साधना शंकर लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी
त्यांच्या कामाइतकीच नावेही आकर्षक आहेत. चॅट जीपीटी, ग्रोक, जेमिनी, मेटा... कृत्रिम बुद्धिमत्तेची ही प्रारूपे नोव्हेंबर २०२२ पासून झपाट्याने वाढत आहेत. जे त्यांचा वापर करायला पटकन उद्युक्त होतात त्यांना संख्येइतकीच त्यांची क्षमताही वाढलेली दिसते. जानेवारी २०२५ मध्ये सिलिकॉन व्हॅलीच्या दुसऱ्या टोकाला चीनमध्ये 'डीपसीक'ने अवतार घेतला. चीनच्या हँगझूवर हे प्रारूप आधारित असून, हाय फ्लायर या हेज फंडाने त्याला पैसा पुरविलेला आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांच्या पारंपरिक वरचष्याला 'डीपसीक'ने आव्हान दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयात जगाचे लक्ष वेधले गेले.
डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अत्याधुनिक साधन असून, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंगचा मिलाफ त्यात आहे. अभूतपूर्व अशी अचूकता आणि आकलन त्याद्वारे मिळते. मानवी अनुभूतीशी साधर्म्य सांगणाऱ्या ज्ञानतंतुजालामुळे पारंपरिक अल्गोरिदम्सना कदाचित जमणार नाही ते डीपसीक शोधू शकते. प्रचंड मोठ्या माहितीच्या साठ्याला चाळणी लावून कल निश्चित करणे, पुढे काय घडेल हे अपूर्व अशा खात्रीलायकपणे सांगणे डीपसीकमुळे शक्य होणार आहे. माहितीच्या भांडारात ते खोलवर बुडी मारू शकते; ज्यातून आजवर न दिसलेल्या गोष्टी त्याला शोधता येतील. या पूर्वीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपांतर जेवढा खर्च येत असे त्याच्या कित्येक पटीने कमी खर्च यावर होणार असल्याने सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली.
तर मग हे डीपसीक आले तरी कुठून? या प्रारूपाची क्षमता आणि एकंदर गुणांइतकेच या प्रश्नाचे उत्तरही चित्तवेधक आहे. हँगझू शहरातील झे दा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी लियांग वेंगफेन याने २०२३ साली डीपसीकची स्थापना केली. इतर अनेक विद्यापीठांप्रमाणेच झे दालाही नवीन काहीतरी करून दाखवायचे होते. या विद्यापीठात सुमारे ७० हजार विद्यार्थी आणि प्राध्यापक आहेत. जलाशये आणि वनराईने वेढलेल्या दगडी इमारतीचे सात परिसर येथे आहेत. गेल्या काही दशकात या विद्यापीठाने संशोधनात आघाडी मिळवली. बुद्धिमान विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील यशस्वी नेतृत्व म्हणून तयार केले. स्टॅनफर्डच्या धर्तीवर त्याची उभारणी झाली असून, २०२७ पर्यंत जागतिक पातळीवरील विद्यापीठ म्हणून प्रस्थापित होण्याचा त्यांचा मानस आहे.
अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा झे दा विद्यापीठातून सर्वाधिक संख्येने संशोधनपर प्रबंध प्रकाशित होतात. विशिष्ट क्षेत्रातील पहिल्या १० क्रमांकावरचे संशोधन प्रबंध प्रकाशित करणाऱ्या हार्वर्डनंतर झे दाचा नंबर लागतो. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे कोणतीही विद्याशाखा निवडता येते. चुकांचा बाऊ केला जात नाही. गुणवत्तावाढीसाठी हँगझू शहरही काळजी घेते. आजमितीला ड्रो दा विद्यापीठात परदेशातले विद्यार्थी किंवा प्राध्यापक खूप कमी संख्येने असून, विद्यार्थ्यांची कामगिरी खरोखरच लक्षणीय आहे. शास्त्रज्ञांनी लावलेले शोध व्यापारी हेतूने वापरण्यासाठी झे दा गेल्या दशकभरापासून मदत करते. या कामासाठी २००९ साली विद्यापीठाने एक स्वतंत्र संस्थाही निर्माण केली आहे.
भारतातही अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतजेन या कामात आघाडीवर असून, अनेक स्टार्टअप्स या विषयात काम करत आहेत. 'इंडिया एएआय' मोहिमेकडे ६७ प्रस्ताव आले असून, त्यातील २० एलएमएस उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर कूस बदलली जात असताना शैक्षणिक शक्तीच्या बाबतीतही तेच होत आहे. आपण त्यात महत्त्वाचा सहभाग दिला पाहिजे. झे दाच्या पावलावर पाऊल टाकून आपलेही एखादे विद्यापीठ किंवा संशोधन संस्था नेत्रदीपक कामगिरी करील, अशी आशा करायला हरकत नाही.
sadhna99@hotmail.com