पी.व्ही. सुब्रमण्यम -
पालक मुलांच्या गळ्यात इएमआयचा पट्टा बांधतात आणि त्यांना कर्जफेडीच्या चक्रात अडकवतात असं मी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. ते वाचून कुणाला प्रश्न पडला असेल की मग पालकांनी मुलांना काही सांगायचं, सल्ले द्यायचेच नाहीत का? पालक मुलांचं अहीत चिंततात का? तर अजिबात नाही. आपल्या तरुण मुलांना काही शिकवायचं, सांगायचंच असेल, सल्ला द्यायचाच असेल तर एवढंच सांगा की, डिसिप्लीन लीड्स टू फ्रीडम... शिस्त पाळा, स्वातंत्र्य त्यातूनच मिळेल! वयाच्या २२ व्या वर्षी तरुण मुलांना हेच सांगितलं तर ते त्यांना बोअरिंगच वाटतं. मात्र जितक्या लवकर आर्थिक शिस्त त्यांच्या अंगी येईल तितकं त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मोठं असेल. कमावत्या मुलांना, अगदी नोकरी लागल्यापासून ही आर्थिक शिस्त स्वत:ला लावता आली तर संपत्ती निर्माण शक्य आहे.ते कसं?ध्यानधारणा, पळणं, सायकलिंग, जीमला जाणं या साऱ्यानं आयुष्य बदलतं का? - त्या एका कृतीनं आयुष्य बदलत नाही तर ती गोष्ट रोज, सतत, दीर्घकाळ करण्याची जी ‘प्रोसेस’ असते त्यानं आयुष्य बदलतं. हेच सूत्र गुंतवणूक करण्याच्या शिस्तीला लावून पहा. बचत करणं, ते ही तारुण्यात हा अवघड भाग असतो. पण एकदा तुम्ही बचत करायला शिकलात, की पुढचा टप्पा एसआयपी. तो फार अवघड नाही. आपल्या पगारातील किमान २० % पैसे आपली बचत असली पाहिजे हे सुरुवातीला लक्ष्य ठेवा. सुरुवातीला इंडेक्स फंडात एसआयपी करा. पुढच्या गुंतवणुकीचे धडे शिकून घेईपर्यंत हा सोपा मार्ग.एसआयपी का तर, खिशात पैसा आल्याआल्या तो शिस्तीत बाजूला जातो. ज्या तरुणांना गुंतवणूक शिकायची आहे, तो दीर्घ प्रवास आणि प्रक्रिया समजून घ्यायची आहे त्यांनी एसआयपीने सुरुवात करावी.तुम्ही फक्त ठरवायचं आहे की, पगारातले दरमहा दोन हजार, पाच हचार, दहा हजार थेट एसआयपीत जाणार. ठरवलं की होतं. मुख्य म्हणजे एखादा हप्ता चुकलाच तर लगेच स्वत:ला सुळावर लटकवायला जाऊ नका. शिस्त अंगी मुरायलाही बराच वेळ लागतो. कायम लक्षात ठेवा की, संपत्ती निर्माण हा दीर्घ मुदतीचा, अनेक वर्षांचा, अनेक दशकांचा, अनेक मार्गांचा प्रवास-प्रक्रिया आहे. वयाच्या २२ व्या वर्षापासूनच हे करता आलं तर उत्तमच. शिस्त जितकी लवकर लागेल, तितकं फायद्याचं!
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)pvsubramanyam@gmail.com