शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

जंगल, जल, जमीन : गावविकासाची त्रिसूत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 8:42 AM

जंगल, जल आणि जमीन ही कोणत्याही गावाच्या विकासाची त्रिसूत्री आहे. त्याचा वापर केला तर कोणतेही गाव स्वयंपूर्ण होऊ शकते.

- चैत्राम पवार, वनभूषण पुरस्कार विजेतेजंगल, जल, जमीन या त्रिसूत्रीचा वापर करीत, लोकसहभागातून सामूहिकरीत्या सातत्याने केलेले श्रमदान, यातून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा या छोट्याशा गावाचा शाश्वत विकास शक्य झाला आहे. हे त्रिसूत्र राबवीत सामूहिक पद्धतीने काम केले, तर राज्यातील, देशातील प्रत्येक गावाचा शाश्वत विकास साध्य होऊ शकतो. बारीपाडा या गावाने आणि येथील नागरिकांनी आपल्या गावाचा विकास कसा केला, त्याचीच ही कहाणी..

वनसंवर्धन : गावाच्या विकास त्रिसूत्रीतील पहिले सूत्र आहे जंगल. वनसंवर्धनासाठी आम्ही गावात लोकसहभागातून वन समिती स्थापन केली. समितीत ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश होता. समितीच्या माध्यमातून गावात कुऱ्हाडबंदी आणि वनचराईबंदी राबविली. वर्षातील ११ महिने कुऱ्हाड वापरायची नाही, हा निर्णय घेतला. कुणी मोठे झाड तोडताना सापडल्यास १०५१ रुपये दंड, तर वनक्षेत्रात बैलगाडी नेल्यास ७५१ रुपये दंड आकारण्याचे ठरविले. परिणामी वृक्षतोड थांबली आणि वनांचे संवर्धन झाले. या कार्यात लोकांसोबतच वन विभागाचीही  मदत मिळाली. त्यामुळे ११०० हेक्टरमध्ये घनदाट जंगल तयार होऊन पर्यावरणाचे संरक्षण तर झालेच, सोबतच आरोग्यासाठी आवश्यक वनौषधीदेखील उपलब्ध झाली. अशाच पद्धतीने जर इतर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन, वन विभागाच्या मदतीने काम केले, तर वनसंवर्धनासोबतच इतर लाभ त्यांनाही मिळतील.

जलव्यवस्थापन : वनसंवर्धनासोबतच पाण्याचे नियोजनही करणे आवश्यक होते. त्यासाठी छोटे-छोटे बंधारे बांधायला हवे होते. बंधारे बांधण्यासाठी शासन मदत देईल याची वाट न पाहता, आम्ही  गावकऱ्यांच्या श्रमदानातून जंगलात ३०० छोटे बंधारे बांधले. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. हे बंधारे मार्च महिन्यापर्यंत भरलेले असतात. त्याचा फायदा शेतीसाठी झाला. परिसरातील पूर्वी कोरड असलेल्या जमिनीतून आता वर्षाकाठी दोन ते तीन पिके घेतली जातात. आता जमिनीत अवघ्या सहा फुटांवर पाणी मिळते. गावात तब्बल ४० विहिरी आहेत. गावातील शेतीतच भरपूर काम उपलब्ध असल्याने, गावातील कुणीही मजुरीला बाहेर जात नाही. गावात एकही कुपोषित बालक नाही. शासनाच्या मदतीची, मोबदल्याची वाट न पाहता गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्त श्रमदान केल्यानेच हे शक्य झाले आहे. त्याचा फायदा आता सर्वांनाच दिसत असल्याने गावातील तरुण वर्ग या कार्यात उत्साहाने सहभागी होत आहे. याचे अनुकरण इतर गावांनीही करायला हवे. त्यांनाही त्याचा निश्चितच फायदा होईल. काही दिवस काम केल्यानंतर लगेच त्यातून काही मिळेल, अशी अपेक्षा बाळगली, की काम थांबते. तसे होऊ नये यासाठी सातत्याने काम केले पाहिजे. थोडी वाट बघितली, तर यश हमखास मिळणार आहे. अन्य गावांतील ग्रामस्थांनी याची सुरुवात स्वत:पासून केली, तर आपोआपच लोकसहभाग वाढेल.

जमीन : वनसंवर्धन आणि जलव्यवस्थापनामुळे आमच्या गावातील जमीन सकस झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जाऊ लागली आहेत. गावात सामूहिक शेतीदेखील केली जाते.  बारापाड्यात कोणीही भूमिहीन नाही. शेती हा प्रमुख व्यवसाय असून, शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. भात, नागली, भगर, मसूर, भाजीपाला आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. आमच्या परिसरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सहकारी राइस मिलदेखील सुरू केली आहे. वनसंवर्धन, जलव्यवस्थापनाने हे सर्व शक्य झाले आहे.  या सर्व गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन आम्हाला वनवासी कल्याण आश्रम या संस्थेकडून मिळाले. आम्ही जे करू शकलो ते सर्वच गावे करू शकतात. देशातील प्रत्येक गावाने जर अशा पद्धतीने जंगल, जल, जमीन या त्रिसूत्रीचा वापर केला, तर सर्वच गावे ‘सुजलाम् सुफलाम्’ होतील.

वनभाजी महोत्सव : कॅनडात वास्तव्य असलेले डॉ. शैलेश शुक्ल हे बारीपाडा गावावर संशोधन (पीएचडी) करण्यासाठी गावात वास्तव्यास आले होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, आम्ही २००४ पासून गावात वनभाजी पाककला स्पर्धा सुरू केली. मुळात अबोल, लाजऱ्या असलेल्या आदिवासी महिलांना बोलके करून, पाकशास्त्राचे पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे हा स्पर्धेमागील मुख्य हेतू होता. पहिल्या वर्षी केवळ २७ स्पर्धकांनी भाग घेतला. आता तब्बल सहाशे स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. बारीपाडा ग्रामस्थच या स्पर्धेचे दरवर्षी यशस्वी आयोजन करतात. त्यातून अनेक वनौषधींची ओळख होण्यास मदत झाली आहे. राज्य शासनाच्या आदेशाने आता  ज्यात सर्वत्र जिल्हानिहाय वनभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. हे सर्व कुण्या एका व्यक्तीमुळे शक्य होत नाही. त्यासाठी लागते सामूहिक शक्ती आणि सातत्य! एकदा का ते शक्य झाले, तर राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वच गावे बारीपाडा होतील, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही!