- विजय दर्डा
जगातील विविध धर्मांतल्या जाणत्या विद्वानांचा सहवास मला लाभला याबाबतीत मी स्वत:ला भाग्यवान मानतो. धर्म जाणण्या-समजण्याची जिज्ञासा कळत्या वयापासून उत्पन्न झाली. दादी, बाई (माझी आई), बाबूजी आणि माझी जीवन सहचारिणी ज्योत्स्ना यांनी केलेल्या आध्यात्मिक संस्कारांतून विविध धर्मांच्या विचारांचे स्वागत करण्याची शिकवण मला मिळाली. कुठल्या धर्मावर टीका करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. विविध धर्मांचे सण मला आनंदित करतात. आणि ही भिन्नताच हिंदुस्तानला अन्य जगापासून वेगळेपण देते हे माझ्या लक्षात आले आहे.
धर्म हे खरे तर बाह्य आवरण नाही. अंतरात्म्याला जागे करण्याचे ते एक माध्यम आहे. तुम्ही कुठलाही धर्म मानत असा; तो चांगलाच रस्ता दाखवतो. धर्मात अशांतीला जागा नाही पण हेही खरे, की आज धर्माच्या नावाने जगभर रक्ताचे पाट वाहतात. धर्माच्या नावाने चालणारे हे क्रौर्य मला अस्वस्थ करते. हे चित्र केव्हा बदलेल की बदलणारच नाही? असा विचार सतत मनात येतो. बदलणार असेल तर त्याचा मार्ग कोणता?
भगवान महावीरांच्या शिकवणीत एक मार्ग मला दिसतो. इथे जैन धर्माची श्रेष्ठता अधोरेखित करणे हा माझा हेतू मुळीच नाही. माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीचा धर्म श्रेष्ठच आहे. असलाही पाहिजे. पण जर दुसऱ्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये जीवनाचे उन्नयन करणारी अशी काही तत्त्वे असतील तर ती स्वीकारण्यात काही अडचण नसावी.
व्यक्तिगत जीवनात मी जैन धर्माशिवाय अन्य धर्मांकडूनही बरेच काही शिकलो आहे. त्या शिकवणुकीचे मी पालनही करतो. माझ्या देवघरात सर्व धार्मिक पुस्तके आणि प्रतीके दिसतील. इथे मी जैन आचारविचार आणि दर्शनाची चर्चा करतो आहे कारण त्यात नवा रस्ता दाखवू शकतील अशी काही तत्त्वे आहेत.
सगळ्यात आधी ‘क्षमा’. अर्थात त्याविषयी बोलणे- लिहिणे सोपे पण, क्षमा करणे त्याहून कितीतरी अवघड याची मला कल्पना आहे. म्हणूनच जैन दर्शनात सांगितले आहे, ‘क्षमा वीरस्य भूषणं’! ज्याच्यात साहस आहे, जो वीर आहे तोच क्षमा करू शकतो. क्षमा मागण्यासाठी आंतरिक शक्ती लागते. क्षमा करण्यासाठी त्याहून अधिक शक्ती लागते. क्षमेबद्दल बोलताना स्वत:ला क्षमा करण्याची ताकद कमावणेही त्यात येते. मानवी जीवनाच्या पुढे जाऊन ब्रह्मांडातील सर्व जीवांना क्षमा करण्याचा विचार जैन दर्शनात आला आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की निसर्गाने ज्या स्वरूपात ही भूमी, आकाश, अज्ञात परलोक आपल्या स्वाधीन केले ते मूळ स्वरूपात सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येक धर्माची हीच तर शिकवण आहे.
प्रत्येक व्यक्तीने क्षमा नामक अलंकार धारण केला पाहिजे. त्यासाठी स्वत:ला तयार करावे लागेल. कोणाचे वाईट व्हावे असे मनातही येणार नाही इतके आत्म्याच्या पातळीवर स्वत:ला निर्मळ करावे लागेल. कोणाच्या वाईटाचा विचार मनात येणे हीदेखील हिंसा आहे, असे जैन विचार आपल्याला सांगतो. अशा आध्यात्मिक पातळीवर आपण क्षमाशील होऊ तेेव्हाच आपोआप आपल्यात अहिंसेचा भाव प्रकटेल. ही अहिंसाच परम धर्म आहे. हीच क्षमा आणि अहिंसा जैन धर्माचा मूळ आधार आहे.
परंतु दुर्दैव पाहा, आजच्या परिस्थितीत जगात सर्वाधिक हिंसा धर्माच्या नावावर होते आहे. एक दुसऱ्याचा गळा कापला जातो. धर्माचे व्यापारी आपापल्या धर्माच्या श्रेष्ठत्वाचे झेंडे फडकावत राहातात. दहशतवादाचा क्रूर पंजा सगळ्या मानवजातीला मुठीत घेऊ पाहतो.
- मला वाटते या क्रूर पंजाशी लढण्याची ताकद केवळ अहिंसेत आहे. हा केवळ कोरडा विचार आहे, असे नव्हे! अहिंसा हे किती प्रभावी शस्त्र आहे, याचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याइतके दुसरे उत्तम उदाहरण नाही. ज्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता ते गांधींनी अहिंसेच्या बळावर उखडून फेकले. सत्य आणि अहिंसेची ही शिकवण जैन दर्शनाने आपल्याला हजारो वर्षांपासून दिली आहे.
आपल्या जीवनात क्षमा भाव, सत्य, अहिंसा असेल तर संचय न करण्याची वृत्ती आपोआपच जीवनाचा हिस्सा होईल. जगण्यासाठी आवश्यक तेवढ्याचीच इच्छा आपण धरू. मग लोभ उत्पन्नच होणार नाही.
जीवनाचा रस्ता सुकर होईल. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे जीवनाचे एक स्वाभाविक अंग बनेल. जैन दर्शन आपल्याला अनेकांतवाद म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याची शिकवण देते. आपलेच बरोबर असे सगळ्यांना वाटते पण जोवर तुम्ही दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेत नाही तोवर स्वत:लाही न्याय देऊ शकत नाही. व्यापाऱ्याने ग्राहकाचा दृष्टिकोन समजून घेतला नाही तर तो व्यापार करू शकेल का?
एकाने दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेतला तर ही ओढाताण राहणारच नाही. ओढाताण राहिली नाही तर संघर्ष होणार नाही. एकमेकांमध्ये वैरभाव निर्माण होणार नाही. व्यापक दृष्टिकोनातून पाहता सगळी मानव जात शांतता आणि सद्भावनेने जगेल. शस्त्रास्त्रांची स्पर्धा नसलेले जग आपण निर्माण करू शकू. शस्त्रास्त्रांवर खर्च होणारा पैसा जनतेसाठी शिक्षण, आरोग्य यावर खर्च करता येईल. सर्वसामान्य जनतेचे प्रश्नही त्यामुळे सुटतील. आज ही कागदावरची कल्पना वाटेल. पण माणसाने आजवरच्या प्रवासात अशक्य वाटावे असे संकल्प सोडले आहेत, आणि ते साकारही करून दाखवले आहेत. माणसाने ठरवले तर तो क्षमा आपला अलंकार म्हणून धारण करील. जगातली कोणतीही ताकद त्याला अडवू शकणार नाही. मगच खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे सुंदर स्वप्न साकार होईल.