करण्याची मुळात गरज आहे असे वाटत नाही. कारण सिंधुदुर्गातील समस्त जनतेला माहीत आहे, की चिपी विमानतळ प्रकल्प कोणामुळे साकारतोय.
सिंधुदुर्गात चिपी विमानतळासाठीची जागा निवडण्यापासूनच काही लोकांना त्याला विरोध सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरले होते. विमानतळासाठी लागणारी जमीन हा मुख्य मुद्धा होता. एवढा मोठा प्रकल्प साकारायचा असेल तर आपल्या आणि जिल्ह्याच्या पुढील भवितव्यासाठी कोणाला तरी जमीन द्यावीच लागणार होती. प्रत्यक्षात विमानतळ प्रकल्प साकारल्यानंतर त्यातून आपल्याला किवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती फायदा होईल, याचा तसूभर विचारही त्यांच्या मनात येत नव्हता. काही लोक विरोधासाठी विरोध म्हणूनही पडद्यामागून बऱ्याच हालचाली करायचे. परंतु त्यावेळची परिस्थिती आणि तयार करण्यात आलेली वातावरण निर्मिती पाहता स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये सर्वांच्याच मनात सहानुभूती यायची. आता २0 वर्षानंतरची परिस्थिती फार वेगळी आहे. विमानतळ प्रकल्प सुरू होण्याच्या तोंडावर त्या काळात विरोध करणारेच विमानतळ आमच्यामुळेच झाल्याबाबतचे ‘क्रेडीट’ ही घेण्यास सरसावले आहेत.
विमानतळाच्या पायाभरणीसाठी चिपीच्या कापावर संबंधित कंपनीकडून भुसुरूंग लावले जायचे. या भुसुरूंगामुळे चिपी आणि परिसरात काही लोकांच्या घरांनाही तडे गेले होते. मग त्या तडे गेलेल्या घरांच्या फोटोंसह बातम्या त्या काळात सर्वच वर्तमानपत्रांमध्येही झळकल्या होत्या. त्यामुळे विमानतळाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. ग्रामस्थांना विरोध करण्यासाठी आणि आपणच स्थानिकांचे तारहणार आहोत अशा काहीशा भूमिकेतून तत्कालिन विरोधक सत्ताधारी लोकांच्या नावे टाहो फोडायचे. लोकांची माथी भडकावून हा प्रकल्प रखडविण्यास काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या- त्यांच्या पातळीवर प्रयत्नही केला. अर्थात तो किती यशस्वी झाला. ते आता प्रकल्प प्रत्यक्षात साकार होताना दिसून आले.
गेल्या चार ते पाच वर्षात सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण बदलले आहे. जनमताने ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यावेळी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव झाली आणि आता केवळ विरोधासाठी विरोध करणारे स्वत: सत्ताधारी बनल्याने पुढील काळात जर जनतेसमोर आपल्याला जायचे असेल तर आपण विकासात्मक कोणते काम केले याचा लेखाजोखा त्यांना द्यावा लागणार होता. केवळ वैयक्तिक टिकाटिप्पणीचे किवा दहशतवादाचे राजकारण मर्यादीत कालावधीकरीता असते. हे वास्तववादी सत्य असल्याने त्यांनी विमानतळासारख्या महत्वाच्या प्रकल्पाबाबतची लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला विजयदुर्गपासून रेडीपर्यंत १२१ किलोमीटरची नयनरम्य सागर किनारपट्टी लाभली आहे. या सागर किनारपट्टीवर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, यशवंतगड असे बहुमूल्य किल्ले आहेत आणि हे किल्ले इतिहासाची साक्ष गेली अनेक शतके देत आहेत. त्याचप्रमाणे या किनारपट्टीवर आचरा, तोंडवळी, वायरी, तारकर्ली, देवबाग, भोगवे, निवती, वेंगुर्ले, मोचेमाड, आरवली, वेळागर, शिरोडा, आरोंदा यासारखी अतिशय सुंदर, स्वच्छ बिच आहेत.
तर दुसरीकडे आंबोली सारखे हिलस्टेशन आणि सह्याद्रीचे उंचउंच कडे यामुळे पर्यटनदृष्ट्या या निसर्गर्सौदर्ययाने नटलेल्या जिल्ह्याला पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आदराचे स्थान निर्माण करण्यासाठी समुद्री भाग जोडणाऱ्या तालुक्यांच्या सीमेवर जर विमानतळासारखा मोठा प्रकल्प झाला तर देश-विदेशातूनही पर्यटक येथे आकर्षिले जावू शकतात. या दूरदृष्टीतूनच मालवण आणि वेंगुर्ले हे दोन तालुके जोडणाऱ्या आणि कुडाळ या महामार्गावरील महत्त्वाच्या तालुक्याच्या सिमेवर वेंगुर्ले तालुक्यातील परूळे येथील माळरानावर चिपी गावाच्या हद्दीत विस्तीर्ण जागा निवडण्यात आली. निवडण्यात आलेल्या जागेतील बहुतांशी भाग हा जांभ्या दगडाचा आहे. सिंधुदुर्गमधील प्रचलित भाषेत त्याला ‘काप’ म्हणतात. या माळरानावरील बहुतांशी जमिन ही ओसाड होती.
त्यामुळे या ओसाड माळरानाचा वापर विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात आला. मात्र, काही काळ त्यालाही विरोध झाला होता. चिपी विमानतळ सुरू झाले (अजून तरी ट्रायल लँडिंगच झाले आहे) म्हणजे ते लवकरच सुरू होईल, ही बाब सिंधुदुर्गला भूषणावह निश्चितच आहे. पण विमानतळ सुरू झाले तरी विमानातून प्रवास करून येणारा पर्यटक ज्यावेळी चिपी येथून जिल्ह्याच्या इतर भागात फिरेल त्याला फिरण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे विमानतळ सुरू होतानाच किमान आजूबाजूच्या परिसरातील रस्ते वाहतुकीस योग्य करणे राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य आहे. मग ते कर्तव्य राहिले बाजूला. कारण जिल्हाअंतर्गत सर्व रस्त्याची अशरक्ष: चाळण झाली आहे.
या रस्त्यांवरून गाडी चालविणे मुश्किल झाले आहे. एकीकडे विमानतळ सुरू होतेय म्हणून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता सिंधुदुर्गात एकदा आलेला पर्यटक वाहतूक व्यवस्थेनेच हैराण होवून पुन्हा येण्याचे नाव काढणार नाही, ही वस्तूस्थिती आणि ती टाळून चालणार नाही.
चिपी विमानतळावर विमानाचे लँडिंग होण्यासाठी दिलेला मुहूर्त पाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली तशीच मेहनत चांगले रस्ते बनविण्यासाठी किवा सुस्थितीतील माहिती फलक लावण्यासाठी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून ‘येवा सिंधुदुर्ग आपलाचा आसा’ असे मालवणीतून म्हणण्यापलीकडे पर्यटनात कोणतेच काम होताना दिसत नाही. राज्यकर्त्यांनी विमानतळ प्रकल्प सुरू करण्यासाठी मेहनत घेतली तशी ती विमानतळ प्रकल्पाच्या अनुषंगाने चांगले रस्ते, पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक, तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर फलक ही मुलभूत सुविधा देण्यासाठी मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
दयनीय रस्ते, माहिती फलकांचा अभाव कसे वाढणार पर्यटन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या या मार्गावर पडलेले खड्डे किवा त्याची डागडुजी ठेका घेतलेल्या कंपनीकडून केली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या बांधकाममंत्र्यांनी दोन वेळा या मार्गावर पाहणी केली. ठेकेदारांना दम भरला. त्यावेळी कुठे वाहन धारकांना थोडासा दिलासा मिळाला. महामार्गाचे काम सुरू आहे. या नावाखाली हा मार्ग वगळण्यासाठी वाव आहे. परंतु जिल्ह्याच्या अंतर्गत सर्वच मार्ग खड्डेमय झाले आहेत. वाहन धारकांना या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. काही भागात तर येथील रस्तावरून गाडी चालविणेदेखील कठीण बनल्याने एस.टी. महामंडळाने खबरदारी म्हणून आपली वाहतूकही बंद केली आहे. रस्त्यांची इतकी दयनिय अवस्था असताना याबाबत कोणीही सत्ताधारी राज्यकर्ते चिडीचूप आहेत. लोकांना हाल अपेष्टा काढून कसे तरी मार्गक्रमण करावे लागत आहे. अशाप्रकारच्या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना अनेक वाहनधारकांच्या गाडीचे टायर वारंवार पंक्चर होत आहेत. अशा या धोकादायक रस्त्यांमधून छोटे-मोठे अपघातदेखील होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या तीन ते चार वर्षापासून तशीच आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे म्हणा किवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे रस्ते पावसाळ्यात पूर्णपणे उखडून गेले आहेत. या रस्त्यांवरील खड्डे जांभ्या दगडाने काही प्रमाणात भरले गेले आहेत. मात्र, हेच दगड वाहनधारकांना धोक्याचे ठरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या रस्त्यांची नव्याने कामे झाली आहेत.मात्र, इतर सर्व ठिकाणी केवळ खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. ती मलमपट्टी अतिशय तकलादू असल्याने पुन्हा पावसाळ्यात तो रस्ता उखडून जातो.रस्त्यांची कामे नव्याने करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्ची घातला जातो. मात्र, नवे रस्ते होत नाहीत. बहुतांशी वेळा त्यात डागडुजीच केली जाते. त्यामुळे शासकीय निधीचा वापर होतो मात्र, त्यातून लोकांना अपेक्षित न्याय मिळतच नाही.
एकीकडे रस्त्यांची ही दयनीय अवस्था आहे तर दुसरीकडे अजूनही पर्यटन जिल्हा म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या प्रशासनाकडून माहिती फलकच लावलेले दिसत नाहीत. जिल्ह्यात काही मोजक्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले जुने फलक आहेत. मात्र, त्या फलकांमधून लोकांना अपेक्षित ठिकाणी जाणेदेखील अवघड होत आहे. सध्याचा विचार करता गणेशोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील लाखो चाकरमानी जिल्ह्यातील गावागावात आले आहेत. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या इतर भागातील लोकांना रस्त्यांवर फलकांचा अभाव असल्याने आपले इच्छित स्थळ शोधणेच त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे.