शुद्ध हवा नाही़, पाणी नाही़ निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे़ माणूस श्रीमंत होताना निसर्ग मात्र कंगाल होतो आहे़ जंगलतोड करू नका, पाणी अडवा-पाणी जिरवा यासारख्या घोषणा नित्याच्याच झाल्या आहेत़ आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘आकासिया’ नावाच्या वृक्षाची रोपे सर्वत्र लावली गेली़ कोणीतरी शोध लावला, आकासियाच्या लागवडीला विरोध केला़ ‘ही झाडे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात़ पक्षी या झाडावर असत नाहीत़ झाडाला ना फुले येतात ना फळे. गर्द सावली सुद्धा पडत नाही़ ही झाडे विषारी आहेत़ बापरे! आपण काय करत चाललो आहोत याचे भान तरी उरले आहे का?’ ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट़’खंडाळ्याच्या घाटाने हिरवाई केव्हाच गमावली आहे़ पर्यावरणाचे पुस्तकी शिक्षण किती मदत करेल, ही शंकाच आहे़ कचरा विल्हेवाट या विषयावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान चर्चासत्रे घेत आहेत, परिषदांचे आयोजन देशोदेशी होत आहे़ परिस्थिती मात्र जैसे थे नव्हे, तर वरचेवर बिघडतच चालली आहे़ बदलणाऱ्या सृष्टीचक्रापुढे मनुष्यप्राणी हतबल झाला आहे़ माणसाची सोयरी समजली जाणारी वृक्षवल्ली दुर्मिळ झाल्यावर पक्षी सुस्वर आळवणार कोठून? ज्या अर्थी प्रश्न आहे त्या अर्थी त्याचे उत्तर आहे़ कुलूप आहे तर किल्ली असणारच़ किल्लीशिवाय कुलूप अजून तरी जन्मा आले नाही़ मनात आले म्हणजे केव्हातरी संतकवी श्रीदासगणु महाराज विरचित ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करतो़ तेवढेच बरे वाटते़ अध्याय पाच ओवी क्रमांक १४५ने माझे लक्ष वेधून घेतले़‘सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे’पर्यावरणाचे उत्तर सापडले़ केवळ झाडे लावून काम होणार नाही तर मनुष्याने सत्कर्माची झाडे जिकडे तिकडे लावली पाहिजेत़ माणसाने आयुष्यभर सत्कर्म करावयाचे ठरविले तर पर्यावरणाचा प्रश्र्न चुटकीसरशी सुटून जाईल़ प्रत्येकाने आपले घर स्वच्छ ठेवले आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली तर गल्लीत कचरा होणार कोठून? अंगणात तुळस आणि दारातील पारिजात जगवला तऱ़ प्रश्न जर तरचा़ मला सांगावेसे वाटते; पण करावे मात्र दुसऱ्याने हे कसे चालेल?एकमेका साह्य करूअवघे धरू सुपंथहा तुकोबांचा वसा आणि वारसा महाराष्ट्राने जपला तर त्रैलोक्य आश्चर्यचकित होईल़ ‘पेरा पेरा पेरते व्हा’ ही एक बाजू ‘निगराणी करा’ दुसरी बाजू़ चला तर, आजपासून आपण सत्कर्मासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊ या!-डॉ.गोविंद काळे
सत्कर्माची फुलझाडे
By admin | Published: June 08, 2016 4:12 AM