मराठीत परस्परांची पाठ खाजवणे असा एक वाकप्रचार आहे. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात बऱ्याचदा याचा अनुभव येतच असतो. एरवी परस्पराना पाण्यात पाहाणारे लोक जाहीर समारंभात चुकून एकत्र आले की परस्परांवर स्तुतीसुमने उधळण्याची त्यांच्यात जणू चढाओढच लागते. याचाच एक नवा आविष्कार म्हणजे अमिताभ बच्चन यांना देशाच्या राष्ट्रपतीपदावर बसलेले पाहायला आपल्याला आवडेल हे शत्रुघ्न सिन्हा यांनी काढलेले उद्गार. अर्थात हे उद्गार क्रियेच्या नव्हे तर प्रतिक्रियेच्या रुपात बाहेर आलेले. शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाचा राष्ट्रपती व्हावे असे जाहीर उद्गार आधी बच्चन यांनी काढले होते. या दोहोंच्या उद्गारांवरुन एखाद्याचा असा समज व्हावा की आगामी राष्ट्रपतीपद हिन्दी सिनेसृष्टीच्या कोट्यातून भरले जाणार असून त्यासाठी केवळ दोनच नामांकने आली आहेत व हे दोघे एकमेकाला पहले आप, पहले आप करीत आहेत. उभयता नट किंवा अभिनेते असल्याने प्रसिद्धी हा त्यांचा प्राणवायू. तो पुरेशा प्रमाणात खेचत राहण्याच्या कलेत बच्चन पारंगत असले तरी सिन्हा किमान त्यांच्या तुलनेत तरी कमी पडतात. त्यामुळेच ते अधूनमधून काहीही उटपटांग बोलत असतात. भाजपाचे खासदार असूनही ते त्यांच्याच पक्षाच्या विरोधात उचापती करीत असतात. हेतू इतकाच की पक्षाने आपल्या उचापतींकडे लक्ष देऊन आपल्याला शांत करण्यासाठी मंत्री वगैरे तरी करावे की पक्षातून हाकलून तरी लावावे. मध्यंतरी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना सिन्हा यांच्याकडे या संस्थेचा कारभार येणार असे काही पतंग हवेत उडवले गेले. ते बहुधा त्यांनीच उडवले असणार. पण त्यांचा पक्ष इतका लबाड की तो सिन्हा यांच्या कोणत्याही उचापतींकडे लक्षच द्यायला तयार नाही. राष्ट्रपतीपदासाठी बच्चन यांना गळ सिन्हा यांचे गळ घालणे म्हणजे त्यांचेच राजकीय गुरु लालकृष्ण अडवाणी यांचा रक्तदाब वाढविणे आहे. पण बोलाचाच भात म्हटल्यानंतर तसला काही विचार करायचा नसतो. मुळात सिन्हा यांना बच्चन यांचा असा एकाएकी पुळका का यावा? आपल्या पुढ्यात अभिनय करताना फिके पडू लागल्याने बच्चन यांनी आपल्या समवेत काम करणे थांबविले होते असा दावा खुद्द त्यांनीच त्यांच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘नथींग बट खामोश’ या चरित्रात केला आहे. अमिताभविषयीचा असा विखार शत्रुघ्न यांनी कधीही लपवून ठेवलेला नसताना ते एकदा का राष्ट्रपती झाले की ते करीत असलेल्या उतारवयाला साजेशा भूमिका आपल्याला मिळत राहतील, असा तर काही विचार सिन्हा यांच्या मनात नसावा ना?
पहले आप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 3:15 AM