हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे गांधी कुटुंबाशी जवळपास ६० वर्षांचा घरोबा असलेले नेते. ‘इंदिरा गांधी यांचा तिसरा मुलगा’, असा त्यांचा दर्जा होता. जवाहरलालजींच्या त्रिमूर्ती भवनात वास्तव्य केलेले आणि राजीव, संजय यांच्याबरोबर डून स्कूलमध्ये शिकलेले असा त्यांचा लौकिक. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर डून शाळेतील त्यांच्या दोस्तांचा सत्तावर्तुळात दबदबा वाढला. या ‘डॉस्को क्लब’च्या सदस्यांनी पुढच्या काही दशकात देशाने पाहिलेल्या अनेक घोटाळ्यांना जन्म दिला.
तिकीटवाटपात अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे राज्यातील प्रभारी जय प्रकाश अग्रवाल किंवा रणदीप सूरजेवाला यांनी पुन्हा पुन्हा सांगूनही कमलनाथ यांनी ऐकले नाही तेव्हा त्यांच्यावर गांधी मंडळींची खप्पामर्जी झाली. असे होणारे डॉस्को क्लबचे ते बहुतेक शेवटचे सदस्य. प्रसंगोपात मध्य प्रदेशात काँग्रेस निवडणूक हरली आणि राहुल गांधी यांनी २४ तासांच्या आत प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरूनच त्यांना हटविले. दरम्यान, राजकीय क्षितिजावर मोठा विस्तार पावलेले कमलनाथ यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, तो त्यांच्या अंगलट आला.
कमलनाथ यांना मुख्यमंत्री करण्याबाबत राहुल कायमच अनुत्सुक होते, असे काँग्रेस पक्षातील अंतस्थ सूत्रे सांगतात. परंतु, सोनिया गांधी त्यांच्या बाजूने होत्या. कमलनाथ यांच्या बाबतीत मोदी सरकार मवाळ भूमिका घेत आले अशी शंका कायमच घेतली गेली. कमलनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बकुल नाथ हे अमेरिकेत असतात. त्यांच्यावर कारवाई टाळली गेली. ऑगस्टा वेस्टलॅंड खरेदी लाभार्थी म्हणून बकुल नाथ यांचे नाव यादीत होते.
जानेवारी २०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दुबईतून राजीव सक्सेना यांना ताब्यात घेतल्यानंतर बकुल नाथ यांचे नाव समोर आले. ३००० कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात त्यांचा संबंध होता. सक्सेना यांचे हजार पानांचे निवेदन ईडीने नोंदवले. त्यात संरक्षण दलाल सुशेन मोहन गुप्ता, कमलनाथ यांचे पुतणे रातुल पुरी आणि बकुल पुरी अशी काही नावे आहेत.
रातुल पुरी यांना २०१९ मध्ये ईडीने अटक केली. सावनाच्या ट्रस्टच्या मालकीच्या कंपनीने हा व्यवहार केला होता. त्यात बकुल नाथ हे एक लाभार्थी होते. गेल्या पाच वर्षांत ते भारतात येऊ शकलेले नाहीत. कमलनाथ यांनी या प्रकरणात काहीही गैर झाल्याचा तसेच त्याच्याशी आपला संबंध असल्याचा इन्कार केला आहे. असे असले तरी त्यांचा धाकटा मुलगा आणि विद्यमान खासदार नकुल नाथ यांना मात्र छिंदवाड्यातून तिकीट दिले गेले आहे. त्याचे कारण अर्थातच जिंकू किंवा मरू अशा प्रकारच्या निवडणूक संग्रामात प्रत्येक जागा महत्त्वाची आहे.
लेखी मागे का पडल्या?
मीनाक्षी लेखी यांच्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचा चेहरा म्हणून पुढे येण्याचे गुण पुरेपूर होते. पी. एन. लेखी नामक महान कायदेपंडितांच्या कुटुंबातून श्रीमती मीनाक्षी आलेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच जनसंघाच्या वतीने पी. एन. लेखी यांनी न्यायालयात अनेक खटले लढविले. आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. लेखी या पक्षाच्या निष्ठावंत असून, चांगल्या वक्त्या आहेत; तसेच उत्तम वकीलही. पक्षात त्यांना भराभर बढती मिळत गेली. २०१४ साली प्रतिष्ठेच्या नवी दिल्ली मतदारसंघातून त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. दिवंगत अरुण जेटली यांच्यासह अनेक ज्येष्ठ पक्षनेत्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. जोरदार बहुमत मिळवून त्या निवडूनही आल्या.
लोकसभेत प्रभावी काम केल्याने २०१९ साली त्यांना पुन्हा संधी मिळाली. यावेळी त्यांना मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. मात्र, त्यांचे वरिष्ठ परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्याशी वितुष्ट आले असे बोलले जाते. काही संवेदनशील प्रकरणात त्यांनी जाहीर वक्तव्ये केली होती. आपल्या मोठेपणाचा तोरा त्या मिरवत. कार्यकर्त्यांना तासन्तास तिष्ठत ठेवत, अशीही तक्रार होती. जणू यश त्यांच्या डोक्यात गेले होते. पक्ष कार्यकर्त्यांनी मग श्रेष्ठींकडे तक्रारी करायला सुरुवात केली. त्यांचे ग्रहमान बदलताच तिकीटही गेले आणि दुसऱ्या उगवत्या महिला वकील बासुरी स्वराज यांचा राजकीय पटलावर उदय झाला. बासुरी यांच्यामागे कै. सुषमा स्वराज यांच्या कार्याचे वलय आहे. मीनाक्षी लेखी आता आराम करत असून, पक्षसंघटनेत पुनर्वसन होईल अशी आशा बाळगून आहेत. आपल्या कर्मानेच त्यांनी ही स्थिती ओढवून घेतली.
सुखू यांनी खोदला स्वतःसाठी खड्डा..
सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अचानक समोर आले. या प्रतिष्ठेच्या पदासाठी आधी कोठेही त्यांचे नाव नव्हते. राहुल आणि प्रियांका यांच्याशी ते जवळचे मानले जातात. त्याचप्रमाणे पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. शर्मा हे सोनिया गांधी यांच्या मर्जीतले. राहुल यांना मात्र ते आवडत नाहीत. काँग्रेसने निवडणूक जिंकली. त्यानंतर सुखविंदर सिंग सुखू यांची निवड झाली. दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा यांचा पत्ता त्यामुळे कटला. गांधी कुटुंबीयांचे दुसरे विश्वासू राजीव शुक्ला यांना राज्याचे प्रभारी म्हणून पाठविले. काँग्रेसने ६८ पैकी ४० जागा जिंकलेल्या असल्यामुळे सुखू आणि शुक्ला यांना असे वाटले की, आता भाजपकडून काही धोका संभवत नाही. परंतु, अकल्पित असे काहीतरी घडले ज्याची या जोडगोळीला कल्पनाही करता आली नाही. त्यांच्या पक्षाच्या सहा आमदारांनी राज्यसभेत भाजप उमेदवाराला मत दिले. सुखू यांच्यावर एक जबाबदारी असली तरी शुक्ला यांच्यावर मात्र इतर जबाबदाऱ्या आहेत. उत्तर प्रदेश, क्रिकेट नियामक मंडळ, त्याचप्रमाणे गांधी कुटुंब या बाबी त्यात मोडतात. गरीब बिचारे सुखू जे झाले त्याची किंमत मोजतील आणि गांधींना बहुतेक राज्य गमवावे लागेल. थोडक्यात, सुखू यांचे दिवस भरले असून, शेवटच्या घटकेची तेवढी प्रतीक्षा आहे.