कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून प्रवास करता यावा यासाठी स्वत:चे वाहन असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातून मग वाहन खरेदीला वेग येतो. खरेदीदार वाढले की उत्पादनही वाढवावे लागते. तेच सध्या भारतातील वाहन उद्योगाचे झाले आहे. भारतात वाहनांची एवढी मागणी आहे की गेल्या वर्षभरात भारतात तब्बल दोन कोटी ५३ लाख १६ हजार वाहने निर्माण झाली आहेत. सियाम या भारतीय वाहन उद्योगांच्या संघटनेनेच ही आकडवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीचा फटका सहन करूनही गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पादनात साडेपाच टक्के वाढ झाली आहे. एकूणच वाहन उद्योगाची भरभराट होताना सध्या दिसत आहे. मात्र हे सारे होत असतानाच आणि प्रत्येक घरात वाहन येत असताना हा महापूर आपल्याला कुठे घेऊन जातोय, याचा विचार मात्र कोणीच करताना दिसत नाही. बीएस-३ मानकांनुसार तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर तर अशा वाहनांची कंपन्यांनी स्वस्तात विक्री करण्यात सुरुवात केली. या वाहनांच्या खरेदीलाही पूर आला होता. तीन दिवसांत लाखो वाहने विकली गेली. स्वस्तातले वाहन आपल्याला मिळावे यासाठी विक्रेत्यांकडे लोकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र यातील एकानेही विचार केला नाही की हे वाहन विकत घेऊन आपण अधिक प्रदूषण करणार आहोत. आता ही सर्व वाहने रस्त्यावर आहेत. पूर्वी ज्या गतीने प्रदूषण होत होते त्यात या नव्या वाहनांनी भर घातली आहे. शिवाय रोज विक्री होणाऱ्या इतर वाहनांची गणना तर वेगळीच. यंदा तयार झालेल्या वाहनांची आकडेवारी पाहता यातील अर्धी वाहने निर्यात झाली, असे जरी गृहीत धरले तरी अर्धेअधिक वाहने भारतीय बाजारात विकली गेली असणार. म्हणजेच जवळपास सव्वा कोटी वाहने वर्षभरात रस्त्यावर आली. या आकडेवारीनुसार रोज नव्याने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास ३५ हजारांच्या घरात आहे. आपल्या देशात चांगले रस्ते नाहीत, ट्राफिक जामने वैताग आणलाय अशी ओरड आपण कायम ऐकत असतो. मात्र, अशा रस्त्यांवरूनही गाडी दामटवणे थांबवायला कुणी तयार नाही. सिंगापूरसारख्या देशात वैयक्तिक वाहनांवर दुपटीने कर आकारला जातो. त्यामुळे तेथे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे आणि लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करतात. आपल्या देशात असे होणे अवघड असले तरी किमान धूर फेकणाऱ्या या वाहनांच्या संख्येवर अंकुश आल्यास निश्चितच देशातील प्रत्येकाचे आयुष्य किमान काही दिवसांनी वाढेल.
वाहनांचा महापूर
By admin | Published: May 08, 2017 11:38 PM