- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे. निर्जीव पदार्थ शेवटपर्यंत उपयोगात येतो. परंतु सजीवांमधून जीव निघून गेल्यानंतर त्याचे कलेवर पूर्णत: खराब होते किंवा ते जाळले जाते अथवा ते जमिनीमध्ये दफन केले जाते. सजीवांसाठी अन्न, पाणी व वायु आवश्यक आहे, तर हाच नियम निर्जीवांसाठी लागू नाही. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सजीव व निर्जीव दोन्ही ऊर्जेपासून तयार झालेले आहेत व या ऊर्जेचा नाश होत नाही. केवळ एका ऊर्जेचे रूपांतरण होते.भारतीय तत्त्वज्ञानात मानवी जीवनाच्या मृत्यूसंदर्भात खूपच खोलवर चर्चा झालेली आहे. मृत्यू काय आहे व त्याचे रहस्य काय? याचे फारच मोठे स्पष्टीकरण उपनिषद्, गीता तसेच इतरही ग्रंथातून पहायला मिळते. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कहाणी खूपच चमत्कारिक आहे. नचिकेताच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्या पित्याने त्यास यमराजास दान दिले. नचिकेता आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार यमराजाकडे गेला व त्याने यमराजांना जीवन व मृत्यूच्या संदर्भात खूपच गहन प्रश्न विचारले, ज्याचे वर्णन कठोपनिषदामध्ये पाहायला मिळते.यासंबंधी केल्या गेलेल्या विचारमंथनातून असे समजते की मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे. केव्हा, कुठे व कसा मानवाचा मृत्यू होईल, हे पूर्णत: अनिश्चित आहे. शेवटी मानवाने नेहमीच यासाठी तयार असायला हवे. मृत्यूमध्ये शरीरही सोडले जाते. शेवटी हे जग आणि या जगातील सर्व संपन्नता निरर्थक होते. याच करणामुळे भारतीय अध्यात्मशास्त्रात मृत्यूवर कसा विजय मिळवावा हे शिकविले जाते. निर्वाण किंवा समाधी हे या मृत्यूवरील विजयाचेच प्रतीक आहे. संतांनीही याचे वर्णन आपल्या साहित्यात खूप सुंदररीत्या केलेले आहे. संत कबीर यांचे खालील कथन याच गोष्टीचे द्योतक आहे-‘‘ जस की तस धर दिन्ही चदरिया’’
क्षणभंगुर जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:21 AM